नांदेड : कोरोना आणि लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यापासून बाजारपेठ बंद होती. आता काही दिवसांपासून बाजारपेठ सुरु झाली असली तरी सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या दिवसात लॉकडाउन असल्यामुळे ग्राहकांबरोबरच सराफा व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले आहे. मात्र, असे असताना देखील सोन्या चांदीचे भाव वाढतच आहेत. लॉकडाउनपूर्वी आणि लॉकडाउननंतर सोन्यामध्ये सात ते आठ हजार तर चांदीमध्ये जवळपास पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे.
जगभरात गेल्या दोन तीन महिन्यापासून कोरोना विषाणूचे संकट आल्यामुळे त्याचा आर्थिक फटका सर्वांनाच बसला आहे. मेडीकल, किराणा आणि फळे, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व व्यवहार ठप्पच होते. त्यामुळे उद्योजक, व्यापारी, दुकानदार या सर्वांनाच आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. आता पाचवा लॉकडाउन सुरु आहे. त्याचबरोबर काही नियम व अटी शिथील केल्यामुळे बाजारपेठ सुरु झाली असली तरी अजूनही म्हणावी अशी गर्दी दिसून येत नाही.
हेही वाचा - नांदेडकरांना सोमवारने दिला धक्का, पुन्हा तीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर -
सोन्या - चांदीचे असे होते भाव
सराफा व्यापारी आणि माजी नगरसेवक रमेश डागा म्हणाले की, लॉकडाउनपूर्वी मार्च महिन्यात दहा ग्रॅमला सोन्याचा भाव ४० ते ४२ हजाराच्या दरम्यान होता तर चांदीचा भाव किलोला साडेचार हजार रुपयांच्या आसपास होता. आता लॉकडाउननंतर दोन महिन्यांनी सोन्याचा भाव ४८ ते ४९ हजाराच्या दरम्यान तर चांदीचा भाव किलोमागे चार हजार नऊशे ते पाच हजारापर्यंत आला आहे. म्हणजेच सोन्याचा भाव सात ते आठ हजार तर चांदीचा भाव चारशे ते पाचशे रुपयांनी वाढला आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यापूर्वी सोन्याचा भाव ३० ते ३२ हजार रुपये होता.
सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणुक - रमेश डागा
जागतिक बाजारपेठेत डॉलरचे आणि क्रुड आॅईलचे भाव वाढले की मग सोन्या चांदीचेही भाव वाढतात. सध्या कोरोना आणि लॉकडाउनमुळे उद्योगधंदे, व्यापार, बाजारपेठ सर्व कोही दोन महिने बंद होते. शेअर बाजारही गडगडला होता. पर्यटन, हॉटेल, ट्रॅव्हल्स सर्व काही बंद होते. त्याचबरोबर बॅकिंगमध्येही ठेवी आणि गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुक म्हणून सोन्या चांदीचे भाव वाढले असल्याचे सराफा व्यापारी रमेश डागा यांनी सांगितले. विशेष म्हणजे सोन्याचांदीची दुकाने बंद असताना देखील भाव वाढले आहेत.
हेही वाचलेच पाहिजे - लॉकडाउनचा फटका : किरायदार निघून गेल्याने घरमालक भाडेकरूंच्या शोधात -
सराफा व्यापाऱ्यांना फटका - सुधाकर टाक
नांदेड सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर टाक म्हणाले की, सोने, चांदी हा आंतरराष्ट्रीय धातू असून त्याची किंमत, तेजी आणि मंदी ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि क्रुड आॅईलवर अवलंबून असते. कोरोना आणि लॉकडाउनमुळे संपूर्ण जगालाच फटका बसला आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि चीनचे शाब्दिक युद्ध सुरु असल्यामुळे तिसरे महायुद्ध सुरु होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्याचा परिणाम सोन्या चांदीच्या भावावर होतो आहे. त्यामुळे अजूनही भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सराफा व्यापाऱ्यांवर संकट कायम
सोने चांदीच्या सराफा व्यापाऱ्यांवर गेल्या काही वर्षापासून संकट कायम असल्याचे सांगून व्यापारी सुधाकर टाक म्हणाले की, कोरोना आणि लॉकडाउनमुळे सराफा व्यापाऱ्यांवर संकट आले. त्यामुळे अक्षयतृतीया, गुढीपाडवा अशा सणांसह लग्नसराईलाही मुकावे लागले. त्याचबरोबर नोटाबंदी, जीएसटी आणि आता कोरोनामुळे लॉकडाउनसारख्या संकटाला सराफा व्यापाऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने सराफा व्यापाऱ्यांच्याकडे लक्ष द्यावे आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशी मागणीही श्री. टाक यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.