नांदेड : आगामी विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम ठरणाऱ्या आणि मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या रणसंग्रामाचे पडघम वाजू लागले असून अलीकडच्या राजकीय हालचाली लक्षात घेता निवडणुका मे महिन्याच्या मध्यावर लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याचे दिसत आहे.
नांदेडसह राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. ग्रामविकास मंत्रालयाने वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात मतदार गट व पंचायत समिती गण वाढविण्यास मंजुरी दिली. यामुळे तहसीलमधील निवडणूक कक्षांना अगोदर मागील जुने गट व नंतर वाढीव गट संख्या अशा दोन नमुन्यात रचना करून नकाशे तयार करावे लागणार आहेत.
आता वाढीव संख्यानुसार गट व नकाशे करणे क्रमप्राप्त ठरले असून, ता. ११ ते ता. १४ फेब्रुवारी दरम्यान कच्च्या रचनेची तपासणी राज्य निवडणूक आयोगाच्या मुंबईस्थित कार्यालयात होणार आहे. मात्र, ही व यानंतरची कार्यवाही सोपी नसून गुंतागुंतीची व दीर्घकाळ चालणारी आहे.
सुत्रानुसार तहसील कार्यालयांना (वाढीव संख्यातील) मतदार गटाची रचना व नकाशे तीन ते चार नमुन्यात तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयोगाच्या चमू या सर्व प्रारूप रचना व नकाशांची काटेकोर तपासणी व पडताळणी करून कोणता नमुना योग्य हे ठरवेल. त्या नमुन्यात काय सुधारणा करायची याचे निर्देश देणार आहे. त्यानुसार सुधारीत प्रारुप प्रभाग फेररचना तयार करण्याचे काम फेब्रुवारी अखेरपर्यंत होईल, असा अंदाज बांधला जात आहे.
या सोपस्कारानंतर साधारणतः मार्चच्या मध्यावर विभागीय आयुक्तांनी या रचनेला मान्यता दिल्यावर ती प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविण्यात येतील. या हरकतीवर जिल्हाधिकारी सुनावणी घेतील. या सुनावणीत समाधान न झालेल्यांना विभागीय आयुक्तांकडे अपील करता येणार आहे. तेथील कारवाईनंतर मतदारसंघ रचना अंतिम होईल. ही प्रक्रिया एप्रिल मध्यावर पूर्ण होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यात गट, गण वाढणार
नव्याने जिल्हा परिषदेमध्ये दहा गट तर पंचायत समित्यांमध्ये २० गण वाढणार आहेत. या वाढीव गट व गणामुळे विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांना फटका बसू शकतो. त्यामुळे नेमके कोणते गट व गण नव्याने तयार होतात. याकडे लक्ष असून त्यामुळे स्थानिक राजकारण ढवळून निघणार आहे. परिणामी राजकीय समीकरणेही बदलू शकतात..
जिल्हा परिषदेतील सध्याचे पक्षीय बलाबल
२८ - कॉंग्रेस
१० - राष्ट्रवादी कॉंग्रेस
१० - शिवसेना
२ - राष्ट्रीय समाज पक्ष
१३ - भाजपा
६३ - एकूण सदस्य
जिल्हा परिषदेचा कार्यकाळ २३ मार्चला संपुष्टात येणार
६३ - एकूण जिल्हा परिषद गट
१० - नव्याने वाढणारे गट
१२६ - पंचायत समिती गण
२० - नव्याने वाढणारे गण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.