कोल्हापूर - प्रादेशिक आराखड्यात बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील पाणीच पळविले आहे. १७ विहिरींवरून रस्ता नेण्यात आला आहे.
ना गावात चावडीवर याचे वाचन झाले, ना ग्रामसभेत नकाशा लावला. आराखड्यावर हरकत घेण्याची मुदत संपली तरीही याबाबत काहीच माहिती नसल्याने गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. याबाबत आज गावकऱ्यांनी प्रादेशिक आराखड्याबाबत कोल्हापुरातील कार्यालयात चौकशी केल्यावर काय करायचे ते करा, आम्ही आता काहीच करू शकत नसल्याचे उत्तर मिळाले. यामुळे गावकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.
बांबवडेत साधारण चौदाशे उंबरठा आहे; तर सुमारे साडेसात हजारांहून अधिक लोकसंख्या आहे. परिसरातील चोवीस गावांसाठी येथे मुख्य बाजारपेठ आहे. जनावरांचा बाजारही येथे भरतो. येथील शेती विहिरींच्या पाण्यावर अवलंबून आहे. याच गावाच्या शेतवडीतून राष्ट्रीय महामार्ग नेण्यात येणार आहे. त्याचा सर्व्हेही येथे सुरू आहे. याबाबत गावकऱ्यांना कल्पना आहे; मात्र प्रादेशिक विकास आराखड्यात गावातील १७ विहिरी रस्त्यात जात असल्याचे समजताच गावकरी सैरभैर झाले आहेत. त्यांनी याबाबत माहिती घेतली तेव्हा ज्या बाजूने महामार्ग जाणार आहे, त्यालाच समांतर रस्ता प्रादेशिक विकास आराखड्यात दिसून येत आहे. हा रस्ता थेट गावातूनच नेण्यात आल्यामुळे विहिरींच्या बरोबर हॉटेल, गावकऱ्यांची घरेही या रस्त्यात जाणार आहेत.
आराखडा तयार करताना कोणालाही याची कल्पना दिली नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. ना तलाठी, ना कोतवाल, ना ग्रामपंचायत यांना याची कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात येते. विकास आराखड्याबद्दल आम्हाला कोणत्याही पातळीवर विश्वासात घेतले नाही. त्याची पुसटशीही कल्पना आम्हाला नाही, असे आम्ही लिहून देतो, असे तलाठी, कोतवाल, ग्रामपंचायतीतून सांगण्यात येते. गावकऱ्यांना विश्वासात न घेता झालेल्या आराखड्याची माहिती गावकऱ्यांपर्यंत पोचलीच नसल्यामुळे गावकऱ्यांच्या उद्रेक होण्याची शक्यता आहे. याबाबत हरकत नोंदविण्याची मुदत २१ जानेवारीला संपली आहे. त्यामुळे आता हरकती स्वीकारल्या जाणार नसल्याचे कोल्हापुरातील अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सांगितले.
‘पिशवी’ रस्ता रुंदीकरण गावठाण वगळून करा...
बांबवड्यातून पिशवीकडे रस्ता जाणार असल्याचे आराखड्यात दाखविले आहे. हा रस्ता सध्या दहा मीटरचा आहे. तो आराखड्यानुसार ३० मीटर केला आहे. वस्तुस्थिती पाहता गावठाणात ग्रामपंचायतीने तयार केलेले गाळे, अनेकांची घरे निघणार आहेत. त्यामुळे गावठाण वगळून रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून केली आहे. कोल्हापुरातील रस्ते प्रकल्पात कसबा बावड्यात असे झाले आहे, असेही ग्रामस्थांनी सांगितले.
चुकीचा सर्व्हे असल्याची तक्रार
पेट्रोल पंप ते पिशवी या भागात सुमारे शंभर फूट उंचीची टेकडी आहे. तेथे बायबास रस्ता दाखविला आहे. हा रस्ता करण्यापेक्षा येथे बोगदा केला तर तो स्वस्तात होईल; मात्र येथे टेकडी आहे हे सर्व्हे करणाऱ्याला माहितीच नसल्यामुळे त्याने रस्ता दाखविल्याचीही तक्रार ग्रामस्थांनी केली. हा सर्व्हे पूर्णपणे चुकीचा आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता केला आहे. त्यामुळे तो बदलावा अन्यथा रद्द करावा, अशी मगणी ग्रामस्थांनी केली आहे.
क्रीडा संकुलातून रस्ता...
बांबवड्याच्या एका बाजूला महात्मा गांधी हायस्कूल आहे. त्याच्या शेजारी तालुका क्रीडा संकुल आहे. पेट्रोल पंप ते पिशवी हा बायपास आराखड्यात दाखविला आहे. तेथे क्रीडा संकुलाच्या मधून हा ‘बायपास रस्ता’ दाखविला आहे. त्यामुळे क्रीडा संकुलसुद्धा वापरता येणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
...तर विरोध होणारच - ग्रामस्थ
रस्तारुंदीकरण आणि विकास होण्यासाठी आमची काहीच हरकत नाही; मात्र चुकी आणि आम्हाला विश्वास न घेता काही होत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. महामार्गाला समांतर रस्ता पाहिजे कशाला? तेथे गावकऱ्यांसाठी सेवारस्ता आहे. तरीही गावातील विहिरी, घरे पाडून समांतर रस्ता करणे चुकीचेच आहे. महामार्ग आणि प्रादेशिक आराखडा यांच्यात संवाद होऊन नेमके काय करणार, हे ठरले पाहिजे. गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवून विकास झाला तर तो विकास ठरणार नाही. आमची शेती विहिरींवर अवलंबून आहे. त्या बुजविल्या तर पाणी कोठून आणायचे, असाही संतप्त सवाल ग्रामस्थ विनोद चौगुले आणि भगवान चौगुले यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.