Tusker Elephant esakal
कोल्हापूर

Tusker Elephant : 'टस्कर हत्ती' बेळगावच्या वेशीवर; फटाके-काडतूसांचा आवाज करून पोलिसांनी हत्तीला लावले हुसकावून

सध्या वन विभाग व पोलिस यंत्रणेने टस्करला अतिवाड गावाकडे हुसकावून लावले.

सकाळ डिजिटल टीम

चंदगड तालुक्यात वावरणारा टस्कर सोमवारी रात्री उचगाव शिवारात आला होता.

कंग्राळी खुर्द : बेळगाव शहराच्या (Belgaum) वेशीवर म्हणजे बसव कॉलनी, बीके कंग्राळी, कंग्राळी खुर्द, अलतग्यातील शिवारात काल (शुक्रवार) सकाळीच टस्कराचे (नर हत्ती) आगमन झाल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. हत्तीला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली. सध्या वन विभाग व पोलिस यंत्रणेने टस्करला अतिवाड गावाकडे हुसकावून लावले.

शुक्रवारी सकाळी प्रथम बसव कॉलनी परिसरातून हा टस्कर (Tusker Elephant) आला. त्यानंतर बीके कंग्राळी शेतवडीतून कंग्राळी खुर्द हद्दीत आला. पुढे जात-कडोली मुख्य रस्त्यावरून अलतगा क्रॉसच्या पेट्रोल पंपाजवळून अलतगा शिवारात गेला. सकाळी नागरिकांना त्याचे दर्शन झाले. वन विभागाचे (Forest Department) अधिकारी, पोलिसांनी धाव घेत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच बेळगाव-कडोली रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद केली.

फटाके व काडतूसांचा आवाज करून हत्तीला पुढे पुढे हुसकावले. टस्कर अलतगा गावजवळ जाऊन शाळेच्या वरच्या बाजूने अगसगा दिशेने गेला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फटाके लावत पुढे अतवाड, कितवाड दिशेने हुसकावून लावले. टस्कर पहिल्यांदाच शहरापासून इतक्या जवळ आल्यामुळे धोका पत्करून बघ्यांनी गर्दी केली होती.

गुरुवारी महाराष्ट्राच्या हद्दीतून बेकिनकरे भागात टस्कर दिसला. रात्री तेथे ट्रॅक्टर ट्रॉलीही उलटी केली. रात्री बेकिनकरे, गोजगा, मण्णूर, आंबेवाडी, कंग्राळी बीके, कंग्राळी असा प्रवास केला. महामार्गावर वाहनांची ये-जा पाहून पुन्हा माघारी फिरला. त्यानंतर बसव कॉलनी, बीके कंग्राळी, कंग्राळी खुर्द असा प्रवास केला असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या मार्गाने हा टस्कर गेला असल्यास बसव कालनी, बीके कंग्राळी भागातून काकती व इंडालच्या मधल्या भागातील झाडीतून आला असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली. टस्कर एकटाच असल्याने तो बिथरून सतत पळत होता.

बेळगाव परिसरात टस्कर आल्याची माहिती समजताच सकाळी सहा वाजता टस्कराला माघारी पाठविण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. बेकिनकेरे येथून सुळगे (हिं.) मार्गे कंग्राळी बुद्रुककडे तो गेला होता. त्याला पुन्हा माघारी पाठविण्यात आले आहे. लोकवस्तीमध्ये येण्यापासून टस्कराला रोखले. सध्या आवश्यक ती खबरदारी वनखात्याने घेतली आहे.

- एस. के. कल्लोळीकर, जिल्हा उपवनसंरक्षक

बेकिनकेरेत दोन दुचाकींची नासधूस

दोन दिवसांपूर्वी ट्रॉली व जनरेटर उलटी केलेल्या टस्कराने शुक्रवारी (ता. १) बेकिनकेरेत पुन्हा धुमाकूळ घातला. गुरुवारी रात्री टस्कर बेकिनकेरे, अगसगेमार्गे कंग्राळी, बसव कॉलनी, वैभवनगर परिसरात गेला होता. पण शुक्रवारी सकाळी परत या ठिकाणी येऊन ‘टस्कर’ने दोन दुचाकींचे नुकसान केले. टस्कर अगसगे शिवारातून पुन्हा बेकिनकेरे गावात पोहोचला.

सकाळी दहा वाजता बेकिनकेरे-अगसगा मार्गावर टस्कर ग्रामस्थांना दिसला. त्यानंतर ग्रामस्थांची धावपळ सुरू झाली. गावात लक्ष्मी मंदिराच्या उद्‌घाटनासाठी पै पाहुणे मोठ्या संख्येने आले आहेत. ते सर्वजण टस्कराला पाहण्यासाठी अगसगा रस्त्यावर पोहोचले. दरम्यानच्या काळात टस्कर गावच्या तलावात उतरला. त्यावेळी ग्रामस्थांनी जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली, फटाके वाजविले. त्यामुळे टस्कर तलावातून बाहेर पडला व जवळच असलेल्या ज्ञानेश्‍वरनगर या नागरी वसाहतीत घुसला. त्या ठिकाणी टस्कराने गल्ली क्रमांक चारमध्ये असलेल्या दोन दुचाकींची नासधूस केली. टस्कर गावात घुसल्याने एकच खळबळ उडाली. अनेकांनी घराचे दरवाजे बंद केले. टस्कर पाहण्यासाठी घरांच्या छतावर मोठी गर्दी झाली. बेकिनकेरेत घुसल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस व वन खात्याचे अधिकारी तसेच कर्मचारी तातडीने दाखल झाले.

डीसीएफ शंकर कल्लोळकर, एसीएफ शिवरूद्राप्पा कबाडी यांच्यासह वन खात्याच्या ४० कर्मचाऱ्यांचे पथक गावात दाखल झाले. काकती ठाण्याचे पोलिसही गावात आले. वनखात्याचे अधिकारी तसेच कर्मचारी व पोलिसांनी टस्कराला हुसकावण्यास सुरुवात केली. त्यावर टस्कर कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या जंगलात गेला. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास टस्कर जंगलातून पुन्हा बेकिनकेरे गावच्या हद्दीतील लहान तलावात पाणी पिण्यासाठी उतरला. वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी पुन्हा तेथे पोहोचले व त्यांनी टस्कराला हुसकावले. मग तो चंदगड तालुक्यातील जंगलात गेल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली.

चंदगड तालुक्यात वावरणारा टस्कर सोमवारी (ता. २६) रात्री उचगाव शिवारात आला होता. बसुर्ते फाट्याजवळ रात्री दीड वाजण्याच्या सुमारास काहींना या टस्कराचे दर्शन झाले होते. मंगळवारी पहाटे टस्कर पुन्हा चंदगड तालुक्यातील सुंडी, महिपाळगड परिसरात गेला होता. बुधवारी (ता. २७) रात्री टस्कराने बेकिनकेरेतील एका शेतकऱ्याची ट्रॉली उलटी केली होती. शिवाय गुरुवारी दुपारी शेतकऱ्याच्या केळीच्या झाडांचे व फूलशेतीचे नुकसान केले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी टस्कर थेट गावात घुसल्याने बेकिनकेरे ग्रामस्थ धास्तावले आहेत.

बेकिनकेरेतच आधी गवा, आता टस्कर

बेकिनकेरे हे गाव कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. महाराष्ट्रातील चंदगड, गडहिंग्लज व आजरा या तीन तालुक्यांतील नागरिकांची बेळगावला मोठ्या प्रमाणात ये-जा होते. त्या सर्वांना बेकिनकेरे गावातूनच जावे लागते. याच मार्गावर आधी गवा व आता टस्कराचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SCROLL FOR NEXT