बेळगाव : विद्यार्थ्यांमधील कुपोषण कमी करण्यात सरकारचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसत आहे. गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यातील कुपोषित मुलांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. सध्या बेळगाव जिल्ह्यात ३२,७६७ मुले कुपोषित असून त्यांतील ६२३ मुले गंभीर कुपोषित आहेत. सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्यात ५८६ मुले गंभीर कुपोषित होती. त्यात ३७ ने वाढ झाली आहे.
मुलांचे चांगले पोषण व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. या योजनांसाठी दरमहा कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीही मुलांमधील कुपोषण कमी होताना दिसत नाही. कुपोषित मुलांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक बनले आहे. बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात ५,३३१ अंगणवाडी केंद्रे आहेत. या केंद्रांमधून गर्भवती महिला व मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आणि अंडी वितरण केले जाते. मात्र, अनेक अंगणवाड्यांमध्ये धान्य वजन करण्याचे यंत्र उपलब्ध नाही.
त्यामुळे, किती साहित्य वाटप केले जाते, याची कोणतीही नोंद केली जात नाही. तसेच धान्याचे योग्य प्रकारे वाटप केले जाते की नाही याकडेही लक्ष दिले जात नाही. कुपोषित मुलांना पौष्टिक आहार आणि योग्य आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यातील कुपोषण वाढत आहे.
जिल्ह्यातील गंभीर व अल्प कुपोषित मुलांपैकी २५ हून अधिक मुलांना एनआरसी केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मात्र, सरकारने कुपोषण का वाढत आहे, याची चौकशी करून भविष्यात कुपोषित मुलांची संख्या वाढणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणात खर्च करूनही कुपोषणाची समस्या दूर होणार नाही.
दक्षता घेऊनही
जिल्ह्यातील कुपोषित मुलांची माहिती दरमहा संकलित केली जात आहे. कुपोषित मुलांना अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून पौष्टिक आहार पुरविला जातो. मुलांमधील कुपोषण कमी व्हावे यासाठी विशेष उपक्रम राबविण्याची ग्वाही महिला व बाल कल्याण खात्याकडून दिली जाते. तरीही कुपोषण वाढत असल्याचे दिसत आहे.
‘कुपोषणात थोडी वाढ झाली आहे. दरवेळी मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यातील कमतरतेनुसार पोषण आहार दिला जातो. तरीसुद्धा कुपोषण वाढल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत.’
- श्री. लोकेश, अधिकारी, महिला-बालकल्याण खाते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.