Sanskruti Kharat Died in Bus Accident esakal
कोल्हापूर

Kolhapur : आईचा टाहो, थिजलेला बाप अन् हादरलेलं शहर; आईसमोरच बसखाली सापडून पोटचा गोळा ठार

स्पीडब्रेकरने दगा दिला आणि काही क्षणातच बसखाली सापडून आईच्या समोरच पोटची लाडकी पोर या दुनियेतूनच कायमची निघून गेली.

सकाळ डिजिटल टीम

शाळेत पोचायला आता केवळ काहीच मिनिटे उरली होती. अनपेक्षितपणे स्पीडब्रेकरने दगा दिला.

सानेगुरुजी वसाहत : बुधवारचा दिवस; युनिफॉर्मला सुटी...स्वारी भलतीच खूश... आवडीचा ड्रेस परिधान केला... दप्तर, खाऊचा डबा बरोबर घेतला आणि आईबरोबर ती शाळेसाठी बाहेर पडली. पाऊसही थांबायला तयार नव्हता. त्याचवेळी रस्त्यावर वाहनांचीही जणू शर्यतच सुरू होती.

शाळेत पोचायला आता केवळ काहीच मिनिटे उरली होती. अनपेक्षितपणे स्पीडब्रेकरने दगा दिला आणि काही क्षणातच बसखाली सापडून आईच्या समोरच पोटची लाडकी पोर या दुनियेतूनच कायमची निघून गेली. नेमके काय झाले आहे, हे तिला काहीच समजेना.

भानावर येताच ‘माझी संस्कृती कुठे गेली हो...’ असा आर्त टाहो तिनं फोडला. सानेगुरुजी वसाहतीतील प्रतिराज बंगल्यासमोरची ही घटना साऱ्यांचेच काळीज चिरून टाकणारी ठरली. घटनेची माहिती समजताच बापानेही टाहो फोडला. तो अक्षरशः थिजून गेला आणि ही घटना समजल्यानंतर सारे शहरही हादरून गेले.

वेळ सकाळी पावणेदहाची. शाळा, कार्यालये सुरू होण्याची वेळ. याचवेळी नेहा खरात आपल्या चार वर्षांच्या संस्कृती या मुलीला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या. रस्त्यावर प्रचंड वाहतूक. प्रत्येकाला वेळेवर पोचण्याची घाई आणि या साऱ्या धावपळीतच प्रतिराज बंगल्यासमोरील बसथांब्यावर एक बस थांबली होती.

ही बस प्रवासी घेऊन पुढे जाणार इतक्यात नेहा यांच्या दुचाकीचा स्पीडब्रेकरमुळे तोल गेला आणि संस्कृती रस्त्यावर पडली. बसनेही याचवेळी वेग घेतला आणि बसच्या मागील चाकात संस्कृती चिरडली गेली. रस्त्यावरची सारी वाहतूक एका क्षणात स्तब्ध झाली. साऱ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. आई-वडिलांबरोबर शाळेला निघालेली इतर पोरं-पोरीही अक्षरशः गांगरून गेली आणि नकळत त्यांच्याही अश्रूंचा बांध फुटू लागला.

उपस्थित नागरिकांनी संस्कृतीला तत्काळ खासगी दवाखान्यात नेले; परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना ‘सीपीआर’मध्ये नेण्यास सांगितले. तेथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या अपघात प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी बस चालक दीपक शिवाजी सूर्यवंशी (रा. हेर्ले, ता. हातकणंगले) यांच्यासह केएमटी बस ताब्यात घेतली आहे.

नेमका अपघात कसा घडला?

प्रतिराज बंगल्यासमोर केएमटी बस स्टॉप आहे. स्टॉपवर प्रवासी घेण्यासाठी केएमटी बस (एमएच ०९ सी डब्लू ०३५५) उभी होती. त्या बसला नेहा खरात दुचाकी (एमएच ०९ डी एच ०२४३) वरून ओव्हरटेक करून पुढे जात होत्या; मात्र, तेथील स्पीड ब्रेकरचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे त्यांचे गाडीवरील नियंत्रण गेले व दुचाकीचा हँडल बसला घासले. त्यामुळे तोल जाऊन नेहा उजव्या बाजूला फेकल्या गेल्या.

तर, मागे बसलेली संस्कृती (४) रस्त्यावर खाली पडली. याचवेळी प्रवासी घेऊन बसनेही गती घेतल्याने संस्कृती बसच्या मागील चाकात चिरडली गेली. नेहा व रत्नदीप खरात रहायला लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर परिसरात. नेहा सध्या जीवबाबा नाना जाधव पार्कमधील माहेरी बाळंतपणासाठी आल्या होत्या. त्यांना संस्कृती ही थोरली मुलगी, तर आठ महिन्यांचा धाकटा मुलगा आहे.

आमचा काय गुन्हा?

अपघाताचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर नेहा यांनी तातडीने पती रत्नदीप यांना संपर्क साधला. तेही त्यांच्या मित्र-परिवारासह घटनास्थळी दाखल झाले; पण त्यावेळी नेहा आणि संस्कृती दोघेही दिसत नव्हत्या. त्यांनी शोधाशोध करत स्थानिक नागरिकांना माहिती विचारताच दोघीही रुग्णालयात गेल्याची माहिती मिळाली. ‘सीपीआर’मध्ये त्यांची भेट झाली तेव्हा नेहा यांना काहीच सुचत नव्हते. आपली पोर गेल्याचे समजताच मग या बापानेही आक्रोश केला. ‘आमचा काय गुन्हा..आमची लाडकी पोर अशी कशी गेली’ असाच त्यांचा सूर होता.

प्रशासनाच्या पोटातलं पाणी आता तरी हलणार का?

नेहा बाळंतपणासाठी माहेरी जीवबानाना जाधव पार्क येथे राहण्यासाठी गेल्या आहेत. त्यांना आठ महिन्यांचा धाकटा मुलगा आहे. बाळंतपणानंतर त्या सासरी लक्ष्मीपुरी येथे येणार होत्या; पण पावसाळ्यात पुराच्या पाण्याची धास्ती असल्याने आणखी काही दिवस त्यांनी माहेरीच राहण्याचे ठरले. माहेरातूनच त्या संस्कृतीला रोज शाळेला सोडत व आणत; पण आज त्यांच्याबाबत घडलेली सुन्न करणाऱ्या घटनेची माहिती बघता बघता सर्वत्र पसरली.

परिसरातील पालकांनी तर या घटनेचा इतका धसका घेतला की त्यांनी आपल्या मुलांना शाळेलाच न सोडणे पसंत केले. सानेगुरुजी वसाहतीतील स्पीडब्रेकरबाबत वारंवार तक्रारी होतात. आता तरी प्रशासनाच्या पोटातील पाणी हलणार का, असा संतप्त सवालही यानिमित्ताने व्यक्त झाला. दरम्यान, संस्कृतीच्या पार्थिवावर सायंकाळी सातच्या सुमारास अंत्यसंस्कार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT