नगर : कोरोना संसर्गाच्या भीतीने अनेक घरकारभारणींनी घरगुती कामासाठी येणाऱ्या महिलांना सुटी दिली खरी; मात्र आता घरातील कामे आवरताना त्यांची पुरेवाट झाली आहे. त्यातून घरातील महिलांची चिडचिड वाढली असून, पूर्ण कुटुंबच त्यांनी घरातील कामाला जुंपल्याचे चित्र आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात 21 दिवसांसाठी संचारबंदी सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता, शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे बहुतेक कुटुंबे घरातच स्थानबद्ध झाली आहेत. त्यातून घरात पसारा वाढल्याने घरकारभारणींचा संताप होत आहे. एरवी, घरकाम करणाऱ्या महिलेला एक-दोन दिवसांसाठीची सुटी देतानाही कानकूस केली जाते. मात्र, कोरोनाच्या भीतीने घरकारभारणीने आता तिला अनिश्चित काळासाठी सुटी दिली आहे. त्यामुळे घरातील सर्व कामाचे ओझे तिच्या एकटीच्या खांद्यावर पडले आहे. मोठे घर आवरता आवरता तिच्या नाकीनऊ आले आहेत. दुसरीकडे, हातावर पोट असणाऱ्या, घरकाम करणाऱ्या अनेक महिलांचीही अडचण झाली आहे. हाताला काम नसल्याने पैशांची चणचण भासत आहे. मालकीणबाई कधी कामावर बोलाविते, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
रोजची धुणी-भांडी, साफसफाई करताना महिलांची चिडचिड होत आहे. त्यात सगळे सदस्य एकाच वेळी घरात थांबल्याने कामाचा व्यापही वाढला आहे. अशा वेळी घरकाम करणाऱ्या महिलेची तिला सातत्याने आठवण होत आहे. अखेर तिने घरातील प्रत्येक कामाची वाटणी केली आहे. घरातील प्रत्येक सदस्यालाच कामाला जुंपले आहे. अर्थातच, त्यातूनही काही जणांनी हुशारीने अंग काढून घेतल्याचे दिसते. काही तरी बहाणा करून हे सदस्य काम आटपेपर्यंत तेथून काढता पाय घेत आहेत.
घरकारभारीही लागले कामाला
एरवी हातातला ग्लास जागेवर नेऊन ठेवण्यास टाळाटाळ करणारे घरकारभारीही आता कामाला लागले आहेत. अर्धांगिनीच्या कष्टाची जाणीव ठेवून तिला मदत करीत आहेत. स्वत:हून कामाचा वाटा उचलत आहेत. मनासारखे काम न झाल्यास, कारभारणीची बोलणी निमूटपणे ऐकत आहेत. एक मात्र खरे; कोरोनाच्या निमित्ताने सगळे कुटुंब कधी नव्हे ते एकत्र आले आहे. सगळे सदस्य एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतात, टीव्ही पाहतात. विविध खेळ खेळतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.