शिराळा : कोरोनाच्या बंदोबस्तात अमोल कुलकर्णी या हरहुन्नरी सहायक पोलीस निरीक्षक अधिकाऱ्याने दुसऱ्यांचा जीव वाचवता वाचवता स्वतःचा जीव गमावला. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल एक दिवस आधी आला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले
आपल्या कर्तव्यात पारंगत असणाऱ्या व सर्वांच्या मदतीला धावणाऱ्या सहकाऱ्याला एवढ्या लवकर गमावावे लागेल याची पुसटशी कल्पना त्यांच्या सहकाऱ्यांना नव्हती.त्यांच्या या एक्झिटचा सर्वांच्या मनाला चटका लागला आहे.सहा महिन्यांपूर्वी अमोल यांना शाहूनगर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रगटीकरण अधिकारी म्हणून बढती मिळाली होती. त्यांचे काम अगदी सुरळीत सुरू होते.
डॉक्टर पत्नी व तीन वर्षांच्या मुलिसह त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत होते. जिथे कमी तिथे मी अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती.त्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांच्या विभागात आपुलकी निर्माण झाली होती. कोणतेही काम त्यांच्यावर सोपवले तरी ते व्यवस्थितरीत्या पूर्ण करत होते. इतर आपल्या सहकाऱ्यांना त्यांच्या तपास कामात मदत करत होते. त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले होते. बढतीच्या पूर्वी त्यांनी सायब शाखेत अधिकारी म्हणून काम केले असल्याने त्यांच्याकडे भरपूर अनुभव होता. त्या ज्ञानाचा उपयोग करूनच ते अनेक गुन्हे उघडकीस आणत होते. जोखमीचे काम करताना त्यांनी कधी वेळेचे बंधन पाळले नाही. ते रात्री उशिरापर्यंत आपले काम करत असत. कामात त्यांनी कधी ही कुचराई केली नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर रुग्णनिवेदनाची जबादारी होती. येणाऱ्या व जाणाऱ्या व परप्रांतीय लोकांची माहिती गोळा करून त्यांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावत होते. त्यामूळे त्यांचा अनेक लोकांशी संपर्क येत होता.
त्यांना ९ मे रोजी ताप आला होता. दोन दिवस बरे वाटले पण पुन्हा ताप आला. १३ तारखेला सायन हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी. कोरोनाची चाचणी केली. १५ तारखेला अहवाल येईल असे सर्व पोलीस सहकारी यांना वाटत होते.त्यामुळे त्या दिवशी दिवसभर सर्व सहकारी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी व्यवस्था करत होते. तशी पूर्ण व्यवस्था झाली होती. पण अहवाल आला नसल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करता आले नाही. त्यामुळे शनिवारी ता.१६ रोजी अहवाल मिळताच उपचार सुरू करण्याचे ठरले. शनिवारी पहाटे पाच वाजता ते त्यांच्या बाथरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. हॉस्पिटलमध्ये नेले असता मृत घोषित केले. अन् सव्वादहा वाजता कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला.
हेही वाचा- धक्कादायक : रत्नागिरीत आणखि ६ पॉझिटिव्ह रुग्ण....
अमोलच्या कामाची पद्धत वेगळी होती.ते मला ज्युनिअर होते.त्यांना कोणतेही काम सांगितले तरी अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण करत. त्यामुळे आमच्या विभागात त्याच्या विषयी आपुलकी निर्माण झाली होती. त्यांनी सहा महिण्यात अनेक गुन्हे उघड केले. इतर सहकाऱ्यांना ते तपासात मदत करत असत. आपल्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी धडपडत राहिले. त्यांच्या पत्नीने आम्हाला कुटुंब मानून त्यांचे अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. त्यामुळे आमच्या कुटुंबाचा हरहुन्नरी व कर्तव्यदक्ष सहकारी आम्ही गमावला याचे दुःख होत आहे. आमचे प्रयत्न निष्फळ ठरले
यशवंतराव शिंदे (सहायक पोलिस निरीक्षक, शाहूनगर, मुंबई)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.