इस्लामपूर (सांगली) : ‘चंद्रकांत पाटील यांच्या मागे लपून जयंत पाटील यांच्यावर वार करू नका... भाजपच काय, पण... मोदी, शहा जरी आले तरी आम्ही घाबरत नाही... राजारामबापूंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या तुम्हाला सहजसोपे जाऊ देणार नाही... वेट अँट वॉच...’ अशा धमकीसह आक्षेपार्ह संदेश येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांना व्हॉट्सअॅपवर परदेशातून आल्याची चर्चा आज सर्वत्र पसरली. समाजमाध्यमातून आलेल्या अशा प्रकारच्या धमकीमुळे इस्लामपूरचे राजकारण तापले आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांना धमकी व्हॉट्सअॅपवर परदेशातून आल्याची चर्चा आज सर्वत्र पसरली.
भारतीय जनता पक्ष, समविचारी आणि निशिकांत पाटील यांच्या समर्थकांमधून याबाबत तीव्र नाराजीचा सूर उमटला. दरम्यान, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात याप्रकरणी इस्लामपूर पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी सायबर सेलकडे पाठविल्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
नगराध्यक्ष भोसले-पाटील हे विकास आघाडीच्या माध्यमातून शहरातील राजकारणात तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आज याबाबत पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचा समाचार घेतला. अशा धमक्या न थांबल्यास होणाऱ्या परिणामांना प्रशासनाला जबाबदार धरण्याचा इशारा दिला आहे.
भोसले-पाटील यांनी पारंपरिक आणि प्रस्थापित सत्तेला शह देत स्वतःचे अस्तित्व निर्माण केल्याने त्यांच्या विरोधकांची संख्या वाढली आहे. या राजकीय कुरघोडीतूनच परदेशातून त्यांना धमक्या देऊन त्रास दिला जात असल्याचे बोलले जाते. दरम्यान, नगराध्यक्ष भोसले-पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ते दिल्लीत आहेत असे समजले; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याची दखल घेऊन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या बाबतीत आलेले पुरावे सायबर सेलला पाठविले. तपासानंतर कारवाई केली जाईल.
- नारायण देशमुख, पोलिस निरीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.