दीड दिवस शाळेला जाणारे अण्णा भाऊ हे बंद खोलीत लिखाण करणारे साहित्यिक नसून, ते जनआंदोलनात सक्रिय झालेले कार्यकर्ते होते. उघड्या डोळ्यांनी समाजाचे चित्रण प्रखर भाषेत लिहिणारे लेखक होते. सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांच्या लेखणीतून प्रकट झालेले साहित्य सातासमुद्रापलिकडे पोहोचले. पोवाडे, वग, लावणी, लोकनाट्य, कथा, कादंबऱ्या व नाटके यातून कामगार, शेतकरी-शेतमजूर, उपेक्षितांचे प्रश्न मांडले म्हणून अण्णांचे साहित्य मनाला भिडत गेले.
- नितीन वसंत गोंधळे
संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय ब्ल्यू पँथर
‘मुंबई कोणाची?’ हा वाद जेव्हा निर्माण झाला, तेव्हा अण्णांनी लेखणीची तलवार करून ‘मुंबई कोणाची?’ ही लोकनाटिका लिहिली. या नाटिकेने खूप मोठे कार्य केले. अखेर मुंबई महाराष्ट्राची झाली. त्याचवेळी अण्णांनी ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली’ ही लावणी लिहिली. अण्णांनी पोवाड्यांतून, गाण्यांतून जगातल्या विविध क्रांत्या जनतेसमोर मांडल्या. ‘तमाशा म्हणजे स्त्रीच्या सौंदर्याचे मांडलेले प्रदर्शन आणि लावण्या म्हणजे त्या सौंदर्याचा केलेला उन्मादक आविष्कार’ ही व्याख्या बदलवून टाकण्याचे धाडस अण्णांनी दाखवले.
अण्णांनी आपल्या कादंबऱ्यांमधून जातिभेद, हुंडाबळी, समाजपरिवर्तनाचे विषय साध्या आणि सोप्या भाषेत मांडले. त्यांची ‘फकिरा’ खूप गाजली. ती सातासमुद्रपार गेली, अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाली. फकिरा ही कादंबरी विश्वरत्न, युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली. त्या कादंबरीला राज्य सरकारने पारितोषिक देऊन अण्णा भाऊंचा बहुमान केला. १९५८ मध्ये दलित साहित्य संमेलन आयोजित केले होते.
त्याचे अध्यक्ष अत्रे होते. पण ते न आल्यामुळे अण्णांच्या एकूण साहित्याचा विचार करून ऐनवेळी अण्णांना अध्यक्षपद स्वीकारायला लागले. अण्णा वक्ते नव्हते, पण काळजापासून बोलायचे. अण्णांनी तेथे सांगितले, ‘‘पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नाही तर ती दलित, श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे.’’ दलित, पीडित, शोषित समाजबांधवांचे आयुष्य हा एक प्रगतीचा प्रवास घडावा, सूडाचा प्रवास ठरू नये, ही इच्छा तेथे व्यक्त केली. अण्णांनी तेथे सत्य उघडपणे मांडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ‘‘स्वाभिमानाने जगा, ज्ञान घ्या, अन्यायाविरुद्ध संघर्ष करा. अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवा, हाच विषय अण्णांच्या साहित्याचा होता.’’
जग बदल घालुनि घाव।
सांगून गेले मला भीमराव ।।
असे परखडपणे लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना एकशेदोनव्या जयंतीनिमित्त कोटी-कोटी प्रणाम!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.