सांगली : सर्वात कमी शिकलेला शहाणा नेता. फर्स्ट स्ट्रॉंग मराठा लिडर असं ज्यांना म्हटलं जातं त्या वसंतदादा पाटील यांचं पहिलं सामाजिक काम म्हणजे पद्माळे (ता. मिरज) येथे कृष्णा काठावर बांधलेला सात टप्प्यांचा घाट. या घाटाची काही वर्षांपासून पडझड सुरू झाली आहे. याकडे कोणाचंच लक्ष नाही.
सांगलीच्या ऐतिहासिक जेलफोडोचे व आधुनिक महाराष्ट्रात सहकार, शैक्षणिक क्षेत्रात धडाडीने क्रांतिकारी निर्णय घेणारा नेता ज्या गावाने दिला. राजकीय व संघटनात्मक ताकद पाहून दिल्लीचे तख्तही हादरले. त्या नेत्याच्या कामाच्या खुणाही दुर्लक्ष करून पुसू दिल्या जात आहेत.
13 नोव्हेंबर 1917 दादांचा जन्मदिवस. सांगलीतील कृष्णाकाठावरचं समाधिस्थळ, स्टेशन चौक, वसंतदादा कारखाना, मार्केट यार्ड, फळ मार्केट, बुधगावचे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे अभिवादनाचे कार्यक्रम होतात. कर्तृत्वाचे गोडवे गायिले जातात. पण विचारांचा वारसा जपला जातो का? हा उत्तर न मिळणारा प्रश्न मागे उरतोच. महाराष्ट्राला मोठं करणाऱ्या अनेक नेत्यांबाबत असे झाले, होते आहे. दादा त्याला अपवाद कसे ठरतील. पद्माळेतील घाटावर बसल्यानंतर नदीच्या पश्चिम तीराचा निसर्गरम्य नजारा दिसतो. विस्तीर्ण पात्र हिरवागार भवताल भान हरपायला लावतो. कृष्णेचा संथ आणि शांत वाहणारा प्रवाह माणसाला छोटेपण दाखवून देतो. त्याचवेळी नजर वेधतो तो "ग्रामसुधार मंडळ, पद्माळे 1934' हा घाटवर दगडात कोरलेला फलक. दुधाळ जनावरांच्या पहिला चिकाने, दुधाने अभिषेक केला जातो. घाटाच्या एका टप्प्यावर पडलेलं भगदाड, निखळू लागलेल्या एकेक काळ्या पाषाणाकडे कोणाचंही लक्ष नाही. गावांत राष्ट्रवादीची सत्ता आहे. दादा विरोधी गटाचे दैवत. कदाचित हेही कारण असेल. पण दादांना दैवत मानणाऱ्यांना काय थोडं मिळालं का? त्यांचं तर ठार दुर्लक्ष आहे. त्यांचे खिसे झाडले तरी या घाटाचा जीर्णोद्धार व नूतनीकरणाला हवा तितका निधी सहजी उपलब्ध होईल. सरकारनेच केले पाहिजे असंही नाही. पद्माळेचे जावई व सांगलीचे तत्कालीन आमदार दिनकर पाटील यांच्या काळात थोडीफार डागडुजी झाली.
हे पण वाचा - महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय
नंतर मात्र पूर्ण दुर्लक्ष झाले. दादांचे जन्मशताब्दी वर्ष तर भाजप शिवसेना युतीच्या सरकारच्या काळातच आले आणि गेले. ना चिरा, ना पणती. ना निधी, ना कार्यक्रम. लोकोपयोगी कामे करून लोकोत्तर ठरलेल्या या नेत्याचा लोकांना विसरच पडू लागलाय. वारस आणि अनुयायी म्हणवणाऱ्या साऱ्यांचीच. त्याचंच उदाहरण म्हणजे दादांनी वयाच्या विशीत केलेलं सामाजिक काम. पडझड होत असलेला घाट. ग्रामसुधार मंडळ तर कधीच अस्तित्वहीन झालं असावं.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.