Indian Freedom fighter Madhavrao Mane passed away  esakal
पश्चिम महाराष्ट्र

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा शंभरीचा साक्षीदार हरपला! स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांचं सांगलीत निधन

सांगली येथील स्वातंत्र्यसैनिक माधवराव भुजंगराव माने (वय १००) यांचे आज (बुधवार) पहाटे निधन झाले.

जयसिंग कुंभार

सांगलीकरांमध्ये ते 'आप्पा' या नावाने सर्वपरिचित होते. आप्पांना विद्यार्थीदशेत तासगाव हायस्कूलमध्ये देशप्रेमाचे बाळकडू मिळाले.

सांगली : येथील स्वातंत्र्यसैनिक माधवराव भुजंगराव माने (वय १००) यांचे आज (बुधवार) पहाटे निधन झाले. त्यांनी गतवर्षी २४ जुलैला शंभराव्या वर्षात पदार्पण केले, तेव्हा सांगलीकरांच्या वतीने शांतीनिकेतन लोकविद्यापीठात नागरी सत्कार झाला होता. त्यांच्या निधनाने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्या धगधगत्या पर्वाचा कृतीशील साक्षीदार हरपला आहे. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, पाच मुली, सून, नातवंडे असा असा परिवार आहे.

येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, आज सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या कुपवाडमधील पार्श्‍वनाथनगरमधील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघाली. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ तसेच काँग्रेस भवन येथे त्यांचे पार्थिव काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण केले. आयुक्त सुनील पवार यांच्यासह विविध स्तरातील मान्यवर, नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

..अन् प्राणज्योत मालवली

शेवटपर्यंत त्यांची प्रकृती खडखडीत होती. सार्वजनिक जीवनातही ते सक्रीय होते. गेल्या ३ फेब्रुवारीला त्यांना घरीच थोडा धाप वाढल्याने अस्वस्थ वाटू लागले. येथील भारती हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना आज बुधवारी रात्री एकच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. माधवराव माने व्यासपीठावर भाषण करायला उभे राहिले आधी मुठी आवळून ‘महात्मा गांधी की जय’ अशी घोषणा द्यायचे आणि मगच ताठ कण्याने ते बोलायला सुरुवात करायचे. प्रजासत्ताक दिन असो की स्वातंत्र्य दिन त्यादिवशी ते विश्रामबाग चौकात क्रांतीसिंहाच्या पुतळ्याची स्वच्छता करायला भल्या पहाटे हजर असायचे.

मुलांमध्ये मिसळताना त्यांच्या निरागस चेहऱ्यावर निर्मळ हास्य मनाला उभारी द्यायचे. या माणसाने कधीकाळी स्वातंत्र्यलढ्यात बॉम्ब फेकला असेल, त्यासाठी कारावास भोगला असेल असं अजिबात वाटायचं नाही. मात्र, ते जेव्हा भाषणाला उभे रहायचे तेव्हा त्यांच्या मनातील देशभक्तीचे चेहऱ्यावर दिसायचे. तसे ते राष्ट्रसेवा दलाच्या मुशीत घडलेले. स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील अनेक गीते त्यांना आजही तोंडपाठ होती. एकापाठोपाठ एक गीते म्हणत ते मुलांना खिळवून ठेवायचे. त्यांच्यासोबत वावर मन प्रसन्न करायचा. त्या काळात घेऊन जायचा.

बालवयातच शाळेला केला रामराम

सांगलीकरांमध्ये ते 'आप्पा' या नावाने सर्वपरिचित होते. आप्पांना विद्यार्थीदशेत तासगाव हायस्कूलमध्ये देशप्रेमाचे बाळकडू मिळाले. त्यांचे त्यावेळचे शिक्षक राष्ट्रभक्तीचे शिक्षण देणारे होते. क्रांतिसिंहांना त्यांनी बालवयातच गुरु मानले. वेळ आली तेव्हा त्यांनी शाळेला रामराम करीत स्वातंत्र्यालढ्यात स्वतः ला झोकून दिले. १९४२ चा गांधीजींनी दिलेला ब्रिटिशांना ‘चले जाव’चा निर्वाणीचा इशारा त्यांनी मनावर घेतला. ३ सप्टेंबर १९४२ रोजी तहसील कचेरीवर तिरंगा फडकविण्याचा यशस्वी तासगाव मोर्चा त्यांनी जवळून अनुभवला. या मोर्चाप्रसंगी माधवरावांनी राष्ट्रसेवा दलातील मुलांकडून दोन छकडा भाकरी जमा करून सर्व लोकांना जेवू घातले. या संस्कारातून भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी मृत्यूचे कफन डोक्याला बांधून त्यांच्या सोबतची बालसेना देश सेवेसाठी सज्ज झाली.

त्या काळात त्यांनी तासगावात राष्ट्रसेवा दलाची शाखा चालवली. त्यांचे मूळ गाव तासगाव तालुक्यातील येळावी. राष्ट्रसेवा दलातील ३० ते ४० मुले घेऊन प्रभातफेरी काढून जनजागृतीचे कार्य त्यांनी केले. तासगाव हायस्कूल, शाळा क्रमांक एक, शाळा क्रमांक दोन आणि मुस्लिम शाळा अशा सर्व शाळांमधील मुलांना एकत्र करून गावभर मिरवणूक काढल्या. वि. स. पागे, पोंक्षे काका, गंगाराम बापू, आर. पी. पाटील, धोंडिराम माळी, शाहीर शिवाजी पवार अशा व्यक्तींनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. स्वातंत्र्यलढ्याच्या ऐनभरात स्वराज्याच्या प्रतिज्ञेवर स्वाक्षरी करण्यासाठी माधवराव माने, माजी आमदार गणपतराव कोळी, नामदेव हिंगमिरे, बजरंग मोरे, रतनलाल मारवाडी, राम जाधव, जयसिंगराव माने, भीमराव पाटील, दत्तात्रय बुरुड यांनी स्वतःचे अंगठ्याला छेद देऊन रक्ताने सह्या केल्या.

तासगावला बॉम्ब आणण्याची जबाबदारी माधवरावांवर सोपवली

तत्कालीन बुधगाव संस्थानातील राजापूर गावातील प्राथमिक शाळेमध्ये असणारे पंचम जॉर्ज आणि व्हिक्टोरिया राणीचे भव्य तैलचित्र काढून जाळून टाकण्याची कृती माधवराव आणि जयसिंगराव माने यांनी केली. ९ सप्टेंबर १९४२ रोजी वडूज कचेरीवर चालून गेलेल्या मोर्चावर गोळीबार करणाऱ्या आणि नऊ लोकांना ठार करणाऱ्या तासगावमधील बेंडेगिरी या फौजदारास अद्दल घडवण्याचे स्वातंत्र्यसैनिकांनी ठरवले. भिलवडीचे थोर क्रांतिकारक डॉक्टर सोहोनी यांनी भिलवडीतून तासगावला बॉम्ब आणण्याची जबाबदारी माधवरावावर सोपवली.

त्यांनी हे बॉम्ब मिठाईच्या पेटीत लपवले. प्रत्यक्ष तासगावचे फौजदार बेंडेगिरी यांचे झडतीस चकवा देऊन अत्यंत चतुराईने तासगावमध्ये आणलेले बॉम्ब गणपतराव कोळी, दत्तात्रय बुरुड यांनी बेंडेगिरी यांच्या घरावरती टाकले. या प्रकरणी माधवरावांना अटक झाली. पुढे सातारा, विजापूर, धारवाड, नाशिक येथील तुरुंगात नऊ महिन्याच्या कारावासाची शिक्षा भोगली. तासगाव फौजदार बॉम्ब हल्ला प्रकरणातील गुन्हेगार असा त्यांच्यावरचा शिक्का त्यांच्यासाठी आयुष्यभरासाठी बिरूद राहिला.

कुप्रसिद्ध दरोडेखोर अण्णा रामोशीला शिकवला धडा

माधवराव पुढे क्रांतीसिंहाच्या प्रतिसरकारचे भाग झाले. तासगाव भागातील राजापूर येथे अण्णा रामोशी या कुप्रसिद्ध दरोडेखोरास त्यांनी धडा शिकवला. स्वातंत्र्यानंतर ते स्वस्थ बसले नाहीत. संयुक्त महाराष्ट्र समितीचा लढा लढविला. राष्ट्रसेवा दल, समाजवादी पक्षाचा राहुन अनेक विधायक कामे केली. शिक्षण क्षेत्रात माधवरावांनी मोलाची कामगिरी केली आहे. तासगावचे साधना शिक्षण संस्थाची स्थापना करून जागृती अध्यापिका विद्यालय, संस्कार मंदिर प्रॅक्टिसिंग स्कूल, यशवंत हायस्कूल सुरु केले. सहकार क्षेत्रात कार्यरत राहून दक्षिण सातारा जिल्हा को-ऑपरेटिव्ह सेक्रेटरी संघाची स्थापना केली. कोल्हापूर येथे सहकार मंत्र्याचे अध्यक्षतेखाली सेक्रेटरीची सहकार परिषद घेतली. तासगाव येथे विणकर सोसायटीची स्थापना केली.

धगधगत्या स्वातंत्र्यपर्वाचा साक्षीदार हरपला

तासगाव पलूस तालुका स्वातंत्र्य सैनिक सन्मान समितीचे अध्यक्ष आणि सध्या सांगली जिल्हा स्वातंत्र्य सैनिक सन्मान समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहत होते. ‘राष्ट्रसेवा दलातील अनमोल हिरेमोती’ या ग्रंथाचे ते लेखक आहेत. भारत सरकारने त्यांना ताम्रपट देऊन गौरवले होते. अलीकडे ते शाळांशाळांमध्ये जाऊन मुलांत मिसळायचे. त्यांना सेवादलातील गीते म्हणून दाखवायचे. क्रांतिसिंहांप्रती त्यांची अमीट श्रध्दा होती. क्रांतीसिंहाच्या पुतळा परिसराची झाडू घेऊन स्वच्छता करणारे माधवराव एखाद्या ऋषीसमान भासायचे. ते गेले त्या अनेक आठवणी मागे ठेवून. धगधगत्या स्वातंत्र्यपर्वाचा एक साक्षीदार हरपला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT