नांदेड : आमचे सहकारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार राजीव सातव (Mp RAJIV SATAV) यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी असून, नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक (Ashok Chavan) यांनी म्हंटले आहे. (Tributes to MP Rajiv Satav by Ashok Chavan and MP Chikhlikar)
खा. सातव यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, जिल्हा पातळीपासून राजकीय प्रवास सुरू करून विलक्षण जिद्द व कर्तबगारीच्या बळावर अतिशय कमी वेळेत राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणारे खा. राजीव सातव यांच्याबद्दल संपूर्ण देशात कुतूहल होते. महाराष्ट्रासाठी ते एक अभिमान होते. पुढील काळात देश व काँग्रेस पक्षासाठी त्यांच्याकडून मोठे योगदान अपेक्षित केले जात होते.
खा. राजीव सातव यांचे निधन काँग्रेस पक्षासाठी मोठी हानी आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण देशातील त्यांचा मित्र परिवार आणि चाहत्यांच्या मनात त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व सातव कुटुंबियाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
उमद्या नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला: खासदार चिखलीकर
खा. राजीव सातव यांच्या निधनाची बातमी कळताच धक्काच बसला. हिंगोली सारख्या मागास भागातून स्वबळावर नेतृत्व उभे करत ते महाराष्ट्रसह दिल्लीतही आपली छाप टाकत काँग्रेससह महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. राज्यसभेतही त्यांनी वेळोवेळी सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत उपस्थित केलेली चर्चा लक्षवेधी ठरत होती. ग्रामीण मातीतील माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे यासाठीही त्यांची धडपड होती. खा. सातव यांचे नेतृत्व सर्वसामान्यांसाठी एक आधारवड होते. अभ्यासू , संयमी, विश्वासू , मनमिळवू , शहरी आणि ग्रामीन भागाच्या विकसाची जाणीव असणारे तरुण नेतृत्व म्हणूनही खा. सातव यांची ओळख होती. मराठवाड्यातील राजकारणात स्वता:ची वेगळी ओळखही त्यानी निर्माण केली होती. अत्यंत उमेदीच्या काळात कोरोना ने खासदार राजीव सातव यांचा घात केला. खा. राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना सावरण्याचे बळ देवो.-
- खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, नांदेड.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.