पश्चिम महाराष्ट्र

जत तालुक्‍यात सरमिसळ, चुरस, ईर्षा 

बलराज पवार -सकाळ वृत्तसेवा

सांगली - जिल्ह्याच्या नैऋत्येकडील शेवटचा तालुका म्हणजे जत. तब्बल 117 गावे असणाऱ्या या सर्वांत मोठ्या तालुक्‍यात गेल्या दशकभरात जगताप आणि सावंत घराण्यात तीव्र राजकीय संघर्ष पहावयास मिळाला आहे. कायम दुष्काळी असणाऱ्या या तालुक्‍यात पाणी प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. मनरेगाच्या घोटाळ्याने तालुका गाजत आहे. त्यातच या निवडणुकीत इतर तालुक्‍यांप्रमाणे नेत्यांची सरमिसळ झाल्याने राजकारणाचा खेळखंडोबा झाला आहे. कॉंग्रेसमधील धगधगता संघर्ष आणि राष्ट्रवादीची झालेली शकले यात भाजपचे पारडे जड वाटत असले तरी त्यांनाही ही निवडणूक सोपी नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या या तालुक्‍यातही चुरस आणि ईर्षा दिसून येत आहे. 

जत तालुक्‍यात एकूण नऊ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे 18 गण आहेत. यापूर्वी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत पारंपरिक संघर्ष होत असे. मात्र यंदा पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपचे विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्यामुळे या तालुक्‍यात भाजपनेही स्वबळावर ताकद आजमावण्याची तयारी केली आहे. तर कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा दादा गट आणि कदम गटातील संघर्ष उफाळून आला आहे. सुरेश शिंदेंच्या वसंतदादा आघाडी आणि राष्ट्रवादी यांनी तिसरी आघाडी उभी करून भाजप आणि कॉंग्रेससमोर आव्हान उभे केले आहे. 

आमदार विलासराव जगताप यांच्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र पुत्र मनोज यांना अद्याप कुठे संधी देता आलेली नाही, याचे शल्य त्यांना आहे. यापूर्वी पंचायत समितीसाठी दोनवेळा त्यांनी प्रयत्न केले; मात्र अपयश आले. तर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत विक्रम सावंत यांच्याकडूनच त्यांचा पराभव झाला. आता पुन्हा तिकोंडी गणातून पंचायत समितीसाठी मनोज यांना उतरवले आहे. ही निवडणूक आमदारांसाठी जशी प्रतिष्ठेची आहे तशीच तालुक्‍यात भाजपला मोठे यश मिळवून देण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांतील कामाचा लेखाजोखा त्यांना सादर करावा लागेल. पण मुख्य अडथळा त्यांच्यासमोर आहे तो पाणी प्रश्‍न न सुटल्याचा आणि मनरेगा घोटाळ्याचा. विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत असणारे सुरेश शिंदे आणि जनसुराज्यचे बसवराज पाटील यांना जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवेळी पुत्रप्रेमाने ते गमावून बसले आहेत. 

कॉंग्रेसच्या कदम गटाचे विक्रम सावंत आणि दादा गटाचे सुरेश शिंदे यांनी परत सवता सुभा मांडला आहे. तिकीट वाटपात दखल न घेतल्याने शिंदे यांनी मन्सूर खतीब यांच्या सहकार्याने स्वतंत्र वसंतदादा विकास आघाडी स्थापन करून राष्ट्रवादीशी तिसरी आघाडी केली आहे. कॉंग्रेसच्या मुंबईतील बैठकीतही जतमधील वादाचा मुद्दा माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी उपस्थित केला होता. कॉंग्रेसने संख मतदार संघात जनसुराज्यशी युती केली आहे. त्यामुळे ती जागा जनसुराज्यचे नेते बसवराज पाटील यांच्या गटासाठी सोडली आहे. 

विक्रम सावंत सध्या जिल्हा बॅंकेचे संचालक आहेत. मात्र त्यांनाही यापूर्वी जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागला आहे. विधानसभेला त्यांनी मोदी लाटेतही 54 हजार मते मिळवली होती. ते स्वत: उमदी गटातून उभे आहेत. तेथे भाजप आणि राष्ट्रवादीचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे ते मतदार संघातच अडकून पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्याचा परिणाम तालुक्‍यातील इतर गटांवर होऊ शकतो. शिवाय त्यांच्या चुलती उमदी पंचायत समिती गणातून भाजपच्या तिकिटावर उभ्या आहेत. त्यांचे चुलत बंधू उमेश सावंत हे विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत. या दोन भावांचा संघर्ष तालुक्‍याने पाहिला आहे. 

सांगली बाजार समितीचे माजी सभापती राहिलेले सुरेश शिंदे हे मदन पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते होते. त्यांना प्रतीक पाटील यांचीही साथ आहे. त्यांनी मन्सूर खतीब यांना घेऊन वसंतदादा आघाडी स्थापन केली आणि राष्ट्रवादीशी आघाडी करून पूर्ण तालुक्‍यात तिसऱ्या आघाडीचे उमेदवार उभे केले आहेत. विधान सभा निवडणुकीपूर्वी भाजपचे आमदार राहिलेले प्रकाश शेंडगे आज राष्ट्रवादीचे नेते बनले आहेत. त्यांच्यासह चन्नप्पा होर्तीकर, रमेश पाटील यांनी तालुक्‍यात राष्ट्रवादीचे आव्हान राखण्याची धडपड सुरू केली आहे. या आघाडीत वसंदादा आघाडीला जिल्हा परिषदेच्या तीन, तर राष्ट्रवादीला सहा जागा मिळाल्या आहेत. यापैकी मुचंडी आणि उमदीत राष्ट्रवादीचे, तर शेगाव, डफळापूर आणि बनाळी या गटात कॉंग्रेसचे तगडे उमेदवार आहेत. 

पूर्व भागातील 42 गावांचा पाणीप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. पाणी संघर्ष समितीने उमदीतून निवृत्ती शिंदे यांना उमेदवारी दिली होती. मात्र आज त्यांनी माघार घेऊन कॉंग्रेसला पाठिंबा दिला आहे. अद्याप तालुक्‍यात म्हैसाळ योजनेची अपूर्ण कामे, पूर्व भागासाठी पाण्याची सुविधा हे प्रश्‍न मोठे आहेत. तेच निवडणुकीत कळीचे मुद्दे ठरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT