इस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद, राज्यात अनपेक्षित सत्ता आणि सोबतीला जिल्ह्याचे पालकमंत्रिपद असा त्रिवेणी सत्तासंगम जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच अनुभवला. या अडीच वर्षांत त्यांच्या विरोधकांचा आवाज क्षीण झाला होता. आता राज्यातील धक्कादायक सत्तांतरानंतर विरोधकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून त्यांच्या विरोधाला पुन्हा धुमारे फुटू लागले आहेत.
‘जयंत पाटील यांचा पराभव होऊ शकतो,’ असे भिंतीवर लिहून मैदानात उतरण्याची तयारी विरोधक करत आहेत. फक्त हे वाक्य एकजुटीने एकाच भिंतीवर लिहिले जाणार का, एवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. विरोधकांची तोंडे कधीच एका दिशेला होऊ न देणे, हे जयंतरावांच्या विजयी घोडदौडीचे गमक आहे. त्यात सत्ताबदलानंतर सुधारणा झाली तर वाळवा तालुक्याचे राजकीय समीकरण काहीअंशी बदलू शकते; अन्यथा जयंतरावांना धक्का लावणे आव्हान असेल. त्याची सुरवात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीतून होईल.
भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात जयंत पाटील विरोधकांना बळ मिळाले होते. सदाभाऊ खोत यांना तर मंत्रिपद देत विरोधकांचा आवाज धारदार करण्याचा प्रयत्न भाजपने केला. राज्यात अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचे सरकार आले आणि ‘हेवीवेट’ नेते जयंत पाटील यांना जलसंपदा खात्यासह जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले. त्यांनी तालुक्यात डळमळीत झालेली सत्तास्थाने पुन्हा बळकट केली. संधी मिळेल तिथे विरोधकांना नाऊमेद केले. प्रशासनावर नियंत्रण ठेवत विरोधकांची कोंडी केली.
शिवसेनेला विश्वासात न घेता ‘कार्यक्रम’ राबवला. कुठे ‘चॉकलेट’ डिप्लोमसी खेळली, तर कुठे विरोधकांच्या खांद्यावर हात टाकून पायाखालची वाळू सरकवली. ‘जयंत पाटलांनी बांध रेटला नाही’, असे काही विरोधक सार्वजनिक ठिकाणी बोलू लागले. तेथूनच विरोधकांचे पुन्हा राजकीय ‘कुपोषण’ सुरू झाले.
आगामी निवडणुकांत राष्ट्रवादी सुसाट जाईल, असे चित्र होते. सत्तांतरानंतर त्याला ‘ब्रेक’ लागला. माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी वाढदिनी जयंतरावांच्या विरोधकांना एकत्र करत आपले इरादे स्पष्ट केले. ही मोट बांधणे आणि प्रामाणिकपणे एकजूट ठेवणे, हेच विरोधकांसमोरील मुख्य आव्हान आहे. विधानसभा निवडणुकीनंतर हुतात्मा समूहाच्या गौरव नायकवडी यांनी तालुक्यापेक्षा वाळवा परिसरावर लक्ष केंद्रित केले आहे. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात नायकवडी कुटुंबातील मतभेद दिसले.
गौरव नायकवडी व वैभव नायकवडी यांनी अण्णांच्या जयंतीचे स्वतंत्र दोन कार्यक्रम घेतले. सदाभाऊ खोत दीड-दोन वर्षांपासून नगरपालिका व तालुक्यातील विरोधी गटापासून सुरक्षित अंतर बाळगून आहेत. ते पुन्हा सक्रिय होतील, मात्र विरोधकांत आपल्या गटाचा वाटा किती, यावर त्यांचे लक्ष असेल. राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांनी भाजपचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला असला, तरी अन्य समर्थकांना घेऊन पुढे जाण्याचे त्यांचे धोरण दिसत नाही.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार हे विधानसभेत गाजले. आता त्यांना मुख्यमंत्री स्वतः बळ देतील, अशी अपेक्षा आहे. शिवसेनेचे अभिजित पाटील शांत आहेत. काँग्रेसचे प्रमुख नेते जितेंद्र पाटील यांची ‘एकला चलो रे..’ भूमिका आहे. जयंत पाटील यांना विरोध या समान भूमिकेतून हे लोक एकत्र येतील का, हा कळीचा मुद्दा असेल. विरोधकांची बेरीज नक्कीच बलाढ्य होऊ शकते, ती बेरीज होऊ न देणे, हेच जयंतरावांचे गणित आहे. त्याला छेद देण्यासाठी प्रदेश भाजप काय डाव मांडतो, हे पाहणे लक्षवेधी ठरेल. गेल्या अडीच वर्षांत प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर एकतर्फी वागणुकीचे आरोप झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.