जगाच्या पाठीवर कुठंही कोल्हापूर म्हटलं की कुस्ती, पैलवान अशाच गोष्टी लोकांच्या डोक्यात येतात; पण जवळपास 140 वर्षांपूर्वी कोल्हापूरचं नाव विज्ञानाच्या प्रसारासाठी देशभर गाजत होतं आणि याचं श्रेय होतं ते प्रा. बाळाजी प्रभाकर मोडक यांचं.
1847 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आचऱ्यात जन्मलेल्या मोडकांनी आपलं शालेय शिक्षण सांगलीत आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पूर्ण केलं. बीएच्या परीक्षेला मात्र ते प्रकृती बरी नसल्यामुळं बसू शकले नाहीत. 1869 मध्ये ते कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये असिस्टंट टीचर म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांची नाळ जी कोल्हापूरशी जुळली ती शेवटपर्यंत सुटली नाही.
प्रा. मोडकांच्या उत्तम अध्यापनामुळे राजघराण्यात त्यांची शिक्षक म्हणून नेमणूक झाली. शिवाय कोल्हापुरातल्या राजघराण्यातल्या मुलांसाठी काढलेल्या विशेष शाळेचेही ते सुपरिटेंडन्ट होते.
ब्रिटिश शिक्षणपद्धती त्याकाळात भारतात अजून रुजलेली नव्हती. विज्ञान इंग्रजीत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही अनेक अडचणी येत. मोडकांना स्वतःलाही या प्रकारच्या अडचणी आल्यावर त्यांनी यावर उपाय म्हणून विज्ञान विषयाची पुस्तके मराठीत आणण्याचा निर्धार केला आणि 1876 मध्ये रसायनशास्त्र पूर्वार्ध हे मराठीतले पहिले विज्ञानाचे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक लिहिताना त्यांनी अनेक शास्त्रीय शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द तयार केले. या पुस्तकाची सर्वत्र अतिशय वाहवा झाली आणि मग मोडकांनी मागं वळून पाहिलंच नाही
मोडकांनी एकूण 43 पुस्तकं लिहिली. यांत विज्ञान, इतिहास, भूगोल आणि बॅंकिंग या विषयांचा समावेश होता. मोडकांची विज्ञानविषयक पुस्तकं इतकी दर्जेदार होती की पुस्तकांच्या मूळ लेखकांनीही अनेकदा त्यांना नावाजलेले होते. त्यांच्या अनेक पुस्तकांचे बडोदा संस्थानाने गुजरातीत आणि म्हैसूर संस्थानाने कन्नडमध्ये भाषांतर करून त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केलेला होता. मुंबई इलाख्याच्या शिक्षण मंडळाने त्यांच्या पुस्तकांची शिफारस सर्व शाळांना केलेली होती.
या सर्व गोष्टींसाठी कोल्हापूर संस्थानातर्फे त्यांना वेळोवेळी सहकार्य मिळत असे. याशिवाय छत्रपती शाहू महाराजांचे जनक पिता आबासाहेब घाटगे आणि मिरजेचे राजे गंगाधरराव पटवर्धन या त्यांच्या विद्यार्थ्यांकडूनही वेळोवेळी त्यांना आर्थिक मदत मिळत असे. करवीर संस्थानातर्फे 1883 ते 1896 या काळात दरवर्षी नाताळच्या सुटीत ते राजाराम कॉलेजात विज्ञान प्रदर्शन भरवत. हे प्रदर्शन त्या काळात इतके प्रसिद्ध होते की भेट द्यायला लांबून लोक येत. एक्स-रे मशीन, कॅमेरा, दुर्बिण, सूक्ष्मदर्शक, तारयंत्र, पाण्यावर चालणारी गिरणी, गाड्यांची इंजिन्स, आगीचा बंब अशा त्या काळातल्या अद्ययावत वैज्ञानिक उपकरणांची या प्रदर्शनात सामान्य लोकांना ओळख करून दिली जाई.
विज्ञानाव्यतिरिक्त इतिहास लेखनातही मोडकांनी आपला ठसा उमटवला. कोल्हापूर राज्याचा इतिहास या पुस्तकाचे 2 खंड, कोल्हापूर व कर्नाटक प्रांतातील राज्ये 2 खंड, मुस्लिम राजवटींचा इतिहास, बहमनी राज्याचा इतिहास अशा एकाहून एक सरस ऐतिहासिक दस्तावेजांची त्यांनी निर्मिती केली. ब्रिटिश सरकारने तयार केलेल्या कोल्हापूरच्या गॅझेटच्या मराठी भाषांतराचे कार्यही त्यांनी पार पाडले.
1900 मध्ये मोडक राजाराम कॉलेजातून उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाले. लगेचच बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाडांनी बडोदा संस्थानच्या शिक्षणखात्याचे प्रमुख होण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला; पण मोडकांनी कोल्हापूर संस्थानातच राहण्याचे ठरवले. कोल्हापूर संस्थानाने निवृत्तीनंतरही त्यांना राजाराम कॉलेजच्या अद्ययावत प्रयोगशाळेत कधीही जाऊन काम करण्याची मुभा दिलेली होती. निवृत्तीनंतरही मोडक विज्ञानाच्या अभ्यासात आणि लिखाणातच गुंतलेले होते. 1906 मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत ते सतत कार्यमग्न होते.
महाराष्ट्रात विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यात मोलाची कामगिरी पार पाडलेला हा विद्वान गृहस्थ आज मात्र त्याच्या कर्मभूमीत कोल्हापुरातच विस्मृतीत गेलेला आहे.
कोल्हापूर
कोल्हापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.