इस्लामपूर - इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादीच्या दोन्ही विद्यमान आमदारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र या दोन्ही मतदारसंघांत महायुतीकडून लढण्यास कोण उमेदवार असतील, यावर आजपर्यंत तरी शिक्कामोर्तब झालेले नाही.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपासून तयारी केली आहे. मात्र अलीकडे या जागेवर शिंदे सेनेच्या गौरव नायकवडी, आनंदराव पवार यांनी हक्क सांगितला आहे, तर शिराळा मतदारसंघात मानसिंगराव नाईक यांच्या भूमिकेवर एकास एक किंवा तिरंगी अशी लढत ठरेल.
या ठिकाणी मानसिंगराव नाईक यांच्या विरोधात सम्राट महाडिक व सत्यजित देशमुख या भाजपच्या दोन नेत्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे, तर मानसिंगराव नाईक यांचा कोणत्या राष्ट्रवादीकडे कल असेल, यावरून आणखी एखादा इच्छुक उमेदवार ऐनवेळी रणांगणात असेल, असे दिसते.
इस्लामपूर व शिराळा मतदारसंघावर वाळवा तालुक्याचे वर्चस्व आहे. शिराळा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश होतो. या ४८ गावांतील मतदान जवळपास शिराळा तालुक्यातील मतदानाइतकेच आहे. तसे पाहिले तर या दोन्ही मतदारसंघांत जयंत पाटलांचा मोठा संपर्क आहे. त्यांच्या भूमिकेवरच शिराळा मतदारसंघातील आमदार ठरतो. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटलांच्या विरोधात निशिकांत पाटील, महाडिक गट, सदाभाऊ खोत गट, एकनाथ शिंदे शिवसेना असे सर्वजण मिळून असतात.
गेल्या पाच वर्षांपूर्वी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यामुळे या ठिकाणी ऐनवेळी गौरव नायकवडी यांना पुढे करून सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, आनंदराव पवार यांनी सूत्रे हलवली, तर निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली. या निवडणुकीत जयंत पाटील यांनी १ लाख १५ हजार ५६३ मते घेऊन विजय मिळवला. अपक्ष निशिकांत पाटील यांनी ४३ हजार ३९४ मते घेतली. गौरव नायकवडी यांना ३५ हजार ६६८ मते मिळाली.
याला वाळवा तालुक्यातील जयंत पाटील विरोधकांतील एकमेकांची जिरवण्यासाठी सुरू असलेली हालचाल कारणीभूत ठरली. त्यानंतर आता परत एकदा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटलांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून आदेश देण्यात आले होते. त्यानुसार निशिकांत पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपासून आपली तयारी सुरू ठेवली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत परत एकदा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील जयंत पाटील विरोधकांच्यात मोठी फूट पडली आहे. सदाभाऊ खोत आमदार झाले आहेत.
सदाभाऊ खोत आमदार झाल्यापासून गेले चार वर्षे तालुक्याच्या राजकारणात सावध भूमिका घेत शांत असलेले गौरव नायकवडी शिवसेनेकडून पुन्हा एकदा संधी मिळाल्यास लढण्यास इच्छुक आहेत. सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, आनंदराव पवार यांच्यासमवेत त्यांचा वावर वाढला आहे.
निशिकांत पाटील यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ‘इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचा भावी उमेदवार,’ असा सर्वांसमक्ष शब्द दिला आहे. मात्र तालुक्यातील जयंत विरोधकांना एकत्र आणण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी कान टोचल्याशिवाय पर्याय नाही.
शिराळा मतदारसंघात मानसिंगराव नाईक पुन्हा एकदा तयारीत आहेत. मात्र त्यांच्या भूमिकेबद्दल अनेकदा वेगवेगळ्या वावड्या उठतात. जयंत पाटील यांना मानसिंगराव नाईक यांच्याबद्दल, ‘ते आमच्याबरोबर कायम राहतील,’ अशी खात्री आहे.
मात्र ऐनवेळेला काही दगाफटका झाल्यास माजी आमदार शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीचे उमेदवार होऊ शकतात, असे चित्र आहे. दुसरीकडे, मानसिंगराव नाईक यांच्या विरोधात सम्राट महाडिक व सत्यजित देशमुख यांनी भाजपकडून तयारी केली आहे.
दोघेही सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांच्या हातात हात घालून काम करताना दिसतात. पक्षीय पातळीवरून कोणाला उमेदवारी मिळेल, त्याच्या मागे आम्ही ठाम असू, असे दोघे एकमेकांबद्दल सांगतात. या ठिकाणीही भाजपचा उमेदवार कोण, याबद्दल अद्याप निश्चित नाही. दोन्ही मतदारसंघांत विद्यमान आमदार आखाड्यात असतील, हे स्पष्ट आहे.
मात्र महायुतीत शिराळा, इस्लामपूर मतदारसंघांत उमेदवार कोण, हे अद्याप स्पष्ट नसल्याने सर्वजण इच्छुक तयारी करीत आहेत. ऐनवेळी उमेदवारीवरून नाराजीनाट्य उद्भवल्यास नवल वाटायला नको. कारण गेल्या पाच वर्षांपासून या दोन्ही मतदारसंघात इच्छुकांनी मशागत केली आहे.
वादळापूर्वीची शांतता
राज्य पातळीवरील निर्णय काय होतात, यावर दोन्ही मतदारसंघांतील विद्यमान आमदारांच्या विरोधातील उमेदवारीचे भवितव्य ठरणार आहे. सध्या तरी या मतदारसंघातील आमदारांचे विरोधक एकमेकांच्या गळ्यात गळे घालून ‘हम सब एक है’ असे दाखवत असले, तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.