पंचांगानुसार, शारदीय नवरात्री दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावल्या जातात आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात. यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबर 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत साजरी करत आहोत.
या वर्षीच्या नवरात्रीचे औचित्य साधून दररोज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा देवीच्यां मंदिराचा इतिहास पाहणार आहोत चला तर मग आज आपण चंद्रपूरच्या श्री महाकाली देवीचा इतिहास...
कृतयुगात, हल्लीच्या चंद्रपूर शहराच्या जागी ‘लोकपूर’ या नावाचे मोठे शहर होते व तेथे कृतध्वज नावाचा राजा राज्य करीत होते. त्याच्यानंतर त्याचा पुत्र सुनंद हा राज्य करू लागला. त्याच काळात तेथे महाकाली देवी प्रगट झाली अशी आख्यायिका आहे. पुढे परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रीय करण्यासाठी अनेक राज्ये नष्ट केली. त्यातच लोकपूरचे राज्यही नष्ट झाले.
देवीचा आणि चंद्रपूरच्या नावाचा इतिहास?
त्याच युगात श्रीरामचंद्र हे दक्षिणेस वनवासास निघाले असता लोकपुरातून पुढे गेले व त्याच वेळी त्यांनी हल्लीच्या चंद्रपूरच्या ईशान्येस 50 मलांवर असलेल्या चिमूर जवळच्या ‘चिमूर’ टेकडय़ातील एका टेकडीवर निवास केला असे मानतात, ती जागा आज रामदेगी (रामदिघी) म्हणून प्रसिद्ध आहे. तिथेच ‘सीताकुंड’ आहे. या टेकडीच्या पायथ्याशी राममंदिरही आहे. कलीयुगाच्या सुरुवातीस चंद्रहास्य नावाच्या राजाने महाकाली आणि अंचलेश्वर (महादेव) ही ठिकाणे पाहून तेथे राजधानी वसविली व त्याच्या नावावरून त्या नगरीस इंदूपूर किंवा चंद्रपूर असे नाव पाडले अशीही आख्यायिका आहे.
पुढे या राजाचे राज्य नष्ट झाले व त्यानंतर भद्रावती ही नवीन राजधानी निर्माण झाली.या भद्रावतीचा विस्तार उत्तरेस भटाळ्यापासून तो दक्षिणेस चंद्रपूपर्यंत होता. म्हणजे सुमारे 35 मल लांब व 16 मल रुंद पसरलेली ही भद्रावती किंवा भांदक ही राजधानी होती. ‘भटाळा’ हे गाव वरोरा ते चिमूर या रस्त्यावर सध्या एक लहानसे गाव आहे. परंतु त्या गावात अनेक ठिकाणी खणले असता पुराणकालीन नाणी सापडतात असे तेथील लोक सांगतात. प्राचीन संदर्भाचे विश्लेषण केल्यास तत्कालीन शहर हे भद्रावती नसून भांदक आहे व पुराणातले भद्रावती हे हस्तिनापूरपासून जवळ होते.
एका विस्तृत पठारावर पसरलेल्या भांदक या गावाच्या पश्चिमेला विजासन टेकडय़ा आहेत. त्यांच्यात गुहा असून त्या इसवी सन दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातल्या असाव्यात. त्यांच्यातल्या काही शिलालेखांचा काळ हा गुप्तांचा किंवा सातव्या किंवा आठव्या शतकातला असावा असे किनगहॅम यांनी म्हटले आहे. म्हणजेच भांदक ही प्राचीनकाळी विस्तृत पसरलेली नगरी होती, असे दिसते. मात्र आज त्याच नगराचा उल्लेख भांदक तसेच भद्रावती या दोन्ही नावांनी होतो. गणेशपुराणात त्याचा उल्लेख पुष्पकपूर या नावाने आला आहे. पुढे त्रेतायुगात मणिपूर, द्वापारयुगात भांदक आणि कलीयुगातही भांदक म्हणूनच ओळखले जातेगुत्समद ऋषीने ज्या पुष्पक वनात तपश्चर्या करून श्रीगणेशाची आराधना केली व वरप्राप्तीनंतर तिथेच श्री वरदविनायक गणेशाची स्थापना केली त्या स्थानाचा उल्लेख भृगु ऋषीने लिहिलेल्या गणेशपुरात खालीलप्रमाणे आढळतो.
इदं नगरं देवयुगे पुष्पक संजितम्।
त्रेतायां मणिपुरंच, भानकं द्वापारेपिच
कलौ तु भद्रकं नामख्यातं भविष्यति॥
भानक, भद्रक या नामांचा अपभ्रंश भांदक असा होतो.भांदक हे मोठे शहर होते आणि त्यात विजासन, गवराळा, सुमठाणा इत्यादी भाग येत होते. भांदकपासून सोळा मलांवर चांदा/चंद्रपूर नावाचे खेडे आहे असे उल्लेख जुन्या साहित्यात आढळतात.चंद्रपूर येथील महाकाली मंदिर विदर्भ तसेच मराठवाडय़ातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच ते गोंड जमातीच्या लोकांचेही श्रद्धास्थान आहे. या देवीच्या संबंधातील उल्लेख स्कंध पुराणातील सह्य़ाद्री खंडात आढळतो.
त्यानुसार असे सांगतात की, त्रेतायुगातील राजा कृतध्वज यास सुनंद नावाचा मुलगा होता. त्याला देवीने दृष्टांत दिला आणि एका विशिष्ट जागी उत्खनन करण्यास सांगितले. तेव्हा त्याला भुयारातील शिळेवर एक भव्य अशी मूर्ती दृष्टीस पडलीती त्याने पाषाणात एक गुहा करून त्याच जागी स्थापित केली. तीच ही महाकाली देवी होय. आणखी एक आख्यायिका अशी की, खांडक्या बल्लाळ या गोंड राजाच्या राज्याची राजधानी बल्लारपूर येथे होती. ती पुढे त्याने चंद्रपूर येथे हलविली.
देवीची मूर्ती कशी आढळली?
झरपट नदीच्या कोरडय़ा पात्रात त्याला एक कुंड दिसले.त्यातील पाण्याने त्याने तोंड धुतले आणि तो ते पाणी प्यायला. त्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावरील खांडके नष्ट झाली. दुसऱ्या दिवशी त्याने तेथे जाऊन कुंडातील पाण्याने स्नान केले तेव्हा त्याच्या सर्व अंगावरील खांडके नाहीशी झाली व त्याचे शरीर तेजस्वी दिसू लागले. राजाला स्वप्नात महादेवाने दर्शन दिले. त्यामुळे राजाने ते प्राचीन कुंड महादेवाच्या पिंडीच्या आकाराचे बनविले आणि तेथे अंचलेशर महादेवाचे मंदिर बांधले. याच मंदिराच्या दक्षिण बाजूला थोडय़ा अंतरावर राजाला एक भुयार दिसले आणि त्या भुयारात खडकात कोरलेली भव्य अशी देवीची मूर्ती आढळली. तीच ही महाकाली होय.
राजाने ते भुयार स्वच्छ करून तेथे देवीचे मंदिर बांधले. या तपशीलांकडे पाहता इ.स. 1495 ते 1496 या काळात ही मंदिरे बांधण्यात आली असावीत असा अंदाज आहे. नंतरच्या काळात गोंड हिराई हिने मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि महाकालीच्या जवळ एकवीरा देवीचेही मंदिर बांधले. त्यामुळे हल्लीचे मंदिर इ.स. 1704 ते 1719 या काळात बांधले गेले असावे. हल्लीच्या देवीच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला छोटय़ा भुयारात देवीचा पलंग असून निद्रा घेत असलेल्या स्वरूपात महाकाली देवीच्या मूर्तीचे दर्शन होते. याच ठिकाणी ही मूर्ती सापडली असावी. या दोन्ही कथा लक्षात घेता कृतध्वजाचा पुत्र सुनंद याने भुयारात आढळलेली देवीची जी मूर्ती गुहेत स्थापन केली तीच खांडक्या बल्लाळ राजाला सापडली असावी.
श्री महाकाली देवीची मूर्ती रचना कशी आहे?
श्री महाकाली देवीची मूर्ती पाच फूट उंचीची असून उंच पाषाणात कोरलेली आहे. मूर्तीला शेंदूर अर्चन करण्यात आलेले आहे. मुखवटासुद्धा बसविण्यात आला आहे. तिच्या एका हातात खड्ग व दुसऱ्या हातात ढाल आहे. मंदिरात गेल्यावर सुमारे आठ-दहा पायऱ्या उतरून गेल्यानंतर गुहेसारखे दगडी गर्भगृह आहे. त्याच्या मध्यभागी श्री महाकालीची मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहाचा दरवाजा आणि मूर्ती याच्यामध्ये फार थोडे म्हणजे दोन-तीन फुटांचेच अंतर आहे. गर्भगृह हे एखाद्या गुहेसारखेच वाटते.
देवीचे मंदिर चौरस बांधणीचे व दगडी आहे. मंदिर 60 बाय 60 फुटांचे असून उंची 50 फूट आहे. त्यावर मुगल स्थापत्य शैलीची छाप आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. देवीचे गर्भगृह हे दहा फूट खोल असून 18 बाय 18 फुटांचे आहे. महाकालीची मूर्ती ही एका 3.15 मीटर बाय 1.60 मीटर बाय 1.85 मीटर आकाराच्या गुहेत स्थापित आहे. मूर्तीसमोरच्या गर्भगृहाच्या मोकळ्या जागेत महादेवाची मोठी पिंड/शिविलग स्थापित केले आहे. मंदिराच्या वर चार कोपऱ्यांवर चार घुमट आणि मध्यभागी एक मोठय़ा आकाराचा घुमट आहे. या महाकाली मंदिराभोवती मोठा परकोट असून तो इंग्रजांच्या राजवटीत सुपरिटेंडेंट कॅप्टन पिट यांनी बांधल्याचे उल्लेख आढळतात.
गोंड राजा वीरशहा याची पत्नी राणी हिराई हिने हे भव्य मंदिर बांधले असून वीरशहाच्या पराक्रमी विजयाचे प्रतीक म्हणून चत्र पौर्णिमेला महाकाली देवीच्या उत्सवाची प्रथाही सुरूकेली. तेव्हापासून चत्र शुद्ध प्रतिपदेला नवरात्राची सुरुवात होते व उत्सव आणि यात्रा सुरू होते. या यात्रा काळात महाकाली मंदिरात भक्त लाखोंच्या संख्येने येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.