मिरज : शास्त्रीय संगीत व तंतुवाद्य निर्मितीत मिरजेचा लौकिक जगभर पोहचला असतानाच तंतुवाद्यांना भौगोलिक (जीआय) मानांकन मिळाल्यास एक नवी झळाळी प्राप्त होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत नव्याने माहिती मागविण्यात आली आहे.
नजीकच्या काही महिन्यात हे मानाकंन मिळाल्यास ‘जीआय’ मानांकन मिळणारे तंतुवाद्य हा देशातील पहिलेच वाद्य ठरेल, अशी माहिती ‘जीआय’साठी प्रयत्न करणाऱ्या अल्ताफ मुल्ला व झाकिर मुल्ला यांनी दिली.
मिरजेत १७० वर्षांपासून तंतुवाद्ये तयार केली जातात. तंतुवाद्यांचे माहेरघर अशीच मिरजेची जागतिक स्तरावर ओळख आहे. या कारागिरीस सरकारी मान्यता दूरच पण साधी प्रतिष्ठाही अनेक वर्षे मिळाली नाही.
जीव ओतून तंतुवाद्य घडवणारे तंतुवाद्य कारागीर केवळ उपेक्षेचे धनी ठरले. याच कारागिरांची नवी पिढी मात्र तल्लख व हुशार असल्यामुळे अलीकडे व्यवसायासही प्रतिष्ठा प्राप्त होऊ लागली. ‘जीआय’ मानांकनासाठी प्रयत्न करणे हा नव्या पिढीच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
या मानांकनामुळे येथे तयार होणाऱ्या विविध वाद्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख मिळेलच शिवाय वाद्यांची नक्कलही कोणाला करता येणार नाही. स्वामित्व हक्क कायद्याने त्यांना कारागिरीचा हक्क प्राप्त होईलच शिवाय तंतुवाद्यांच्या परदेशातील निर्यातीस मोठी संधी प्राप्त होणार आहे.
अल्ताफ मुल्ला आणि कीर मुल्ला म्हणाले,‘‘आद्य तंतुवाद्यनिर्माते फरीदसाहेब सतारमेकर यांच्या अथक प्रयत्नातून पहिले तंतुवाद्य मिरजेत तयार झाले. त्यानंतर देशात व देशाबाहेरही मोठ्या प्रमाणात ही तंतुवाद्यांची निर्मिती व विक्री होऊ लागली. जगभरातील हजारो नामवंत गायक-वादक येथून तंतुवाद्ये खरेदी करू लागले. शास्त्रीय संगीताला सुरेल साज चढवणाऱ्या तंतुवाद्यांना ‘जीआय’ मानांकन मिळावे, यासाठी नव्या पिढीतील कारागिरांचे प्रयत्न सुरू झाले.
मिरजेतील तंतुवाद्यांना ‘जीआय’ मानांकन मिळावे यासाठी तरुण कारागिरांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांना वाद्यांची माहिती देऊन त्यांचे शास्त्रीय संगीतामधील महत्त्वही पटवून दिले. त्यामुळे अडचणी दूर झाल्या आहेत. आता किरकोळ त्रुटी दूर करण्याचे काम सरकार दरबारी सुरू आहे.
‘जीआय’ मानांकनामुळे मिरजेच्या तंतुवाद्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार आहे. शिवाय आमच्या विशेष वाद्यांची नक्कल कोणीही करू शकणार नाही. तंतुवाद्य कारागिरीस एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त होईल.
— मज्जिद सतारमेकर, राष्ट्रीय संगीत कला अकादमी पुरस्कारप्राप्त तंतुवाद्य कारागीर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.