नगर ः महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने नगररचना विभागाची परवानगी नसलेल्या जिल्हा क्रीडा संकुलातील दोन इमारती जमीनदोस्त केल्या. या दोन्ही इमारतीतील गज, ऍल्युमिनियम व लोखंडी पट्ट्या, विजेच्या तारा, शटर असे साहित्य मिळविण्यासाठी सुमारे 70 जणांचा घोळका जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात फिरत आहे.
कारवाई सुरू झाल्यापासून रात्रंदिवस लोखंडी साहित्य नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भंगार गोळा करणाऱ्यांना पळवून लावण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अखेर आज हाती काठ्या घ्याव्या लागल्या. भंगार गोळा करण्यासाठी येणाऱ्यांमध्ये महिला व अल्पवयीन मुलांचीच संख्या जास्त आहे.
हेही वाचा ः (व्हिडिओ) सोमलवाडीचा वळू ठरला "चॅम्पियन'
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची गेल्या पाच दिवसांपासून जिल्हा क्रीडा संकुलात कारवाई सुरू आहे. दोन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. शहराच्या इतिहासात अतिक्रमण निर्मूलन विभागाने केलेली ही सर्वांत मोठी कारवाई समजली जात आहे. 57 हजार 500 चौरस फुटांचे बांधकाम पाडण्यात आले. या इमारतीच्या मलब्यात गज, खिडक्यांच्या ऍल्युमिनियम व लोखंडाच्या चौकटी, लोखंडी शटर, तांब्याच्या तारा असे भंगारात सहज विकले जाईल असे साहित्य मोठ्या प्रमाणात आहे. शहरात सध्या 17 रुपये किलो दराने लोखंडाचे भंगार विकले जात आहे. हजारो किलो लोखंड या मलब्यात आहे. त्यामुळे भंगार गोळा करणारे कारवाईच्या पहिल्या दिवसापासून जिल्हा क्रीडा संकुलात तळ ठोकून आहेत. पहिल्या दिवशी सुमारे दहाच लोक भंगार वेचण्यासाठी आले होते. मात्र, जास्त भंगार मिळत असल्याचे पाहून त्यांची संख्या वाढली.
हेही वाचा ः धरणे भरली तरी शेतकरी अडचणीतच
सोमवारी (ता. 16) दोन्ही इमारती जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून इमारतीचा भाग तुटून पडण्याचा धोकाही उरलेला नाही. त्यामुळे भंगार गोळा करण्यासाठी सुमारे 70 लोकांचा जमाव जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात फिरत आहे. या इमारती पाडल्यामुळे दोन दिवसांपासून पोलिस बंदोबस्तही महापालिकेने घेतलेला नाही. याचा फायदा सध्या भंगार व्यावसायिकांकडून घेतला जात आहे. भंगार नेण्यासाठीची वाहने जिल्हा क्रीडा संकुलापासून सुमारे 100 मीटर दूर थांबत आहेत. हे लोक पोत्यात भंगार आणून वाहनात टाकतात. त्यात महिला व अल्पवयीन मुलांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हातात काठ्या असूनही महापालिका कर्मचाऱ्यांना कठोर कारवाई करता येत नाही.
रात्रीस खेळ चाले
महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक आपली कारवाई दिवस मावळताच थांबविते. पथकातील लोक घरी जाताच भंगार वेचणारे मलब्याचा ताबा घेत आहेत. जेवढे शक्य होईल तेवढे लोखंड वाहनांत टाकून नेले जात आहेत. आज पहाटे सुमारे दहा वाहनांत भंगार उचलून नेल्याची चर्चा जिल्हा क्रीडा संकुलात होती.
हातात काठ्या घेण्यास सांगितले
जिल्हा क्रीडा संकुलात कालपासून भंगार गोळा करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यांना इमारतीच्या मलब्यापासून दूर ठेवण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना हातात काठ्या घेण्यास सांगितले आहे.
- सुरेश इथापे, उपअभियंता, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.