नांदेड : लाॅकडाउनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबियांना जीवन जगण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मदतीचे हातही आता आटले असून, शासनाने तरी राशन द्यावे, असा आक्रोश हे कुटुंबिय आता करत आहेत.
कुटुंबाला हातभार लागावा म्हणून अनेक महिला या धुणी-भांडीचे कामे करत आहेत. परंतु, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तसेच खबरदारी म्हमून अनेकांनी आमचे काम बंद केले आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून आमची उपासमार होत असल्याची खंत धुणी-भांडीची कामे करणाऱ्या महिलांनी व्यक्त केली आहे. कुटुंबप्रमुखाच्याही हाताला काम नसल्याने आर्थिक प्रश्न भेडसावत आहे. रेशनवरूनही आम्हाला धान्य मिळत नाही. सामाजिक संस्थांतर्फे वाटप होणारे किटही आमच्यापर्यंत पोचले नाही. परिणामी आमची रोजची सकाळ ही संघर्षाने सुरु होत असल्याचे रतननगरमधील घरेलू कामगार रेश्मा खरात यांनी सांगितले.
जगण्यासाठीची लढाई तीव्र
दिवसरात्र काबाड कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा पण डोक्यावर हक्काचं छत्र नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास घडतो...आरोग्याच्या अनेक समस्या आहेत, पण सांगायचं कुणाला? आपलं आयुष्य कष्टात गेलं, किमान मुलांचं शिक्षण नीट पार पडावं यासाठी झगडा सुरू आहे... अशा अनेक समस्या घेऊन घरेलू महिला कामगार जगण्याची लढाई लढताना दिसत आहेत.
अद्यापही मिळाल्या नाहीत सुविधा
शहरामध्ये घरेलू महिला कामगारांची संख्या हजारावर आहेत. सकाळी सात वाजल्यापासूनच त्यांच्या कष्टाला सुरुवात होते. दुसऱ्याच्या घरी धुणी-भांडी काम करणाऱ्या घरेलू कामगार महिलांची संख्या जिल्ह्यात २५ हजाराच्या घरात आहे. त्यांना शासनाने काही वर्षांपूर्वी आरोग्याची मोफत सुविधा, मुलांचे शिक्षण, पगारी आठवड्याची सुट्टी, पेन्शन अशा सुविधांचा लाभ देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही त्यांना या सुविधा मिळू शकलेल्या नाहीत.
हे देखील वाचाच - पीक कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंका शून्य
अन्नासाठी वणवण भटकंती
शहरातील गायकवाड कुटुंबिय कचरा, भंगार गोळा करण्यासाठी निघतात. सतत कचऱ्यात वावर असल्यामुळे त्यांना त्वचेचे रोग उद्भवू लागले आहेत. हे कुटुंबिय रोज सकाळी बाहेर पडताना दोन्ही मुलांना शेजारी कोणाकडे तरी सोपवून जातात. सकाळचा नाष्टा आणि दुपारचे जेवण आमच्या नशिबीच नाही. चार वाजेपर्यंत भंगार गोळा करून ते विकायचे आणि जे चार पैसे हातात पडतील त्याचे घरी जाऊन सहा वाजता जेवण करायचे. परंतु, दोन महिन्यांपासून भंगारची दुकाने बंद असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची खंत गायकवाड कुटुंबियांनी व्यक्त केली.
आरोग्याच्या समस्या भेडसावतात
नवरा व्यसनी, सासू –सासऱ्यांचा सांभाळ, घरातील जेवणाची तजवीज आणि मुलांचे शिक्षण यासाठी आजही महिला ७ ते ८ ठिकाणी दुसऱ्याच्या घरी धुणी भांडी करून उदरनिर्वाह करतात. हात साबणाने पांढरे पडले, त्वचेचे प्रश्न उद्भवूनही पैशाअभावी दवाखान्याची पायरी त्यांना चढता येत नाही.
- सुवर्णलता काकडे (सामाजिक कार्यकर्त्या, नांदेड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.