माजी आमदार मनोहर किनेकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी भाषावार प्रांतरचना झाल्यापासून मराठी भाषिकांचा लढा सुरू आहे.
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने (Maharashtra Ekikaran Samiti) मंगळवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन (Mohammad Roshan) यांची भेट घेऊन १ नोव्हेंबर रोजी काळा दिन फेरी काढण्याबाबत चर्चा करण्यात आली, मात्र रोशन यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी देणार नसल्याचे सांगितले व ही फेरी दुसऱ्या दिवशी काढा असा अजब सल्ला त्यांनी दिला, मात्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे भाषावार प्रांतरचना करताना झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी फेरी काढली जाईल, त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असे त्यांना ठामपणे सांगितले.
एक नोव्हेंबर रोजी समितीतर्फे दरवर्षी निषेध फेरी काढली जाते. याबाबत निवेदन देऊन चर्चा करण्यासाठी समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रोशन यांची भेट घेतली. यावेळी रोशन यांनी ‘लोकशाहीत सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र १ नोव्हेंबर रोजी काळा दिन साजरा करण्याची परवानगी दिल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद ज्याप्रमाणे सामंजसपणाने साजरी करण्यात आली, तसेच वेगवेगळ्या दिवशी मिरवणूक काढण्यात आली; त्याचप्रमाणे राज्योत्सव दिनाऐवजी दुसऱ्या दिवशी काळा दिन फेरी काढा,’ असा सल्ला समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
यावर माजी आमदार मनोहर किनेकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी भाषावार प्रांतरचना झाल्यापासून मराठी भाषिकांचा लढा सुरू आहे. तसेच बेळगाव कर्नाटक राज्योत्सव सुरू झाल्याच्या पूर्वीपासून एक नोव्हेंबरला फेरी काढली जाते, असे सांगून परवानगी देण्याची मागणी केली, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ‘भाषिक सलोखा राखणे गरजेचे असून, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे परवानगी देता येणार नाही,’ असे सांगितले.
यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, परवानगी देणार आहे की नाही याबाबत लेखी उत्तर लवकर द्यावे. तसेच दरवर्षीप्रमाणे फेरी काढली जाईल यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती जिल्हाधिकारी रोशन यांना दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही ‘बेळगाव आणि कारवार भागातील मराठी भागातील मराठी भाषिकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे,’ असे मत व्यक्त केले होते. याबाबतचे पुस्तक व माहिती समिती पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
यावेळी सरचिटणीस मालोजी अष्टेकर, मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, ॲड. एम. जी. पाटील, युवा नेते आर. एम. चौगुले, विकास कलघटगी, लक्ष्मण होनगेकर, बी. डी. मोहनगेकर, महेश जुवेकर, संतोष मंडलिक, मनोहर संताजी, विठ्ठल पाटील, मनोहर हुंदरे, मल्लाप्पा गुरव, पीयुष हावळ, दीपक पावशे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.