कंधार, (जि. नांदेड) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील प्रसिद्ध सुफी संत हजरत शेख सय्यद अली सांगडे सुलतान मुश्किले आसान रहेमतुला अल्लैह यांचा उरूस आवश्यक धार्मिक कार्यक्रम वगळता इतर सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे दर्गाचे सज्जादा व मुतवल्ली सय्यद शाह अन्वारुल्लाह हुसैनी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले आहे.
अनेक महिन्यांपासून दर्गा बंदच
(ता.२६) सप्टेंबरपासून हजरत सांगडे सुलतान यांच्या ५८६ व्या उरुसाला सुरवात होणार होती. हजरत सांगडे सुलतान यांचा दर्गा एक जाज्वल्य देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. उरुसानिमित्त नांदेड जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतून विविध जातिधर्माचे, वंशाचे, विविध संस्कृतींचे हजारो भाविकभक्त दर्शनासाठी येथे येतात. सांगडे सुलतान यांना श्रद्धासुमन वाहून नवस फेडतात. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून हा दर्गा बंद ठेवण्यात आला आहे.
नियमांचे पालन करणे बंधनकारक
सध्या शहरासह जिल्ह्यात, राज्यात आणि देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा वेळी कोरोना महामारीचा संसर्ग फैलावू नये यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्यामुळे हजरत सांगडे सुलतान यांचा उरूस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे संदल मिरवणूक, तसेच सुफी संत यांच्या जीवनकार्याबाबत व त्यांनी दिलेला मानवतेचा संदेश सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी दरवर्षी होणारे प्रबोधनात्मक कार्यक्रम, सार्वजनिक कव्वालीचे व लंगरचे (प्रसाद वाटपाचे) विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती सज्जादा व मुतवल्ली यांनी दिली आहे.
हेही वाचा - नांदेड- कोरोना चाचणीचा वेग मंदावला, रविवारी २४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; सहा रुग्णांचा मृत्यू -
प्रार्थना करण्याचे आवाहनही
हजरत सांगडे सुलतान (रह.) बरोबरच हजरत सय्यद शाह अजिमोद्दीन शाह धडक (रह.) आणि सय्यद शाह मोईनोद्दीन शाह कडक (रह.) या दर्गांचे कायदेशीर वंशज असलेले सज्जादा व मुतवल्ली सय्यद शाह अन्वारुल्लाह हुसैनी हे या सर्व दर्गांवर संदल चढवून इतर धार्मिक विधी नेहमीप्रमाणे स्वतः पार पाडणार आहेत. म्हणून दर्गा परिसरात न येता, भक्तांनी आपापल्या घरी सुखरूप राहून या अल्लाहकडे (ईश्वर) कोरोना महामारीसोबतच इतर रोगांपासून, आजारांपासून सर्व धर्माच्या बांधवांची सुरक्षा करण्यासाठी, सर्वांच्या चांगल्या आरोग्यासाठी, समाजातून गरिबी दूर करण्यासाठी, द्वेष, राग, कपट, हिंसा अशा कुप्रवृत्तींपासून दूर राहण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही सज्जादा व मुतवल्ली यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
संपादन - स्वप्निल गायकवाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.