Elephants spotted in Dodamarg Sindhudurg historic event save elephants sakal
पश्चिम महाराष्ट्र

दोडामार्ग : पोटासाठीच कर्नाटकातून सिंधुदुर्गात

अन्न, पाण्यासाठी हत्तींची भटकंती; महाराष्ट्राचे वैभव, भविष्यात जगवण्याची गरज

प्रभाकर धुरी - सकाळ वृत्तसेवा

दोडामार्ग: कर्नाटकातून सिंधुदुर्गात हत्ती आले ते अन्न आणि पाण्याच्या शोधात. कर्नाटकात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे ऑक्टोबर २००२ मध्ये त्यांची पावले महाराष्ट्राकडे वळली. तिलारीचा अथांग जलाशय आणि बुडित क्षेत्राबाहेरील घनगर्द जंगल, त्यातील विपुल खाद्य यामुळे ते इथे आले आणि स्थिरावले; पण जसजसे त्यांना खाद्य कमी पडू लागले तसे त्यांनी जिल्ह्यातील अनेक गावांकडे, शेती बागायतीकडे आपला मोर्चा वळवला. इथला माणूस, निसर्ग आणि हत्ती एकमेकांच्या इतके जवळचे झालेत की आता आपणच त्यांना ‘जगा आणि जगू द्या,’ असे म्हणण्याची गरज आहे.

गेल्या एकोणीस वीस वर्षात हत्तींनी कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. शेतकऱ्यांना त्याची भरपाईही देण्यात आली. अनेकांनी वनकर्मचाऱ्यांना धाकदपटशा दाखवून खोटे पंचनामे करून लाखो रुपये उकळले. त्यातून अनेकांचे टुमदार बंगलेही उभे राहिले. काहींनी तिलारी प्रकल्पाच्या संपादित जागेत अतिक्रमण करून लागवड केलेल्या केळीच्या बागांच्या नुकसानीपोटी लाखो रुपये शासनाची फसवणूक करून घेतले. अनेकांनी हत्तीच्या संकटाचा उपयोग संधी म्हणून करून घेतला. हत्तींच्या भविष्याचा मात्र फारसा विचार कुणी केला नाही. तो करण्याची नितांत गरज आहे.

हत्तीला आवश्यक खाद्य आणि पाणी कायमस्वरुपी मिळण्यासाठी सरकार, वनविभाग आणि स्थानिकांनी प्रयत्न करायला हवे. उपवनसंरक्षक शहाजी नारनवार वन्यजीव आणि वनसंपदा जतन करण्यासाठी सकारात्मक आणि भरीव काम करत आहेत. त्यांना सर्वांनी साथ देण्याची गरज आहे. हत्ती सिंधुदुर्गला लाभलेली दैवी देणगी आहे. हत्ती महाराष्ट्राचे वैभव आहे. त्याला सांभाळण्यासाठी जसे प्रयत्न आवश्यक आहेत तसेच त्याला मानवी वस्तीपासून, शेती बागायतीपासून दूर ठेवण्यासाठी उपाययोजनाही आवश्यक आहे. हत्तीला लागणारे खाद्य मुबलक प्रमाणात मिळावे म्हणून वनक्षेत्रात, पडीक जमिनीत आणि आपल्या शेती बागायतीच्या कुंपणावर भेडले माड मोठया प्रमाणावर लावायला हवेत. हत्तीला भेडले माड खूप आवडतात. ते मिळाले तर हत्ती केळी, कवाथे आणि सुपारी, भातपीक याचे फारसे नुकसान करणार नाही. श्री. नारनवार यांनी तिलारी हत्तीबाधित क्षेत्रात सहा हजार भेडले माडाची रोपे लावली आहेत. आणखी वीस हजार रोपे त्यांच्याकडे तयार आहेत. शेतकऱ्यांनाही ते रोपे द्यायला तयार आहेत. त्यांनी ती हत्तीबाधित क्षेत्रात लावल्यास हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीत नक्कीच घट होणार आहे.

हत्तींना रोखण्याचा दुसरा पर्याय आहे मधमाशा पालन. श्री. नारनवार यांनी नुकतेच बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. जवळपास साडेतीनशे पेट्याही त्यांनी वाटल्या आहेत. प्रत्येक लाभार्थ्याला दहा पेट्या दिल्या आहेत. त्यातून हत्तींना शेतीबागायती आणि वस्तीपासून दूर ठेवायचे आणि मध विक्रीतून शेतकऱ्यांनी अर्थार्जनही करायचे असा दुहेरी विचार श्री. नारनवार यांना साध्य करायचा आहे. शेतकऱ्यांनी हत्तीबाधित क्षेत्रात, पडिक जमिनीत खैराची लागवड करणे दुहेरी फायद्याचे आहे.

शिवाय बांबू, कणक, काटेरी बांबू यांची बांधावर लागवड केली की हत्तींसह इतर वन्यप्राण्यांचा उपद्रव कमी होणे शक्य आहे. हत्ती इथे स्थिरावले आहेत. त्यांना आपण कर्नाटकात परत पाठवले तरी ते पुन्हा नक्की येतील; नव्हे आलेही आहेत. हत्तींची स्मरणशक्ती तीव्र असल्याने मागील पिढ्यांमधील आठवणी आनुवंशिकतेने पुढील पिढ्यात संक्रमित होत असतात. त्यामुळे पन्नास- शंभर वर्षापुर्वी ज्या वाटेने हत्ती आलेले असतात त्याच वाटेने पुढच्या पिढीतील हत्ती प्रवास करतात. याचाच अर्थ यापुढेही हत्ती सिंधुदुर्गात येत राहतील यात दुमत नसावे. त्यामुळे आपण आता हत्तींसोबत जगणे शिकून घ्यायला हवे. वन्यप्राण्यांना सीमा माहीत नसतात. त्यांना पोटापाण्यासाठी पायपीट तेवढीच माहीत असते.

चला हत्ती वाचवूया

हत्तीची गर्भावस्था अठरा ते बावीस महिन्यांची असते, तर दोन पिल्लांच्या जन्मामधील अंतर सहा वर्षांचे असते. त्यामुळे हत्तीचा जन्म जितका आनंददायी असतो तितका त्याचा मृत्यू हानिकारक असतो. गेल्या एकोणीस वर्षांत आपल्याकडील आठ ते नऊ हत्तींचा मृत्यू झाला आहे. हत्ती जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक असल्याने हत्ती जगवणे आणि नव्या हत्तींना या जगात सुखरूप येऊ देणे पर्यावरण समृद्धीसाठी आवश्यक आहे. दुर्दैवाने विविध वापरासाठी हस्तिदंत वापरले जात असल्याने हत्तींची शिकार मोठया प्रमाणावर होत आहे. दर पंधरा मिनिटाला जगात एका हत्तीची हत्या होते, जी चिंताजनक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जिल्ह्यातील हत्ती वाचविण्यासाठी पुढे यायला हवे.

हत्तींची किंमत कळण्याची गरज

हस्तिदंताच्या तस्करीची सर्वात मोठी बाजारपेठ चीनमध्ये सक्रिय आहे. तथापि, चीनने अलीकडेच हस्तीदंताच्या व्यापाराला पहिल्यांदाच अधिकृतपणे बंदी आणली आहे. तस्करीमुळे दहा लाखांच्या जवळपास असलेले हत्ती आता ४ लाखांवर आले आहेत. त्यामुळे हत्तींना वाचविण्यासाठी एकत्र या, अशी साद चीनने घातली आहे. जगभरातील अनेक सेलिब्रेटी त्या चळवळीत सहभागी झाले आहेत. एवढेच नव्हे; तर चीनने देशातील हस्तींदताचे १७२ कारखाने बंद केले आहेत. हाँगकाँगने हस्तीदंताच्या वापरास बंदी घातली आहे. सिंगापूरमध्येही हस्तीदंताबद्दल गांभीर्याने विचार सुरू आहे. तैवान हस्तिदंताला बंदी आणण्याच्या विचारात आहे. थायलंडमधील हस्तीदंताची विक्री तर गेल्या दोन वर्षांत ५८ टक्क्यांनी घटली. व्हिएतनामने वन्यजीव तस्करी रोखण्यासाठी कठोर नियम केले आहेत. जगाला हत्तींची किंमत आता कळू लागली आहे. ती आम्हालाही उशीर होण्याआधी कळण्याची गरज आहे.

हत्तींची संख्या

कर्नाटक - ६०४९

आसाम - ५७१९

केरळ - ३०५४

अंदमान निकोबार - २५

दक्षिण बंगाल - १९४

बिहार - २५

मणिपूर - ९

मिझोराम, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश - प्रत्येकी ७

महाराष्ट्र - ६ (संख्या अधिक असण्याची शक्यता)

-भारतामध्ये २७ ३१२ आशियायी हत्ती असल्याची माहिती मिळते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT