सांगली : विद्यार्थ्यांना मैदानी खेळ, व्यायाम, अवांतर वाचन अशा विविध अंगानी व्यक्तिमत्व विकासाचे धडे शालेय जीवनातच द्यायला हवेत. देश सेवेचे जाज्वल्य प्रेम, आपल्या देशाची संरक्षणसेवा याविषयीची माहिती पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यायला हवी. यामध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, असे मत वायुसेनेचे वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. उद्या (ता. ८) भारतीय वायुसेना ९० स्थापना दिन आहे. त्यानिमित्ताने ते औपचारीक गप्पांत बोलत होते.
श्री. वालवडकर यांनी वायुदलात तब्बल २७ वर्ष सेवा बजावली. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वायुदलाची माहिती व्हावी आणि त्यांनी हे करिअर म्हणून हे क्षेत्र निवडावे; यासाठी ते सांगलीत स्थायिक झाले. ही देशसेवेची सेकंड इनिंग असल्याचे श्री. वालवडकर सांगतात. त्यांच्या प्रयत्नातून सन २०१७ साली तासगाव येथे वायुसेनेची भरती झाली. राज्यातील ग्रामीण भागातील अडीच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पुढाकार घेतला होता. त्या भरतीत १६५ मुले गरूड फोर्समध्ये निवडण्यात आली. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय याठिकाणी त्यांनी वायुसेनेची माहिती आणि प्रचार करण्याचे व्रत हाती घेतले आहे.
वायुसेनेतील भरतीविषयी बोलताना ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांमध्ये जिद्द आणि चिकाटी असते, त्याला योग्य मार्ग दाखवण्याची गरज आहे. यासाठी शालेय जीवनातच व्यक्तीमत्व विकासाचे धडे देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांचा व्यायाम, खेळ आणि मैदान हा नित्य उपक्रम बनवण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा.
याठिकाणी लाढाऊ वृत्ती, एकाग्रता, एकता याचे अनेक धडे मिळतात. तसेच देश सेवा करणे हा सन्मानार्थ विषय आहे. त्याविषयी पालकांनी नेहमीच पाल्यांना प्रोत्साहन करण्याची गरज आहे. ऑनलाइन-ऑपलाइनच्या जमान्यात मैदनी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी शिक्षक आणि पालकांनी आता पुढाकार घेण्याची गरज आहे.
माजी सैनिकांचा पुढाकार
श्री. वालवडकर म्हणाले, ‘वायुसेना दिनानिमित्त उद्या (ता. ८) कुंडल येथे सकाळी ९ वाजता वायुसेनेतील निवृत्तांचा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी त्यांचे कुटुंबीय ही सहभागी होणार आहेत. यात मेळाव्यात प्रामुख्याने वायुसेने विषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी वर्षभर कार्यक्रमांचे नियोजन केले जाणार आहे. सर्व माजी सैनिकांची टीम जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना भेटणार आहे. सामाजिक उपक्रमांसाठी या टीमचा पुढाकार असेल. तसेच पहिले प्राधान्य विद्यार्थ्यांना घडवणे हेच असेल.
इंग्रजीचा बाऊ करू नका
श्री. वालवडकर म्हणाले, ‘वायुसेनेतील भरतीसाठी इंग्रजी गरजेचे आहे. परंतु अनेक विद्यार्थी त्याचा बाऊ करतात. तो करण्याचे काही कारण नाही. जिद्द आणि चिकाटी पाहिली जाते. त्या विद्यार्थ्यामधील देशसेवेचे प्रेम पाहिले जाते. त्याचे सामान्य ज्ञान, व्यवहार, आचरण पाहिले जाते. हे सार पाहिल्यानंतर इंग्रजी येत नसेल, त्याला शिकवण्याची तयारी वायुसेनेची असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी न घाबरता भरतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
अफवांना बळी पडू नका...
श्री. वालवडकर म्हणाले, ‘सैन्या भरीसह अन्य ठिकाणी भरीतासाठी पैसे द्यावे लागत नाही. भरतीच्या नावाखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जाळ्यात अडकवण्याचे धंदे सुरू आहेत. अशांना बळी पडू नका, एकही रूपया भरतीसाठी लागत नाही. ज्याच्याकडे जिद्द आणि चिकाटी असेल, त्यांना नक्कीच भरती करून घेतले जाते. भरतीसाठी कोणी पैशांची मागणी केल्यास तातडीने पोलिसांकडे तक्रार द्यावी.
अग्निवीर योजना फायदेशीरच
श्री. वालवडकर म्हणाले, ‘सरकारने आणलेली अग्निवीर योजना खरोखर फायदेशीर आहे. सतराव्या वर्षी भरती झाल्यानंतर २१ वर्षापर्यंत मोठी रक्कम त्याला मिळते. यामुळे त्याचे भविष्य सुखकर होतेच मात्र देशसेवेचा अभिमानही यानिमित्ताने तयार होते. त्यामुळे ही योजना खरोखर विद्यार्थ्यांसाठी आभिमानास्पद आणि आत्मनिर्भर बनवणारी आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.