सांगली ः दुपारची बाराची वेळ. ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्यांची मोठी गर्दी. या गर्दीत एकास कोल्हा दिसून आला. त्यांनाही अश्चर्य वाटले. त्यांनी प्राणी मित्र आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानसार अधिकारी घटनास्थळी धावले. रेस्क्यू ऑपरेशन राबवत कोल्हा सापडला. त्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर त्याला निसर्गात मुक्त करण्यात आले.
हे पण वाचा - खेळाडूंसाठी खुषखबर ; टबाडा ठरणार वरदान
येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्यात शिरलेला हा कोल्हा होता. साखर कारखाना परिसरात एक कोल्हा शिरल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज कोळी यांना मिळाली. त्यांनी नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे कार्यकर्ते विशाल चव्हाण, गौरव हर्षद, राहुल पवार, रमेश पवार, सचिन साळुंखे, मंदार शिंपी तसेच ऍनिमल राहत संस्थेचे दिलीप शिंगाणा यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविले आणि कोल्ह्यास पकडले. परिसरात बघ्यांची मोठी गर्दी होती.
हे पण वाचा - पत्ता सांगताय, थांबा !
कोल्हा कुठे आढळतो.
भारतीय कोल्हा (शास्त्रीय नाव: कॅनिस ऑरियस इंडिकस) हा युरोप, मध्यपूर्व आशियापासून ते भारतीय उपखंडापर्यंत आढळणाऱ्या गोल्डन जॅकल या कोल्ह्याचीच एक उपप्रजाती आहे. भारतातील गवताळ प्रदेश, झुडुपी जंगले, सदाहरित जंगले, वाळवंटी प्रदेश, पर्वतीय प्रदेश अशा विविध ठिकाणी याचा वावर असतो. हा प्राणी दिसायला भारतीय लांडग्यासारखाच असतो. परंतु, त्यापेक्षा आकाराने लहान असतो आणि त्यांच्या शारीरिक ठेवणीत बरीच भिन्नता आढळते. लांडग्यापेक्षा याचे पाय आखूड असून शरीर लांबूळके असते. याची संपूर्ण त्वचा केसाळ असून मानेपासून ते पाठीचा आणि शेपटीचा वरचा भाग काळा असतो. बाकीच्या शरीरावरील केसांचा रंग बदामी किंवा फिकट तपकिरी असतो. लांडग्याच्या मानाने याचे तोंड कमी लांबीचे पण जास्त निमुळते असते. हा प्राणी खूप विविध प्रकारचा आहार घेतो. उंदीर, घुशी, ससे, खारोट्या, कीटक, साप, पक्षी याबरोबरच टोमॅटो, कलिंगड, खरबूज, द्राक्षे अशा फळांचाही त्याच्या आहारात समावेश असतो. कोल्हा शक्यतो कळपात किंवा अनेकदा एकेकटाही राहतो. हे उत्तम शिकारी असतात. पण बऱ्याच वेळा दुसऱ्या मोठ्या जनावरांनी केलेल्या शिकारीतील उरलेले मांस खातात.
हे पण वाचा - मुख्यमंत्र्यांसह शिवकुमार संकटात;अडचणी वाढणार
निसर्गातील स्वच्छता कर्मचारी
उंदीर, घुशी अशा उपद्रवी प्राण्यांना मारत असल्याने कोल्हा माणसासाठी उपकारक आहे. तो बऱ्याच प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवत असल्याने निसर्गाच्या अन्नसाखळीतही त्याचा मोलाचा वाटा आहे. अन्य प्राण्यांनी सोडून दिलेले मांस खात असल्याने एक प्रकारे तो निसर्गातील स्वच्छता कर्मचारी आहे. खरंतर विविध हवामानाच्या प्रदेशांशी जुळवून घेण्याची क्षमता आणि वैविध्यपूर्ण आहार यामुळे कोल्ह्याचा समावेश दुर्मिळ किंवा नामशेष होण्याच्या मार्गावरील प्राण्यांचा यादीत केला जात नाही. मात्र गेल्या काही वर्षात माणसाच्या जमिनीवरील अतिक्रमणामुळे यांची संख्या झपाट्याने घटते आहे. कारण त्याचे नैसर्गिक अधिवास हळूहळू कमी होत चालले आहेत. तसेच चोरट्या बेकायदेशीर शिकारीचाही या प्राण्यांना फटका बसत आहे. म्हणूनच हा प्राणी दिसल्यास त्याला इजा न करता त्वरित स्थानिक वनखात्याला कळवावे असे, आवाहन नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.
|