राशिवडे बुद्रुक : यंदा पावसाळ्यात राधानगरी तालुक्यात सुमारे १० मनुष्यवस्तीच्या ठिकाणी भूस्खलन झाले, तर त्याहून अधिक जंगल आणि डोंगर कपारीत भूस्खलन झाले. नुकसानीसह एका दाम्पत्याला जीव गमवावा लागला. भविष्यात मोठा पाऊस कोसळेल, तेव्हा असे प्रकार होत राहतील, असा अंदाज भूगर्भ अभ्यासकांनी वर्तवला आहे. यामुळे राधानगरी तालुक्यावर भूस्खलनाची टांगती तलवार कायम राहणार आहे.
तालुक्यातील कुपलेवाडी येथे घर डोंगराखाली गाडले. यात एक दाम्पत्य व चार जनावरे गडप झाली. याच गावाभोवतीच्या डोंगराला भेग पडली. त्यावेळी परिसरात ८९४ मिलिमीटर इतका पाऊस कोसळला. परिणामी येथील डोंगर कपारीत जमीन घसरण्याचे प्रकार घडले. यामुळे येथील भूस्तर हलल्याचे स्पष्ट झाले. भविष्यात ढगफुटीसारखा पाऊस पडेल, तेव्हा असे धोके निश्चित आहेत, असा अंदाज बायसन क्लबच्या माध्यमातून भेट दिलेल्या पुणे येथील सतर्क टीमने व्यक्त केला आहे.
पाऊस वाढलाच, तर डोंगरातून बाहेर पडणारे ओघळ व गढूळ पाणी येऊ लागल्यास गावकऱ्यांनी गाव सोडावे, असा इशाराही या टीमने दिला आहे. यामुळे हा परिसर भूस्खलन प्रवण क्षेत्र म्हणून भविष्यात ओळखला जाईल. राधानगरीशेजारील पाटपन्हाळा परिसरात याच दिवशी जंगलाचा भागच घसरून रस्ता गडप झाला.
राधानगरी- कोल्हापूर या राज्यमार्गावरील गैबी घाटात पाच ठिकाणी भूस्खलन झाले. शिरगाव येथे डोंगरावरून झाड उन्मळून थेट एका घरात घुसले. घरातील तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. गैबीपासून सोळांकूरकडे जाणारा घाट आणि चक्रेश्वरवाडी, बारडवाडीचा परिसर भेगाळल्याने भविष्यात भूस्खलनाच्या छायेखाली आहे.
भूस्खलनामुळे हे झाले....
पावसामुळे डोंगर वाहून पिकाऊ जमिनी गाडल्या
ओढ्यांनी पात्रे बदलली मोठमोठे दगड पिकाऊ
जमिनीत साचले उसासह भात, सोयाबीन, नाचणी पिकांचा चिखल
३८० हेक्टर एकूण बाधित क्षेत्र
४३३२ एकूण नुकसानग्रस्त शेतकरी
१ कोटी नुकसानभरपाईसाठी गरज
तालुक्यातील यंदाचे नुकसान असे
वाहून गेलेली जमीन १९७ हेक्टर
नुकसानग्रस्त शेतकरी २०९६
नुकसानीचा आकडा ७५ लाख
शेतात गाळ क्षेत्र १८५ हेक्टर
नुकसानग्रस्त शेतकरी २२३६
शासनाने ही दिली मदत...
दोन व्यक्तींच्या मयतांच्या वारसांना आठ लाखांची मदत महसूलने दिली
पूरग्रस्त २३० जनावरांसाठी १७.२५ लाखांचे सानुग्रह अनुदान वाटप केले
सात जनावरे मृत- त्यांच्यासाठी तीन लाखांची आवश्यकता २९७ घरांची पडझड, ६६ गोठे, ६५ दुकाने आणि शेतीत ११८ गावे आणि चार कुक्कुटपालन व्यवसायांचे नुकसान
यासाठी ५ कोटींवर रुपयांची मागणी महसूल विभागाने शासनाकडे केली आहे.
"तालुक्यातील पाटपन्हाळा असो की कुपलेवाडी या गावांच्या माथ्यावरील डोंगर अस्थिर झाले आहेत. भविष्यात मोठा पाऊस झाल्यास इथे भूस्खलनाचे धोके आहेत. या भागाची पाहणी केली. ग्रामस्थांनी जागरूक राहावे लागेल. निसर्ग अशा वेळी सूचना देतो. गाळ मिश्रित पाणी झिरपते, झाडे कलतात, जमिनीतून आवाज येतात, हे ओळखून भविष्यात नागरिकांनी दक्ष राहावे." - मयुरेश प्रभुणे, परेश म्हेत्रे, टीम सतर्क - पुणे
"भूस्खलन झालेल्या गावांना भेटी दिल्या आहेत. तेथील व इतरत्र शेती नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तातडीची मदत दिली आहे. अजूनही नुकसानग्रस्त भागांना व शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आम्ही आणखी मागणी केली आहे. लवकरच ती देऊ."- मीना निंबाळकर, तहसीलदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.