Dr. Shantanu Abhyankar Satara 
पश्चिम महाराष्ट्र

फाशी, नराधमच्या चर्चेत दुर्दैवाने "हा' मुद्दा बाजूलाच 

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, जि.सातारा

सातारा : वेळोवेळी उघडकीस येणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. पण, यावर दीर्घमुदतीचा आणि सर्वात परिमाणकारक उपाय म्हणजे, मुलामुलींना अगदी शालेय जीवनापासून लैंगिकता शिक्षण देणे. दुर्दैवाने "फाशी', "नराधम', "हिंसा' वगैरेच्या चर्चेत हा मुद्दा बाजूलाच राहतो. 

लैंगिकता शिक्षणाला नाव काहीही द्या. "जीवन शिक्षण' म्हणा, "किशोरावस्था शिक्षण' म्हणा किंवा आणखी काही म्हणा. पण, व्हॉट्‌सऍप, फेसबुक आणि इंटरनेटच्या जमान्यात पुढच्या पिढीपर्यंत, या बाबतीतली अत्यंत विपर्यस्त, चुकीची आणि चुकीच्या स्रोतांद्वारा पसरवली जाणारी माहिती सदासर्वदा पोहोचत असते. ती थोपवणे आता सरकार, पालक, शिक्षक, शाळा कोणालाच शक्‍य नाही. तेव्हा योग्य त्या वयात, योग्य त्या स्रोतांकडून, योग्य ती माहिती उपलब्ध होईल अशी व्यवस्था करणे, एवढेच आपण करू शकतो. दोन्हीतलं काय निवडायचं हा अर्थात ज्याच्या त्याच्या सद्‌सद्विवेकबुद्धीचा प्रश्न राहील. 

लैंगिकता तुमचं सारं सारं व्यापून असते 
वास्तविक हाच मुद्दा इथे सर्वात महत्वाचा आहे. हा सद्‌सद्विवेक जागृत ठेवणे हे ही या अभ्यासक्रमाचं काम आहे. हे लैंगिक शिक्षण नाहीच. हे "लैंगिकता' शिक्षण आहे. Sex आणि Sexuality असा हा फरक आहे. Sex (समागम) ही शरीर क्रिया झाली. Sexuality (लैंगिकता) ह्याला मानसिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक, नीतीविषयक अशी इतरही अनेक अंग आहेत. लैंगिकता ही तुमचं बाल्य, तारुण्य, वार्धक्‍य हे सारं सारं व्यापून असते. समागमातून एखादा ब्रम्हचारी सुटका करून घेईलही स्वतःची पण लैंगिकतेतून त्याचीही सुटका नाही.

लैंगिकता शिकवणं हे ही एक कौशल्य

शरीरातील, मनातील नैसर्गिक बदल हे थोपवता येत नाहीत. त्यामुळे कोंबडं झाकलं तरी उजाडायचं राहत नाही. तेव्हा लैंगिकता शिक्षणाला पर्याय नाही. ही शाळेची, कॉलेजचीच जबाबदारी आहे. "पप्पा, "फक यू' म्हणजे काय हो?' अशा प्रश्नांनी गांगरणारे मम्मी- पप्पा ह्या कामी कुचकामी आहेत. लैंगिकता शिकवणं हे ही एक कौशल्य आहे. ते शिक्षकांना सहजप्राप्य आहे. आईबाबांना नाही. तेव्हा शिक्षकांचीच ती जबाबदारी आहे. ह्यात स्त्री-पुरुष समानता, प्रेम आणि त्याचा अर्थ, परस्परांबद्दल आदर, जोडीदाराची निवड, हुंडा, बालविवाह, स्त्रीभृणहत्या, लैंगिक व्यवहाराबद्दल समज गैरसमज, जबाबदार पालकत्व, लैगिक आरोग्य, लैंगिक शोषण, गर्भनिरोधन असे अनेक विषय येतात. 


तुम्ही हे शिकवायला यायला हवं होतं

 
लैंगिकता शिक्षण म्हटलं की लोक दचकतात. जरा हळू बोला म्हणतात. त्यांना असं वाटतं, की हा माणूस आता समागमाची सचित्र माहिती देणार. (ह्यांचीच पोरंपोरी समागमाची चित्रफीत मोबाईलमधे बघत असतात ते ह्यांना दिसत नाही.) काही तरी असभ्य, अश्‍लील, अचकट विचकट बोलणार. पण, इथेच सगळं चुकतं. असभ्य, अश्‍लील, अचकट विचकट बोलण्यापासून ते नृशंस लैंगिक अत्याचारापर्यंत घडणाऱ्या घटना या लैंगिक शिक्षण दिल्यामुळे घडत नाहीत; तर बऱ्याचदा ते नं दिल्यामुळे घडतात. अगदी प्रत्येकवेळी शाळा-महाविद्यालयांमध्ये या विषयावर कार्यशाळा घेतल्यावर, उपस्थित शिक्षक खिन्न मनानी येऊन सांगतात, "आम्ही शाळेत असताना तुम्ही हे शिकवायला यायला हवं होतं.' 

वयात येणं म्हणजे नुसतं... 


लोकांना वाटतं की हे "ज्ञान' प्राप्त झालं की ते वापरण्याचा जास्तच मोह होईल. खरंतर मोह, उत्सुकता, जिज्ञासा हे सारं असतंच. वयानुरूपंच आहे हे. अज्ञानात ते उलट जास्त फोफावत. त्याचं तण माजतं. ब्लू फिल्म्स, गावगप्पा यातून "माहिती' प्राप्त होण्यापेक्षा, "ज्ञान' प्राप्त झालं तर या साऱ्याला जबाबदारीचं कोंदण मिळतं. हे कोंदण देण्याचं काम लैंगिकता शिक्षणात अभिप्रेत आहे. वयात येणं म्हणजे काही नुसतं दाढी-मिशा फुटणं किंवा पाळी येणं नाही. वयात येण्यामधे स्वतःची मूल्य ठरवणं, स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी घेणं, हेही आलं. शिक्षणाने हे दुष्कर काम सुकर नाही का होणार? 


लैंगिक वर्तन हे शिक्षणानी सुधारत 

जगभरातल्या अभ्यासात असं दिसून आलंय की तरूणांचं लैंगिक वर्तन हे शिक्षणानी सुधारतं, बिघडत नाही. या शिक्षणानी माणसं बिघडतील असं म्हणणं म्हणजे भाषेच्या अभ्यासानी माणसं फक्त उत्तमोत्तम शिव्या देतील, असं म्हटल्यासारखं आहे. उलट भाषेवर प्रभुत्व असेल तर शिव्या न देताही अगदी तोच परिणाम साधता येतो. शेवटी तुम्ही काय आणि कसं शिकवता हे महत्वाचं आहे. शिक्षण हे दुधारी असतं. इतिहास शिकवता शिकवता द्वेषही पसरवता येतो हे मान्यच आहे की. पण, यावर उपाय लैंगिक शिक्षणावर बंदी हा असूच शकत नाही. अभ्यासक्रमाची अधिकाधिक सुयोग्य रचना हा असू शकतो. 


यावर लैंगिकता शिक्षण हा उपाय 

ज्या वयात अभ्यास आणि करीअर घडवायचं त्या वयातच हे पुढ्यात येतं. विकृत पोर्नक्‍लिप्स, मुलींबद्दल गलीच्छ शेरेबाजी, स्वतःची "पुरुषी' प्रतिमा जपण्यासाठी व्यसनांची साथ, वेश्‍यागमन, असे अनेक भाग ह्यात असतात. पुढे स्वतःबद्दल नकारात्मक भावना, अपराधगंड यांनी अभ्यास पार उद्‌वस्त होतो. यावर लैंगिकता शिक्षण हा उपाय आहे. ह्या निसरड्या वाटेवर शिक्षण तुमचं बोट धरून नेतं तुम्हाला. तुमचा हात धरून चालतं. तुमचं पाउल वाकडं पडेल ते शिक्षणाच्या अभावानी. 


लाज, संकोच बहुतेकदा पालकांच्या मनात 

बरेच पालक म्हणतात, "हे असलं काही मुलांना सांगायचं, म्हणजे त्यांना आमच्याबद्दल काय वाटेल?' ही भीतीही अगदीच अनाठायी आहे. शरम, लाज, संकोच हा बहुतेकदा पालकांच्या मनात असतो. मुलांना असते निव्वळ उत्सुकता. एकदा परिपक्व पद्धतीनी, सजीवांचा जगण्याचा नियम म्हणून ही गोष्ट सांगितली तर मुलांना काही विशेष वाटणार नाही. जसे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला ती आपल्या आई-बाबांना जबाबदार धरत नाहीत, तसंच ह्यालाही आई-बाबांना जबाबदार धरणार नाहीत. काळजी नसावी. 


प्राण्यांची वागणूक निसर्गस्वाधीन 

"पाण्यात पडल्यावर पोहायला येतंच की' असलाही युक्तीवाद असतो. पाण्यात पडल्यावर आपोआप पोहता येत नाही. आधी गटांगळ्या खाव्याच लागतात. शिवाय पोहोता येईलच असंही नाही. कदाचित बुडूही. कित्येक बुडालेले आहेत. शिकण्याचा हाही एक मार्ग आहे, मान्य आहे. पण, असेल त्या पोराला, दिसेल तो क्‍लास लावणाऱ्या पालकांनी, आपल्या पोरांना पोहोण्याचा क्‍लास लावायचा की द्यायचं ढकलून, हे ठरवायची वेळ आली आहे. "प्राण्यांना कोण शिकवतं हो?' अशीही पृच्छा येते. प्राण्यांची आणि मानवाची बरोबरी निदान या क्षेत्रात तरी होऊ शकत नाही. प्राण्यांची वागणूक ही सर्वस्वी निसर्गस्वाधीन असते. समाज, धर्म, संस्कार असे अनेक घटक, मानवी लैंगिक वागणूक नियंत्रित करत असतात. समाज, धर्म संस्कार विरुद्ध निसर्ग असा काहीसा हा लढा असतो. लढा म्हटल्यावर आधी त्याचा धडा नको? बिनधड्याचे शिपाई हे ऐन लढाईत शेंदाडशिपाई ठरतात, नाही का? 


लैंगिकता शिक्षण हा उतारा

बलात्कार हे पुरुषी कामजन्य हिंसेच्या हिमनगाचं फक्त टोक आहे. त्याखाली निव्वळ "नजरेनी बलात्कार', कामाच्या ठिकाणचं लैंगिक शोषण, लिंगाधारित भेदभाव, छेडछाड, बालकांचं लैंगिक शोषण, वैवाहिक जीवनातला बलात्कार असे अनेक स्तर आहेत आणि या साऱ्या वर लैंगिकता शिक्षण हा उतारा आहे. आपण फक्त दरवेळी मिडीयात गाजणाऱ्या बलात्कारालाच जागे होणार का?

आमदारांनी एकमुखी केला विरोध

पण, आज परिस्थिती अशी आहे की, जागतिक आरोग्य संघटना, इंटरनॅशनल प्लॅंड पेरेंटहूड आणि अनेक शिक्षण मंडळांनी सुचवून, आग्रह धरूनही, काही वर्षापुर्वी महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभेत एकमुखी ठराव करून हा विषय अभ्यासक्रमात येऊ दिला नाही. आता तरी शहाणे होऊ या. पुढच्या पिढीच्या निरामय कामजीवनासाठी योग्य त्या वयात, योग्य त्या स्रोतांकडून, योग्य त्या लैंगिकता शिक्षणाचा आग्रह धरूया. विधानसभेत गाजायला पाहिजे असेल तर ही मागणी गाजू दे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, ऐन प्रचारादरम्यान विमानतळावरच अडकून पडले!

School Nutrition : शालेय पोषण आहारातील चॉकलेट रस्त्यावर फेकले, निकृष्टता आणि अळ्यांच्या विरोधात कारवाई

Vikramgad Assembly Constituency 2024 : पतीच्या विजयासाठी आमदार पत्नी प्रचाराच्या मैदानात,आघाडीचे ऊमेदवार सुनिल भुसारांचे पारडे जड

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

SCROLL FOR NEXT