नांदेड : शहरातील नेरली कुष्टधाम येथे शुक्रवारी (ता. २७) रात्री दूषित पाणी पिल्यामुळे नागरिकांना अचानक जुलाब व उलटीचा त्रास सुरू झाला होता. दरम्यान, रविवारी (ता. २७) सकाळपर्यंत या आजाराचे ७१ नवीन रुग्ण दाखल झाले होते.
मात्र, दुपारपर्यंत ही साथ नियंत्रणात आली. आरोग्य विभागाच्या टीमने गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर पाण्यामध्ये ‘व्हिब्रिओ कॉलरा’ हा जिवाणू आढळून आल्याचे निदान झाले. या जिवाणूमुळेच अतिसाराची लागण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी दिली.
या आजाराने आतापर्यंत ३४४ जण बाधित झाले असून, यापैकी रेफर केलेल्या २१० रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णालयात ९४, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ८९, खासगी रुग्णालयात २७ जण उपचार घेत आहेत.
गावात आरोग्य विभागाची टीम तळ ठोकून असून, गावातील सर्व विहिरी, हातपंप, बोअर, नळयोजना, पाण्याच्या टाक्या या सार्वजनिक पाणीस्रोतांचे बिल्चिंग पावडर टाकून शुद्धिकरण करण्यात आले. आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे रुग्णांची शोधमोहीम सुरू आहे.
मळमळ, जुलाब व उलटीचा त्रास असणाऱ्या रुग्णांवर आरोग्य उपकेंद्रामध्ये उपचार करण्यात येत आहेत; तसेच गावात नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्या पाण्याच्या शुद्धतेची तपासणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे.
उपकेंद्र नेरलीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री खेंडकर, डॉ. मिरकुटे हे रुग्णांवर उपचार करत आहेत. नरेली येथील परिस्थिती सध्या नियंत्रणात येत आहे. याकडे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
नेरली येथील तीव्र अतिसाराच्या घटनेला जबाबदार धरून ग्रामसेवक रणजित हटकर यांना निलंबित करण्यात आले आहे, असे जि.प. पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांनी सांगितले.
नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे. शिळे अन्न व उघड्यावर खाऊ नये, वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी, शौचास जाऊन आल्यावर व मुलांना जेवण भरविण्यापूर्वी हात स्वच्छ साबणाने धुवावेत, मळमळ, जुलाब, उलटी यांसारखी लक्षणे दिसून आल्यास आरोग्य कर्मचारी व आरोग्य उपकेंद्राशी संपर्क करावा.
- डॉ. संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.