नगर : सकाळ सोशल फाउंडेशनतर्फे सोमवारी (ता. नऊ) आयोजित करण्यात आलेल्या "थोड्या गप्पा-थोडी गाणी' कार्यक्रमात रसिक नगरकर अक्षरश: मंत्रमुग्ध झाले. गाणी आणि त्या गाण्यांचा इतिहास, या पलीकडे जाऊन जीवनातील विविध पैलू उलगडणारे संवाद व त्याला साजेशी सुरेल गाणी यांनी श्रोते भारावून गेले.
"सांज ये गोकुळी,' "कितीदा नव्याने तुला आठवावे,' अशा गाण्यांनी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. "भय इथले संपत नाही,' "ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' या कवी ग्रेस यांच्या कवितांचा भावार्थ ऐकताना कित्येकांचे डोळे पाणावले. "बगळ्यांची माळ फुले,' "आज जाने की जिद ना करो' या गाण्यांना रसिकांचा विशेष प्रतिसाद मिळाला.
प्रसिद्ध युवा व्याख्याते गणेश शिंदे यांनी आपल्या खुमासदार शैलीने सभागृह खिळवून ठेवले. शिंदे यांनी रोजच्या जीवनातील विविध विषयांना स्पर्श करीत, काही पौराणिक दाखले देत, तर कधी प्रसंगावधान साधत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर केलेले भाष्य, अशा विविध अंगांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. शिंदे यांच्या पत्नी व गायिका सन्मिता शिंदे यांनी गायिलेल्या "अवघा रंग एक झाला' या रचनेने कित्येकांचे डोळे पाणावले.
हेही वाचा ः महापालिकेकडून न्यायालयाचा अवमान
गायक व व्याख्यात्यांनाही वाद्यवृंदाची सुरेख साथ मिळाली. त्यात पखवाजावर सचिन इंगळे, तबल्यावर चेतन ताम्हनकर, तसेच गायनात धनंजय पवार, सिंथेसायझरवर मकरंद पंडित, ऑक्टोपॅडवर ऋतुराज कोरे व हार्मोनिअमवर ऋतुजा पाठक यांची साथ लाभली.
हेही वाचा ः डाॅक्टरकडे मागितली दहा लाखांची खंडणी
जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंक, स्वीट होम, व्यंकटेश मल्टिस्टेट यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. "डिझाइन ऍडिक्ट' यांनी ब्रॅंडिंग पार्टनर म्हणून सहभाग घेतला. "ए. एस. के. ड्रीम' यांचेही विशेष सहकार्य लाभले.
"सकाळ'चे कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका मांडली. प्राथमिक शिक्षक बॅंकेतर्फे बापू तांबे, व्यंकटेश मल्टिस्टेटचे अध्यक्ष अभिनाथ शिंदे, प्रशांत जाधव, जनार्दन लिपने, गणेश भुतारे, राजू ढोरे आदी उपस्थित होते. "डिझाइन ऍडिक्ट'चे संचालक ज्ञानेश शिंदे, नाट्य परिषदेच्या नगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले यांचे विशेष परिश्रम लाभले. उद्योजक धनेश बोगावत यांनी स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.