बार्शी (जि. सोलापूर) - येथील मनगिरे मळा या ठिकाणी असलेल्या पुठ्याच्या गोडाऊनला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात राजेश रामावतार शाहू (वय ४०) याचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की मनगिरे मळा येथे उत्तरप्रदेश येथून आलेल्या शाहू परिवाराचा पुठ्याचा व्यवसाय होता. पुठ्ठा ठेवण्यासाठी पत्र्याचे मोठे शेड मारून गोडाऊन तयार केले होते व यातच शाहू परिवार राहत होते. शुक्रवारी (ता.५) पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अचानक पुठ्याना आग लागली. संपूर्ण गोडाऊन पुठ्यांनी भरलेले असल्याने क्षणार्धात संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्षस्थानी पडले.
यावेळी घरामध्ये राजेश रामावतार शाहू व त्याची पत्नी आरती राजेश शाहू हे दोघे होते. तर इतर दोन सदस्य लहान मुलाला घेऊन वॉचमन म्हणून कामावर गेलेले होते. आग अचानक भडकल्याने घरातील दोन्ही सदस्यांना बाहेर पडता आले नाही. राजेश याचा बेडरूम मध्ये जाग्यावरच होरपळून मृत्यू झाला. त्याचा अक्षरशः कोळसा झाला होता. तर आरती बाथरूम मध्ये जखमी अवस्थेत पडलेली होती. आग लागल्यानंतर गोडाऊन समोरील विनायक केसकर व भाऊबली नगरकर व आवदेश रामराव शाहू हे आग विझवण्याचा प्रयत्न करत असतानाच गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या गोडाऊनला आग लागल्याचे समजताच नगरपालिका विरोधीपक्ष नेते नागेश अक्कलकोटे, कृषी उत्पन्न बाजारसमितीसाचे संचालक रावसाहेब मनगिरे, अजित कुंकुलोळ यांनी घटनास्थळी धाव घेत मदत यंत्रणा राबवली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने गोडाऊनचे पत्रे काढून आग विसवण्यास मदत केली. जखमींवर उस्मानाबाद येथे उपचार सुरू आहेत.
धाडसी युवकांमुळे वाचले आरतीचे प्राण..
भीषण आग लागल्याने गोडाऊनचे पत्रे अक्षरशः वितळत होते. यातच घरातून आरतीच्या ओरडण्याचा आवाज येत होता. तेव्हा परिसरातील प्रकाश जाधव व रोहित बुजबळ या दोघांनी पत्रे बाजूला करून गोडाऊन मध्ये प्रवेश करून धूर, अपुरा ऑक्सिजन, प्रचंड उष्णता आशा परिस्थितीत गोडाऊन मध्ये आगीत अडकलेल्या आरतीला बाहेर काढत तिचे प्राण वाचवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.