आज गावचा बाजार होता. बाजारात भाजीपाला खरेदीला आलेल्या महिलांची वर्दळ जास्त होती. माझीही बाजाराची घाई सुरू होती. तेवढ्यात माझं लक्ष एकेठिकाणी झालेल्या गर्दीकडे गेल. गर्दी तशी ओळखीच्या लोकांचीच होती. त्यामुळं मनात पाल चुकचुकली आणि मी आपोआप तिकडे वळले. तिथं एक महिला भाजीपाला विकत होती. आणि तिची भाजी लवकर संपते म्हणून तिच्याकडे गर्दी होती.
त्यामागील कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा समजलं की, तिची भाजी इतर विक्रेत्यापेक्षा चविष्ट आणि पौष्टिक होती. कारण ती वैजयंती पाटीलच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय शेती करत होती. रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खते कधीही चांगलीच म्हणायची. म्हणूनच केमिकल औषदापेक्षा आयुर्वेदिक औषधे आजही जास्त प्रभावी ठरतात.सेंद्रिय खते हळूहळू फरक पडतात पण प्रभावी उत्पन्न देतात. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर करा असे सांगणारी वैजयंती जरा खासच आहे. आज जाणून घेऊया तिची कहाणी
19 मार्च 2020 रोजी लॉकडाउन पडला आणि सर्वकाही ठप्प झालं. त्याच काळात शहरात अनेक गोष्टींचा तुटवडा झाला पण खेड्यात मात्र घरी पिकवलेल्या भाज्या खाऊन लोकांचे आरोग्यही सुधारले आणि गांडूळ खत, जीवामृत यातून कमी खर्चात पिकवलेला भाजीपाला विकून अनेक महिलांचे संसार सावरले. यात मोठं योगदान आहे ते राधानगरी तालुक्यातील मल्लेवाडी गावातील वैजयंती पाटील हीच.
नमस्कार मी वैजयंती. माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. मला ३ भावंड असून आमची दोन एकर शेतीस होती. त्यात ऊस आणि भाताचे पीक घेतले जायचे. यावर आई-वडिलांनी चारही मुलांना चांगले शिकवले. स्वत:ची शेती असली तरी मी कधीही शेतीत गेले नाही. कधीच शेतातील मातीला हात लावला नाही. कारण मला शिकून शेतात राबायचे नव्हते. मला नोकरी करायची होती.
नोकरी करण्यावर मी एवढी ठाम होते की, अगदी शेतकरी नवरा नको ग बाई अस मीही म्हणत होते. मला शेतीत जाणं, काम करणं म्हणजे नको वाटायच. आई वडिलांसोबत मी कधीतरी जायचे पण तिथं जाण म्हणजे अगदी जीवावर यायचं. पण आज पूर्ण विरुद्ध मत आहे माझं. आज मी स्वतः तर शेती करतेच पण इतरांनाही फायदा व्हावा यासाठी शेती करण्याचा सल्ला देतेय.
व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या स्वयंसिद्धा संस्थेतील कांचनताई परुळेकर यांनी गावातील महिलांना पूरक उद्योगाचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यात माझी आई बचत गटाची सभासद असल्याने परुळेकर ताईंचे शिबिर ऐकायला माझी आई गेली. त्यामुळे मीही प्रशिक्षणात सहभागी झाले.
प्रशिक्षणातून गांडूळ खत, जीवामृत बनवायला मी शिकले. आधी स्वतः करावे मग जगाला सांगावे याप्रमाणे मी त्यावेळी आधी स्वत:च्या शेतात कलिंगडची लागवड केली. सेंद्रिय खते, जीवामृत यांचा वापर करून मला त्यातून भरपूर नफा मिळाला. माझं पाहून मग इतरांनीही त्याबद्दल विचारायला सुरू केलं. लोक येतील तस मी सांगत गेले आणि गावातील लोकही अशीच प्रयोगशील शेती करून नफा मिळवू लागले.
या कामात रस निर्माण झाल्यावर मी ‘बीएस्सी केमिस्ट्री’ असताना सुद्धा मी मुक्त विद्यापीठातून ‘बीएस्सी कृषी’ पुर्ण केले. गावातील शेती विकासाला चालना दिली. मी आता शेतकरी, महिला गटाला मार्गदर्शन करते. मी सुरुवात स्वतःच्या शेतीपासून केली. चारसूत्री भात लागवड, ऊस उत्पादन वाढ, गांडूळखत निर्मिती, परसबागेत १८ प्रकारच्या भाजीपाला लागवडीने महिलांना दिशा मिळाली.
माझ्याकडून प्रशिक्षण घेऊन महीलांनी लॉकडाउनच्या काळात परसबागेतील भाज्यांनी घरचे आर्थिक गणित सावरले. आरोग्यदायी भाज्या घरच्या घरी मिळाल्या आणि महिन्याला २५०० ते ३००० रुपयांचे उत्पन्न सुरू झाले. महिलांना परसबागेतून आर्थिक आधार मिळू लागला. आता गावातील महिला गटांनी स्वतः पुढाकार घेतलाय. गावातील स्वच्छता अभियान, मर्दानी खेळाला प्रोत्साहन यात वैजयंती सहभागी असते. कमी खर्चाची आरोग्यदायी शेती तिला सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे.
माझे लग्न झाले आणि मी सासरी आले. माझ्या या गावातही माझे काम सुरू आहे. काही महिला पॉझिटीव्ह रिस्पॉन्स देतात. तर काही महिलांना यात काम करायचे आहे पण त्यांचे घरचे लोक त्यांना अडवतात. मी हा प्रकल्प राबवताना आधी महिलांना एकत्र केले. १ गुंठे जमिनीवर गांडूळ खताचा वापर करून भाजीपाला पिकवला. त्यातून मिळालेले उत्पन्न पाहुन लोकांचे विचार बदलले. आधी हे काम फक्त माझ्या गावपूरत होत. पण संस्थेमार्फत मी आता कोल्हापुरातील इतर गावे, तसेच गोव्यातील म्हापसा या गावीही प्रशिक्षण देण्यासाठी जाते.
आतापर्यंत अनेक महिला या कामातून स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. वैजयंतीने आजवर हजारो लोकांना सेंद्रिय शेतीचे धडे दिले आहेत. हे काम जास्तीत जास्त लोकांनी समजून घेऊन रासायनिक खतांचा वापर कमी करावा. आणि सेंद्रीय शेतीतून फायदा मिळवावा हा माझा मानस आहे. मी यासाठीच शेवटपर्यंत काम करणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.