मूळ लेखक: मोबारक हैदर, अनुवाद (’डॉन’च्या अनुमतीने)
मूळ लेख इथे वाचू शकता
कराचीहून प्रकाशित होणार्या ’डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्रात ६ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला हा लेख (https://www.dawn.com/news/782185/a-society-at-war-with-itself) नामवंत पाकिस्तानी बुद्धिवादी लेखक श्री. मोबारक हैदर यांनी लिहिलेला असून माझ्या मते लेखकाने या लेखात व्यक्त केलेली मते आजही तितकीच लागू आहेत जितकी सहा वर्षांपूर्वी लागू होती. इतकेच नव्हे तर हीच परिस्थिती कांहीं अंशी भारतालाही लागू आहे असे मला वाटते! म्हणूनच मी हा अनुवाद इथे सादर करीत आहे. या लेखाचा अनुवाद ई-सकाळवर प्रकाशित करण्यासाठी मला (सुधीर काळे) ’डॉन’ने अनुमती दिलेली आहे.
या लेखातील सर्व मतें त्याचे लेखक श्री. मोबारक हैदर यांचीच आहेत. या लेखात आपणा भारतीयांना कांहीं वाक्ये, निवेदने नक्कीच खटकतील. उदा. भारताने पाकिस्तानवर पाच वेळा आक्रमण केले होते हा त्यांचा आरोप! आपल्याला जी माहिती आहे त्यानुसार पाकिस्ताननेच आपल्यावर प्रत्येक वेळी आक्रमण केले होते, पण हैदरसाहेबांची माहिती वेगळी आहे असे दिसते. तसेच बांगलादेशच्या युद्धाबद्दलही जे विधान आहे ते आपल्या दृष्टीने सपशेल चुकीचेच आहे. असे वाटते कीं पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानी जनतेची अशीच समजूत करून दिलेली असावी. अशा कांहीं गोष्टी सोडल्या तर लेखकाचे पाकिस्तानी समाजाबद्दलचे आत्मपरीक्षण मला फारच चांगले वाटले व ते भारताने नीट लक्ष देण्यास योग्य असून आपण तसे लक्ष देत असू अशीच आशा मी करतो. या अशा कांहीं कारणांसाठीच मी हा लेख अनुवाद करण्यासाठी निवडला आहे. तो कांहींसा बोजड भाषेतील आहे पण तरीही तो वाचकांच्या पसंतीस उतरेल अशी मी आशा करतो.
या लेखात आपण, आपल्या, आपल्याला यासारखे शब्द जेथे आले आहेत तेथे त्याचा संदर्भ पाकिस्तानी जनतेला उद्देशून आहे. आता वाचा हा लेख.
-------------------------------------------------------------
आपसातच लढण्यात मग्न असलेला पाकिस्तानी समाज
पाकिस्तानी व्यावसायिक मुस्लिम उलेमांनी [१] पाकिस्तानी जनतेच्या विचारसरणीवर इतका प्रभाव पाडलेला आहे कीं आपण आता सर्व बाबींवर धार्मिक पद्धतीनेच विचार करू लागलेलो आहोत. आपण मुसलमान जनतेवर झालेल्या प्रत्येक अत्याचाराचा चोख हिशेब ठेवतो पण मुस्लिम धर्मामागे दडलेल्या आपल्यातल्याच शत्रूकडे दुर्लक्ष करतो. पूर्वी आपण शत्रू म्हणून दोन केंद्रांकडे बोट दाखवीत असू. एक होता भारत व दुसरा होता इस्रायल, पण कालौघात अमेरिका व युरोप यांचाही शत्रूंच्या यादीत समावेश केल्यामुळे ती यादी आता वाढली आहे. आपल्या वाढत्या पांथिक विचारसरणी मुळे इराणसुद्धा आपल्यापासून दुरावत चालला आहे आणि आता आपल्याला सच्चा मित्र म्हणून एकाचाही उल्लेख करणेही अवघड होऊ लागलेले आहे. तसे पाहिल्यास सौदी अरेबिया व चीन हे दोन मित्र आपल्याकडे आहेत, पण त्याचा अर्थ फक्त ते आपले शत्रू नाहीत एवढाच आपण घेऊ शकतो! या आपल्या दोन ’मित्र’ राष्ट्रांनी आपल्या शत्रू राष्ट्रांबरोबरही उत्तम संबंध ठेवले आहेत व भारत व अमेरिका या दोन देशांबरोबरच्या आपल्या तंट्यांमध्ये व इस्रायलविरुद्धच्या आपल्या संतापाबाबतही ते आपल्याला समर्थन देत नाहींत.
आपल्या स्वातंत्र्योत्तरच्या ६५ वर्षांच्या राष्ट्रीय कालावधीत आपल्यावर भारताने पाच वेळा तर रशियाने एकदा आक्रमण केलेले आहे. तसेच ९/११च्या घटनेनंतरची गेली १२ वर्षें आपण अमेरिकेविरुद्ध ’आध्यात्मिक पातळी’वर लढतो आहोत. त्याचप्रमाणे भारताच्या आक्रमणामुळे आपण आपल्या पूर्वेकडील विभागाबरोबरच्या युद्धतही हरलो. या आक्रमणाला सार्या जगाने भारताच्या प्रचाराला बळी पडून समर्थन दिले होते. आपल्याला नेहमीच वाटत असते कीं आपलेच बरोबर असते व आपला नेहमीच छळ होत असतो!
आपण खरोखरच इतके निरागस आहोत काय किंवा इतके गांजले गेलेलो आहोत काय असे प्रश्न स्वत:ला विचारणे नेहमीच अवघड असते. अख्खे जग आपला तिरस्कार कां करते? आपले कट्टर विरोधक असलेले व आपल्या श्रेष्ठत्वाचा व उच्च गुणवत्तेचा मत्सर करणारे १०० कोटी हिंदू आपला कसा तिरस्कार करतात हेच आपण स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची ६५ वर्षें आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत आलेलो आहोत. आपण गेल्या ७०० वर्षांत या हिंदूंबरोबर मैत्री करण्यात का अपयशी ठरलो हा प्रश्न विचारणेही आपल्याकडे देशद्रोहाचे कृत्य समजले जाते!
युद्ध ही एक शोकांतिका असतेच पण एकाद्या समाजाने शत्रूबर्बोबर नव्हे तर आपापसातच लढण्यात मग्न असणे ही तर एक घृणास्पद बाबच होय. पण हे पहावयासच आपण तयार नसतो. आपण जेंव्हां इतरांचा तिरस्कार करत असतो तेंव्हांच आपल्यात एकी होते, आपण ’आम्ही’ होतो, पण जेंव्हां स्वार्थत्याग किंवा सेवा करण्याचा प्रश्न येतो तेंव्हा आपण फक्त आपल्यापुरते पहाणारी एक ’आत्मनिष्ठ’ अशी एकवचनी व्यक्ती होतो.
युद्ध ही एक शोकांतिका असते कारण युद्धात आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शक्तीचा उपयोग केला जातो व त्यात प्रचंड विध्वंस होतो. एका युद्धाचा शेवट जरी एकाच्या विजयात झाला तरी ’युद्धा’चा शेवट होत नाहींच कारण प्रत्येक युद्ध भावी युद्धाची बीजे पेरत असते. युद्धात जो पक्ष पराजित व अपमानित झालेला असतो तो पराजयाच्या जखमा कधीच विसरत नसतो हे याचे कारण आहे. त्यांच्याकडील सामूहिक आठवणी एका पिढीकडून पुढच्या पिढीला सांगितल्या जातात आणि आपल्या पराजयाचा बदला घेण्याची भावना कायमच जागती ठेवली जाते. मुस्लिम राजे व त्यांना प्रतिकार करणारा भारत यांच्यामधील युद्ध परिस्थिती आपल्या उपमहाद्वीपात अनेक शतके चालूच आहे. मुस्लिम विजेत्यांच्या एका छोट्याशा वर्गाने प्रचंड वैभव, बळ व सत्ता मिळविली, पण बहुसंख्य भारतीय जनतेला पराभवाची आणि पीडेची व्यथा या सर्व शतकात भोगावी लागली. भारतातील मुस्लिम जनतेला वृथा गर्व आणि सर्वव्यापी अज्ञान यापलीकडे या विजयापासून कांहींच मिळाले नाहीं. आपल्या दोन्ही बाजूच्या जनतेवर या इतिहासाने एक दुखरा व्रण प्रदान केला आहे. सरहद्दीच्या दोन्ही बाजूच्या बहुसंख्य जनतेला जी रेंगाळणारी दुर्दशा सहन करावी लागत आहे ती अंशत: अथवा पूर्णत: या दुखर्या व्रणामुळेच आहे. अनेक कारणांमुळे आपण पाकिस्तानी लोक या सत्याला सामोरे जावयाला नकार देत असलो तरी सत्य हेच आहे कीं भारताने आपल्या विकासाची वाटचाल १९४७ सालानंतर सुरू केली, बांगलादेशने १९७१ सालानंतर सुरू केली तर पाकिस्तानने अद्याप सुरूच केलेली नाहींय्.
अशा युद्धांमुळे मुस्लिम समाज अनेक शतकें मध्यमयुगीन मनोवृत्तीचाच राहिला. अलीगडच्या मुस्लिम विश्वविद्यालयाच्या स्थापनेनंतर त्याला आधुनिक शिक्षण मिळू लागले. तोपर्यंत त्याला फक्त आपल्या तलवारीच्या पराक्रमाबद्दलच अभिमान वाटत राहिला. पण आपण सर्व पाकिस्तानी लोकांनी या स्वत:च श्रेष्ठ मानलेल्या तथाकथित प्राचीन सांस्कृतिक गर्वापायी आलेल्या अहंकाराच्या [२] सत्यतेबद्दल कधीच आव्हान दिले नाहीं. या अहंकारातून निर्माण झालेल्या संभ्रमविकृतीमुळे [३] होणार्या व्यथांना व गोंधळांना आपल्याला तोंड देतच रहावे लागले आहे. अनेक शतकांच्या युद्धाचा वारसा आपल्याला कधीच मोकळा सोडत नाहीं. (भारत व पाकिस्तान) या दोन्ही देशांनी १९४७ पासून दर वर्षी अब्जावधी रुपये/डॉलर्स अनावश्यक असलेल्या प्रचंड सेनादलावर व हत्यारांवर खर्च केला आणि त्याच वेळी आपल्या जनतेला गुंगीत आणि वांझोट्या द्वेषातच ठेवले[३]. जो पैसा या दोन देशांनी युद्धसज्ज होण्यासाठी खर्च केला त्या पैशाचा उपयुक्तपणे विनियोग केला असता तर दोन्ही देश आज जीवनश्रेणीत व ज्ञान मिळविण्यात युरोपियन देशांच्या तोडीचे होऊ शकले असते.
युद्ध ही एक शोकांतिका असते पण जो समाज आपसात व आपल्या भोवतालच्या परिस्थितीशी लढण्यात मग्न असतो त्याच्या दृष्टीने युद्ध हे शोकांतिकेपेक्षा जास्त क्लेशदायक असते कारण त्या युद्धाला स्पष्ट उद्दिष्टही नसते किंवा त्यात पश्चात्तापही नसतो! म्हणून असे युद्ध पूर्णत: अनर्थकारकच असते! एक खास विचारसरणी असणारा आपला समाज केवळ स्वत:शीच नव्हे तर सार्या जगाबरोबर, इतर धर्मांविरुद्ध आणि स्वत:च्याच धार्मिक विविधतेविरुद्ध लढत आहे. सत्यपरिस्थितीशी असलेला संबंध तुटलेल्या माणसाला (म्हणजे schizophrenia ने पछाडलेल्या माणसाला) जसे आपला छळ होतोय् असे उगीचच वाटत असते अशा भ्रमिष्ठ, विभ्रम विकृतीकडे (paranoia) नेणारी अवस्था आहे. या मानसिक अवस्थेच्या मुळाशी अहंभाव (narcissism) असतो व आपण स्वत:बद्दल स्वत:च निर्माण केलेली ’सदाचरणी’ अशी भ्रामक प्रतिमा असते. आपल्यावर कुणी टीका केलेली आपल्याला खपत नाहीं व आपण केलेल्या चुकांचा आपल्याला कधीच खेद होत नाहीं! आपण एकाद्या अर्धवट शिक्षण घेतलेल्या कोवळ्या मुलाला त्याची चूक निदर्शनास आणून दिली तर तोसुद्धा तुमच्याशी उद्धटपणे उच्च स्वरात भांडू लागतो. ही एक आपले मन उद्विग्न करणारी परिस्थितीच आहे. कित्येक संवेदनशील देशभक्तांनी तर आपल्या देशाचे आरोग्य पूर्वस्थितीस आणण्याची आशाच सोडून दिलेली आहे. १९४७ पासून पाकिस्तान उतारावरून खाली घसरत आहे. प्रत्येक कालावधी आपल्याला अधिकाधिक वैफल्यग्रस्त व निराश करून सोडत आहे. प्रत्येक वेळी आपल्याला आपण आणखीच खाली घसरल्याची जाणीव होत आहे. पण आजच्या अपरिमित संधींच्या युगात कुठल्याही समाजाने असे स्वत:ला घसरू देणे टाळले पाहिजे. आधीच्या कालखंडात जे चुकीचे होते ते चुकीचे मानणे बरोबरच आहे पण जे चुकीचे होते ते तसेच चुकीचेच राहील असे भाकित करणेसुद्धा अयोग्यच असते. आपल्या समाजाकडे मोठ्या प्रमाणावर विद्ध्वंस करण्याची खास क्षमता आहे, ही खास क्षमता आपल्या मनाच्या दुर्दैवी मनोवृत्तीमुळे आलेली आहे हे क्षणभर मान्य करू, पण त्याच मनाकडे शास्त्र, सद्बुद्धी, सहिष्णुता व सर्वसमावेशीवृत्ती हे गुणसुद्धा आहेत. आपण त्याबाबत शांतपणे समीक्षा करून आणि इतरांनाही त्याबद्दल सांगून आपल्या होऊ घातलेल्या सर्वनाशाला थांबवू शकतो. आपल्या सभोवतालचे समाज वृद्धिंगत होत आहेत, प्रगत होत आहेत व विकसित होत आहेत. मग आपला विनाशाकडे वाटचाल करणारा समाज या चांगल्या मूळ प्रवृत्तींवर जोर देऊन चांगुलपणाकडे नेणारे आपले गुण आपण कां वापरू शकत नाहीं? आणि असा प्रयत्न करण्याखेरीज आपल्याकडे कुठला दुसरा पर्याय आहे तरी कुठे?
टीप:
[१] The professional Muslim Ulema Pakistan, a body of Muslim scholars who are recognized as having specialist knowledge of Islamic sacred law and theology.
[२] Civilizational Narcissism
[3] Tragedies of paranoia
श्री. मोबारक हैदर यांनी उर्दूत लिहिलेली “तेहजीबी नर्गीसियत” आणि “मुबालबे, मुघालते” ही पुस्तकें समीक्षणात्मक विचारपद्धतीची व स्वतंत्र चौकसवृत्तीचे पुनरुत्थान करणारी पुस्तके मानली जातात, पण उर्दू भाषेचे ज्ञान नसल्यामुळे मी त्यांचा आस्वाद घेऊ शकत नाहीं.
(लेखकाचा ई-मेल आयडी : sbkay@hotmail.com)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.