१९५३ साली नागपंचमी कशी साजरी केली जाते, याची माहिती १९५४ च्या किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध केली. त्याची चित्रफीत अमेरिकेत दाखवली. त्यानंतर नॅशनल जिऑग्राफीने शिराळ्यात येऊन पुन्हा प्रसिद्धी दिली.
Battis Shirala Nag Panchami : जिवंत नाग पूजेमुळे जग प्रसिद्ध झालेल्या शिराळच्या नागपंचमीवर (Nag Panchami) सन २००२ पासून न्यायालयाची बंधने आली असली तरी कायद्याचे उल्लंघन न करता ती शिराळकर अत्यंत उत्साहात साजरी करून आपली धार्मिकता जोपासण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत. दिवसेंदिवस ती साजरी करण्याच्या पद्धतीत बदल घडत असला तरी तरुणाईमध्ये नागपंचमीचा उत्साह कायम टिकून आहे. अवघ्या शिराळकरांच्या मनात जोश निर्माण करणारी नागपंचमी आज ही लोकोत्सव म्हणून साजरी केली जाते.
दहाव्या आकराव्या शतकात महायोगी गोरक्षनाथ महाराज लोकांचे प्रबोधन करत शिराळ्यात आले होते. श्रावण शुद्ध पंचमी दिवशी भिक्षा मागण्यासाठी ते महाजनांच्या घरी गेले. त्यावेळी एक गृहिणी मातीच्या नागाची पूजा करत होती. भिक्षा द्यायला वेळ का झाला, या गोरक्षनाथांच्या प्रश्नावर तिने नाग पूजेचे कारण सांगितले. त्यावेळी मातीच्या नागाची कशाला जिवंत नागाची पूजा करणार का, असे विचारताच तिने होकार दिला. तेव्हापासून शिराळ्यात जिवंत नागाची पूजा सुरू झाली होती. येथील भगिनी नागाला आपला भाऊ मानतात. त्याचा उपवास करतात.तो सूक्ष्म रूपाने घरात येईल, त्यास कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून नागपंचमी दिवशी स्वयंपाकात चिरणे, तळणे वर्ज्य केले जाते.
२००२ पासून शिराळच्या जिवंत नाग पूजेवर बंदी घालण्यात आली. त्यापूर्वी प्रथम नागांची अंबामाता मंदिरात नंतर घरोघरी पूजा करून ट्रॅक्टर वरून मिरवणूक काढली जात होती. आत्ता न्यायालयाने बंधने घातल्याने जिवंत नागाऐवजी नाग प्रतिमेची पूजा करून मिरवणूक काढली जात आहे. पूर्वी नागपंचमी अंबामाता मंदिर बाहेरील मोठ्या वडाच्या झाडाखाली भरत होती. बैल गाडीतून नागाची मिरवणूक काढत होते. वाहनांची सोय नसल्याने कमी लोक येत होते. १९५३ साली कै.दत्ताजीराव पोटे व इतर सहकाऱ्यांनी किर्लोस्करांना बोलावले. त्यावेळी स्वतः मुकुंदराव किर्लोस्कर, लेखक धो. म. मोहिते व छायाचित्रकार आले होते.
१९५३ साली नागपंचमी कशी साजरी केली जाते, याची माहिती १९५४ च्या किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध केली. त्याची चित्रफीत अमेरिकेत दाखवली. त्यानंतर नॅशनल जिऑग्राफीने शिराळ्यात येऊन पुन्हा प्रसिद्धी दिली. त्यानंतर या नागपंचमीचा जगभर लौकिक वाढला.
येथील कोतवाल कुटुंबीय चवळी, मेथी, शेपू, तांबडा, भोपळा, भोपळीची भाजी, राजगिरा, शेवगा, वांगी, दोडका, भेंडी, गवारी, श्रावण घेवडा, वाटणा, वरणा, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, मुळा, आळूवाडी, बिन, लोणचे, अशा २१ भाज्यांचा नैवेद्य नागाला दाखवतात.
कोतवाल कुटुंबातील महिला सकाळी सहा वाजता वारुळ पूजा करून नंतर अंबाबाईच्या पूजेला जातात. त्यानंतर घरी आल्यावर नागाच्या तुळईची पूजा करतात. रामचंद्र व तुकाराम कोतवाल यांच्या घरात एक वर्षी कुठेच नाग सापडला नाही. नैवेद्य तयार होता, पण नाग नसल्याने नैवेद्य कोणाला दाखवायचा या विवंचनेत कुटुंब असताना अचानक तुळईवर नाग आला. ठिकाणी नागाची पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला. अशी आख्यायिका आहे. त्यावेळे पासून अद्याप नागाची तुळईची म्हणून पूजा केली जात आहे. येथील मातीच्या मनाच्या नागाची पूजा केल्या शिवाय महिला उपवास सोडत नाहीत.
कोतवाल कुटुंबीय नाग नागपंचमी दिवशी मातीचा नाग आंबामाता मंदिरात पूजनासाठी घेऊन जात. त्यानंतर इतर लोक पूजा करता. पालखीसमवेत नाग घेऊन जाण्याचा संदीप कोतवाल, सागर कोतवाल, मनोज कोतवाल, विशाल कोतवाल, सचिन कोतवाल, भिवा कोतवाल, अतुल कोतवाल, बाळू कोतवाल, महादेव कोतवाल, विजय कोतवाल, दाजी कोतवाल, यांचा मान असतो.भोई समाजाकडे पालखीचा मान आहे.
नागपंचमीची माहिती १९५४ च्या किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध झाली.त्याची चित्रफीत अमेरिकेत दाखवली. त्यानंतर नॅशनल जिऑग्राफीने शिराळ्यात येऊन पुन्हा प्रसिद्धी दिली. द वॉर क्रु या अमेरिकेतील दैनिकात ३१ ऑगस्ट १९५७ ला, अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या द विंन्चेस्टर स्टार या वृत्तपत्रात ही १ ऑक्टोंबर १९७० ला, १९८२ व १९८६ मध्ये इंग्लंड मधून प्रसिद्ध होणाऱ्या द टाईम्स या वृत्तपत्रात तर जॉर्डन टाईम्स या सौदी अरेबियातून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकातून १९८६ ला नागपंचमी बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे परकीय पर्यटकांचा ओघ शिराळ्यात वाढला होता.नॅशनल जिऑग्राफी, डिस्कव्हरी अॅनिमल प्लॅॅनेट या इंग्रजी वाहिन्यांवर नागपंचमीचे चित्रीकरण दाखवण्यात आले आहे.
गावोगावी गणेश मंडळे असतात त्या प्रमाणे शिराळा येथे ६५ ते ७० नाग मंडळे आहेत. या मंडळाच्या माध्यमातून नागपंचमी साजरी केली जाते.पूर्वी एक महिना अगोदरच बेंदूर सणा पासून अंबामाता मंदिरात नारळ फोडून नाग पकडण्यास सुरुवात केली जात होती. नागपंचमी निमित्त शिराळ्यात उंच उभा राहणारा नाग,जाड नाग,उत्कृष्ट नाग,अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जात होते.नागपंचमी नंतर आणलेल्या ठिकाणी नागांना सोडले जात होते. पण आता नाग पडण्यास बंदी आहे. त्यामुळे फक्त प्रतीकात्मक नागाची मूर्ती ठेवून मिरवणूक काढली जाते.
शिराळा येथील शिवभवानी व शिवशंकर या मंडळास सलग ११ वर्षे एकच नाग सापडत होता.त्याचे नाव चित्र्या ठेवण्यात आले होते. गजाभाऊ पाटील यांना सलग चार वर्षे एकाच नाग सायंकाळी सापडत होता. राजू हिरवडेकर यांना सलग तेरा वर्षे व इतर मंडळांना दोन वर्षे असा एकच नाग एकूण १५ वर्षे सापडत होता. त्याचे नाव लांडा नाग ठेवण्यात आले होते. त्याचे बीळ कधी फोडले जात नव्हते . तो बिळातून बाहेर आल्या नंतर त्यास पकडले जात होते.
शेतात अथवा रस्त्यावर अपघात होऊन नाग अथवा इतर साप जखमी झाल्यास शिराळकर त्याच्यावर अजून ही उपचार करून तो वन विभागाच्या निगराणीखाली ठेवतात. बरा झाल्यानंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडतात. शिराळा परिसरात कोणत्या ही गावात कोणाच्या घरी नाग आढळून आल्यास त्यास पकडून शिराळकर नैसर्गिक अधिवासात सोडतात.
जिवंत नागपूजेवर बंदी आल्याने शिराळ्यात घरोघरी प्रतीकात्मक नागपूजा होते. ट्रॅक्टरवर ही प्रतीकात्मक नाग ठेवून मिरवणूक काढतात. या नागपंचमीला लाखो रुपयांची खाद्य पदार्थ, पाळणे, खेळणी, मेवा मिठाई दुकाने या माध्यमातून उलाढाल होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.