चंदगड (कोल्हापूर) : तालुक्यातील बांद्राई धनगरवाडा कर्नाटक, कोकण आणि गोव्याच्या सीमेवर घनदाट जंगलात वसलेला. वाघ, बिबट्या, अस्वल यांसारख्या हिंस्र प्राण्यांशी आणि निसर्गाशी दोन हात करीत जगणाऱ्या माणसांचे काळीजसुद्धा वाघासारखेच; परंतु पंढरपूर अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू आणि ११ जण गंभीर जखमी झाल्याने वाड्यावर शोककळा पसरली आहे.
जंगलात राहणाऱ्या वाड्यावरील अपघातानंतरची शांतता काळीज चिरणारी आहे. प्रत्येकाच्या मनात दुःखाचा उमाळा आहे; परंतु सांत्वन कोणी कोणाचे करायचे? सर्वांच्याच भावना थिजल्या आहेत. गुरुवारी रात्री हसत खेळत सर्वांचा निरोप घेऊन पंढरपूरकडे रवाना झालेल्या आप्तेष्टांचा शुक्रवारी पहाटे अपघात झाला. चालक तुकाराम कदम यांच्यासह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. वाड्यावर ही बातमी येताच शोककळा पसरली. सर्वांचे लक्ष सोलापूरकडे लागले.
हेही वाचा - प्रेम, वात्सल्याने फुलली आयुष्याची दुसरी इनिंग -
आज पहाटे चौघांचे मृतदेह येताच भावनांचे बांध फुटले. वाड्यावर एकच आक्रोश झाला. परंतु सावरायचे तरी कोणी कोणाला? एकमेकाशी नातेसंबंध जुळलेल्या प्रत्येकाचेच कोणी ना कोणी कायमचे निघून गेलेले. त्याचे दुःख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होते. सात वर्षांच्या सुनीता ऊर्फ पिंकीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या. अजाण, निष्पाप पिंकीचा प्रवासाचा आनंद नियतीने असा हिरावलेला पाहून हळहळ व्यक्त झाली. एरवी जंगलातील शांतता हवीहवीशी वाटणारी; परंतु अपघातानंतरची शांतता काळीज हेलावणारी आहे.
मदतीसाठी हाक
शेती आणि पशुपालनावर गुजराण करणाऱ्या नागरिकांना आर्थिक मदतीची गरज आहे. सोलापूर सिव्हिल रुग्णालयात उपचाराचा खर्च भागवावा लागेल. त्याशिवाय घरी पतरल्यानंतर जखमीपैकी अनेकांना विश्रांतीची गरज असेल. त्या काळात त्यांचा कौटुंबिक चरितार्थ चालण्यासाठीसुध्दा मदत गरजेची आहे. दानशूर व्यक्ती, संस्थांनी सहकार्याचा हात देणे गरजेचे आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.