संस्थानमध्ये रामनवमी उत्साहात केल्याच्या नोंदी आहेत. राणीबाई यांच्या मृत्यूनंतर संस्थान जत संस्थानमध्ये विलीन करण्यात आले.
डफळापूर : येथील श्री राम मंदिराचा (Ayodhya Ram Mandir) कालावधी सन १६७०-१६८० सांगितला जातो. येथील श्रीराम मंदिर (Dafalapur Ram Temple) गावच्या मध्यभागी प्राचीन राजवाडा परिसरात आहे. डफळापूर व जत संस्थानचे संस्थापक सटवाजीराव चव्हाण (SatwajiRao Chavan) यांनी जत, कारजनगी, होनवाड व बारडोल प्रांताची देशमुखी प्राप्त केल्यानंतर येथे राजवाडा बांधला.
श्रीराम मंदिर याच काळात बांधले असावे. डफळापूर संस्थानच्या वार्षिक (१८५०-१९१७) अहवालात चव्हाण घराण्यातील खासगी मालकीच्या राममंदिरावर केलेल्या खर्चाच्या नोंदी आहेत. संस्थानचे शेवटचे शासक रामचंद्रराव चव्हाण (Ramchandrarao Chavan) होते. त्यांच्या मृत्यूनंतर राणीबाई चव्हाण यांनी कारभार केला. राणीबाई यांनी मंदिराभोवती १९१३-१४ मध्ये बांधकाम केल्याची नोंद आहे.
संस्थानमध्ये रामनवमी उत्साहात केल्याच्या नोंदी आहेत. राणीबाई यांच्या मृत्यूनंतर संस्थान जत संस्थानमध्ये विलीन करण्यात आले. गाडवे या मंदिराचे सध्या पुजारी आहेत. ते दररोज पूजा करतात. श्रीराम मंदिराची रचना काळ्या पाषाणात आहे. आयताकार दगडी चौथऱ्यावर चौरस गाभारा आहे. प्रवेशद्वार पूर्वेस आहे. गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणापथ व समोर प्रवेशमंडपासाठी जागा सोडली आहे. चारही दिशांना भिंती काटकोनी पद्धतीने असून गाभाऱ्यावर शिखर नाही.
उत्तरेला गर्भगृहातून देवपूजा वा अभिषेकाचे पाणी बाहेर पडण्यासाठी गोमुख शिल्प आहे. गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी दगडी पायऱ्या चढून जावे लागते. मंदिराच्या वरच्या चारही दिशेला वानरशिल्प कोरलेले असून पूर्वेस प्रवेशद्वाराजवळ डाव्या व उजव्या बाजूस प्राण्यांची शिल्पे आहेत. आतून पाहिले असता छत घुमटाकार दिसते. बाहेरून सपाट दिसते.
धनुर्धारी रुपातील श्रीराम मूर्ती आहे. उजवीकडे माता सीता व डावीकडे लक्ष्मण आहेत. लक्ष्मणाच्या डाव्या अंगाला रामभक्त श्री हनुमान मूर्ती आहे. सर्व मूर्ती या दगडी चौथऱ्यावर बसवल्या आहेत. मूर्ती शास्त्राप्रमाणे परिपूर्ण मूर्तिमंत असून क्षत्रिय शरीराचे प्रदर्शन करणारी प्रभू श्री रामाची मूर्ती विलोभनीय आहे. मूर्तीवरील कोरीव काम लक्ष वेधून घेणारे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.