जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या गडाला धक्के देण्याचे त्यांचे मनसुबे आहेत.
सांगली : राष्ट्रवादीत (NCP) फूट पाडून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगली जिल्ह्यात गटाची बांधणी करण्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. इथे जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या गडाला धक्के देण्याचे त्यांचे मनसुबे आहेत, मात्र आतापर्यंत त्याला म्हणावे तसे यश आलेले नाही.
त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवत त्यांनी जिल्ह्याचे कारभारी निश्चित केले आहेत. तीन नव्या शिलेदारांची नक्कीच येथे कसोटी लागणार आहे. विट्याचे वैभव पाटील यांना जिल्हाध्यक्ष, प्रा. पद्माकर जगदाळे यांना शहर-जिल्हाध्यक्ष, तर मिरजेचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना अजित पवार गटाने अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष केले आहे.
तीनही नेत्यांचा राजकीय अभ्यास आहे, मात्र राजकीय विस्ताराच्या मर्यादा उघड आहेत. प्रा. जगदाळे यांच्यावर जयंत पाटील यांनी सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्षपद सोपवले होते, मात्र ‘साहेबांची खास मर्जी’ असलेल्या संजय बजाज यांच्यापुढे अधिकार शून्य असल्याची भावना त्यांच्यासह अनेकांच्या मनात बळावत होती. त्यातून जगदाळे सरांनी नवी वाट धरली. ‘बजाज हटाव’, असे अनेकांचे मत असताना जयंतराव ‘हमारा बजाज’ म्हणत राहिल्याने हे घडले.
मात्र, जयंतरावांचा या शहरात आणि जिल्ह्यात प्रभाव आहे. त्याला धक्का कसा देणार, हा खरा प्रश्न आहे. वैभव पाटील यांच्यासाठी विटा शहरातील सत्ता अधिक महत्त्वाची आहे. जशी ठाकरेंसाठी मुंबई, तशी पाटलांसाठी विटा, अशी स्थिती आहे. त्यामुळे वैभव यांनी वडील माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना ‘तटस्थ’ ठेवत स्वतः दादांचे बोट धरले आहे.
इद्रिस नायकवडी यांचा मिरज शहराच्या राजकारणावर प्रभाव आहे. एकेकाळी ते जयंतरावांचे अत्यंत विश्वासू होते, त्यातून महापौर झाले, मात्र पुन्हा नायकवडींना जयंतरावांनी ‘नॉट टू बी नोटीसेबल’ करून टाकले. त्यामुळे दुखावलेले नायकवडी संधी मिळताच अजितदादांचे झाले. अजितदादा गटाची तहान एवढ्याने भागणारी नाही. त्यांना ‘हेवीवेट’ नेते हवे आहेत. त्यांनी नव्या चेहऱ्यांनाही ऑफर दिली.
त्यात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा प्राधान्याने विचार केला गेला. त्यांनी अजून तळ्यात-मळ्यात भूमिका कायम राखली आहे. माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी ‘दादांशी नाते मामाचे, पण साहेब आमच्या कामाचे’ या गोंधळातून अजून बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे दादा गटाला येथे विस्तार करणे, बांधणी करणे आणि महापालिका, विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत प्रभाव दाखवणे तितके सोपे नाही, असेच चित्र आहे.
जतचे माजी आमदार विलासराव जगताप भाजपवर नाराज आहेत. आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना भाजपने ताकद दिलेली नाही. अमरसिंह देशमुख यांना दिलेले विधानसभा क्षेत्र प्रमुखपदही गोपीचंद पडळकरांनी काढून घेतले. अजितराव घोरपडे शिवसेनेत असल्याचे सांगताहेत, मात्र त्यांच्यासाठी सगळे दरवाजे नेहमीच मोकळे आहेत. या नेत्यांसाठी अजितदादा गट प्रयत्न करेल, अशी स्थिती आहे. मात्र, तूर्त भाजपला फार दुखवायचे नाही, अशी भूमिका दिसतेय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.