भीतीच्या छायेत असलेल्या मुलांचे चार दिवसांपासून शाळेत जाणं तूर्त थांबलं असलं तरीही ते पुन्हा पूर्वपदावर आणण्याची गरज आहे.
शाहूवाडी : गजापुरातील दंगलग्रस्तांना (Vishalgad Riots) मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह विविध पक्ष, संघटना आणि स्वयंसेवी संस्था मदतीसाठी येत आहेत. नित्य जगण्यासाठी संसारोपयोगी साहित्याची मदत जरूर होत आहे. मात्र, वाडीतील भयभीत झालेली मुलं गेले चार दिवस शाळेत गेलेली नाहीत. त्यातच अंगणवाडीही (Anganwadi) अडगळीच्या साहित्याने भरून गेली आहे. त्यामुळे मुलांच्या मनातली भीती दूर करून पुन्हा अंगणवाडीतील किलबिलाट सुरू करावी लागणार आहे.
दंगल होऊन चार दिवस उलटून गेले तरीही ही मुले भीतीच्या छायेखाली आहेत. कुटुंबातील महिला मदत घेण्यासाठी एकमेकाला खेटून उभ्या राहत आहेत. त्यांच्यासोबत लहान मुले, मुलीही आपल्या हतबल आई-वडिलांकडे पाहून खिन्न होऊन उभ्या आहेत. गर्दीत कोणीतरी मुलांना विचारतोय, शाळेत गेला नाहीस का? यावरून मुलं फक्त पाहत राहतात आणि त्यांच्या डोळ्यात आकस्मिक दंगलीतून निर्माण झालेली भीतीही ठळक उमटते.
भीतीच्या छायेत असलेल्या मुलांचे चार दिवसांपासून शाळेत जाणं तूर्त थांबलं असलं तरीही ते पुन्हा पूर्वपदावर आणण्याची गरज आहे. भौतिक साहित्याची मदत या दंगलग्रस्तांना जरूर मिळेल. मात्र, आकस्मिक झालेल्या हल्ल्यामुळे घरावरील, गल्लीतील घरांवरील दगडफेक या घटनेची भीती मुलांच्या मनात दडली आहे. त्यानंतर गेले चार दिवस सतत वाडीवर असणारे पोलिस, राजकीय नेते व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक दाखल होत आहे.
याचा प्रभाव मुलांवर आहे. येथील अंगणवाडीत एकच खोली. स्वच्छतागृहाची नीट व्यवस्था नाही की पिण्याच्या पाण्याचा गंज सोडला तर यापलीकडे पर्यायी व्यवस्था नाही. घरगुती खोलीतच भरणारी ही अंगणवाडी सध्या दंगलीत ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांच्या उरलेल्या साहित्यांनी ही खोली भरली आहे.
जिल्हा प्रशासनाचे आज एक पथक तळ ठोकून होते. त्यांनी अंगणवाडीची माहिती घेतली. तातडीने प्रस्ताव तयार करून सर्व सुविधांसह सुसज्ज अशी अंगणवाडी येथे तयार व्हावी, असे किमान तोंडी चर्चेत तरी ठरले; पण सध्या अंगणवाडीत मुलंच येत नाहीत, पालकही त्यांना पाठवत नाहीत ही अडचण आणि मुलांच्या आणि पालकांच्या मनातील भीती दूर करायची कशी? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
कोणी मदतीला आले तर आई-वडील दंगलीची घटना घडली त्या दिवशी काय झालं हे डोळ्यात आसवं दाटून सांगतात आणि ते पाहून मुलेही आई-वडिलांना बिलगतात, असे येथील चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.