Ayodhya Ram Mandir Inauguration Ram Temples in Kolhapur City esakal
कोल्हापूर

Kolhapur Ram Mandir : अवघा भारत झाला राममय! 'ही' आहेत कोल्हापुरातील प्रभू श्रीरामांची ऐतिहासिक तीर्थस्थाने

ही राम मंदिरे म्हणजे फक्त मंदिरे नसून, शहरातल्या रामभक्तीचा एक ऐतिहासिक पुरावा आहेत.

सकाळ डिजिटल टीम

प्रभू रामचंद्रांच्या काळापासून सुंदर मूर्ती असणारे हे शिवाजी पेठ परिसरातील खांडेकर गल्लीमधील मंदिर अनेकांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे.

-ॲड. प्रसन्न मालेकर

अयोध्या येथे होणाऱ्या श्री राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir Inauguration) महोत्सवाच्या निमित्ताने अवघा भारत राममय झाला असताना, कोल्हापूर (Kolhapur) शहरातील राम मंदिरांचे स्मरण करणेसुद्धा अगत्याचे ठरते. ही राम मंदिरे म्हणजे फक्त मंदिरे नसून, शहरातल्या रामभक्तीचा एक ऐतिहासिक पुरावा आहेत. वस्तूतः रामभक्त म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री हनुमंताची अनेक मंदिरे आहेत. रामरायाची मंदिरेही आहेत. त्यांच्याविषयी...

अंबाबाई मंदिरातील छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचे मंदिर

या सर्व मंदिरांच्या मांदियाळीत अग्रक्रमाने नाव येते ते करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मंदिर (Ambabai Temple) प्रांगणात असलेले छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या अखत्यारीतील श्री राम मंदिर करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मंदिर प्रकारातील पूर्वेच्या बाजूच्या अगदी सार्थपणे सांगायचे तर ईशान्य दिशेपासून पूर्वेच्या दरवाजापर्यंतच्या पाच ओव्या या राम मंदिर म्हणून ओळखल्या जातात. प्रचलित आख्यायिकेनुसार उत्तर भारतातील कोणी एक साधू भारत भ्रमण करत असताना झोळीतून रामरायाच्या राम, लक्ष्मण, जानकी या तीन मूर्ती घेऊन आले आणि त्या इथं आल्यानंतर रामाच्या पारावर विसावल्या व थोड्या काळात त्या साधूंचा देहांत झाला.

साधू महाराजांच्या देहांतानंतर या मूर्ती इथेच प्रतिष्ठापित करण्यात आल्या. त्याची व्यवस्था आजही छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टकडून पाहिली जाते. झुरळे कुटुंबीय याची पूजाअर्चा करतात. दरवर्षी चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्यापासून रामनवमी म्हणजे जन्मोत्सवापर्यंत रोज सायंकाळी रामाच्या पारावर प्रवचन आणि त्यानंतर रोज पालखी सोहळा संपन्न होत असतो. रामनवमी दिवशी दुपारी रामाचा जन्मकाळ करून रात्री रथातून नगरप्रदक्षिणा संपन्न होत असते.

गाभाऱ्यातील साधारणपणे तीन फूट उंचीच्या राम-लक्ष्मण-सीता यांच्या संगमरवरी मूर्तीइतकीच पालखीमध्ये विराजमान करायची उत्सव मूर्तीसुद्धा सुंदर आहे. हातामध्ये धनुष्यबाण घेतलेले राम आणि लक्ष्मण, तर वरद आणि कमल धारण करणारी सीतामातेची मूर्ती पाहताक्षणी भक्तांना आश्वासक स्वरूपाची वाटते. समोर मारुतीरायाची मूर्ती असून, हा राम परिवार लक्षावधी भक्तांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे.

नूतन मराठी शाळा परिसरातील श्रीराम मंदिर

मिरजकर तिकटी परिसरातील नूतन मराठी शाळा हा भाग मंदिरांचा एक मोठा समूह आहे. नृसिंह, नारायण, दत्त, विठ्ठल, ओमकारेश्वर यांच्याबरोबरच विठ्ठल व ओमकारेश्वर यांच्यामध्ये असलेले राम मंदिर हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिरामध्ये राम, लक्ष्मण, सीता अशी नेहमीच्या पठडीतील मूर्ती नसून, रामरक्षेतील वर्णनाप्रमाणे, रामाच्या डाव्या मांडीवर विराजमान झालेली सीता अशा विलोभनीय स्वरूपातील मूर्ती आहे. राजसभेत बसलेल्या रामरायाच्या स्वरूपाची ही मूर्ती असल्याने मूर्तीच्या हातात धनुष्य नसून, वरदमुद्रा आहे. उत्तराभिमुख अशा या मंदिरात राम-जानकी या मूर्तींच्यासमोर हनुमंताची दक्षिणाभिमुख मूर्ती आहे.

मंगळवार पेठेतील राम गल्लीतील राम मंदिर

कोल्हापुरातील कोष्टी गल्लीजवळ असलेल्या संस्थानकालीन राम मंदिराचा नुकताच काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला. या गल्लीत असलेल्या या मंदिरामुळे या अवघ्या गल्लीलाच राम गल्ली म्हणून ओळखले जाते. सर्वत्र मध्यवर्ती राम, त्याच्या उजवीकडे लक्ष्मण आणि डावीकडे सीता अशी पारंपरिक स्वरूपातील मूर्ती असताना या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे मध्यभागी सीतामातेची मूर्ती आहे. सीतामातेच्या उजव्या हाताला प्रभू रामचंद्र, तर डाव्या हाताला लक्ष्मण हे अनोखे रूप या ठिकाणी प्रत्ययाला येते. जनकाची कन्या सीता ही केवळ एक साधारण स्त्री नव्हे, तर साक्षात प्रभू रामचंद्रांची शक्ती आहे. रामरायाचे अवतार कृत्य असणारे रावण वधाचे कृत्य हे सीतामातेमुळेच सहज शक्य झाले. त्यामुळे आदिशक्तीचे शक्तिपीठ असणाऱ्या क्षेत्रात शक्तिस्वरूपिणी सीतेला सन्मानित करणारे हे देवालय वैशिष्ट्यपूर्ण देवालय म्हणावे लागेल. दरवर्षी रामनवमीलाही गुढ्या उभारणारी अनोखी गल्ली असं या राम गल्ली परिसराचं वैशिष्ट्य आहे.

शाहूपुरी चौथ्या गल्लीतील राम मंदिर

शाहूपुरी चौथ्या गल्लीत असणारे राम मंदिर हे शाहूपुरी तसेच लक्ष्मीपुरी भागातील भक्तांसाठी एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र आहे. घडवलेल्या राम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती मंदिरात मध्यवर्ती विराजमान आहेत. दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये रामनवमीचा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपन्न होतो. त्याचबरोबर वर्षभर विविध सन्माननीय वक्त्यांची प्रवचने तसेच विविध आध्यात्मिक विषयातील मार्गदर्शनाचे कार्यक्रम या मंदिराचे आध्यात्मिक वैभव वाढवत असतात.

खांडेकर गल्ली येथील राम मंदिर

प्रभू रामचंद्रांच्या काळापासून सुंदर मूर्ती असणारे हे शिवाजी पेठ परिसरातील खांडेकर गल्लीमधील मंदिर अनेकांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे. राम, लक्ष्मण, सीता या रामरक्षेतील लक्ष्मण आणि सीतेसह राजस वेषात असलेले प्रभू रामचंद्र हे या मंदिराचे श्रद्धास्थान आहे. सुंदर मूर्ती आणि तिथे होणारा रामनवमीचा उत्सव अनेकांच्या औत्सुक्याचा विषय आहे.

मैंदर्गीकर यांच्या वास्तूमधील मंदिर

कसबा बावडा येथे मुख्य रस्त्यावर असलेल्या मैंदर्गीकर यांच्या वास्तूमध्ये प्रभू रामरायाचे सुंदर असे मंदिर आहे. या मंदिरात नूतन मराठी येथे असलेल्या रामरायाच्या डाव्या मांडीवर विराजमान सीतामातेची सुंदर अशी काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. एकाच वर्णनाच्या या दोन वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती कोल्हापूर शहरात असणे हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. दरवर्षी रामनवमीबरोबरच बावड्यातील अनेक आध्यात्मिक उत्सवाच्या वेळेला या राम मंदिराचे आवर्जून दर्शन घेण्याचा प्रघात कसबा बावडा परिसरात आपल्याला पाहायला मिळतो.

गुरू महाराजांच्या वाड्यातील मूर्ती व इतर मंदिरे

करवीर छत्रपती शिवाजी दुसरे यांचे आध्यात्मिक गुरू असलेल्या राजगुरू सिद्धेश्वर बुवा महाराज अर्थात गुरू महाराज यांच्या वाड्यामध्येदेखील रामरायाच्या धातूच्या सुंदर मूर्ती पाहायला मिळतात. रामाच्या मांडीवर विराजमान सीता, बाजूला भरत-शत्रुघ्न, लक्ष्मण आणि हनुमान अशी रामपंचायतनाची सुंदर मूर्ती या ठिकाणी गुरू महाराजांच्या काळापासून पूजेत असलेली आपल्याला पाहायला मिळते.

छत्रपतींच्या अंबा देवघरातसुद्धा रामरायाच्या सुंदर अशा छोट्या मूर्ती नित्य पूजेत पाहायला मिळतात. राजारामपुरी परिसरात असलेल्या आग्नेयमुखी मारुती मंदिरातही हनुमंताच्या समोर साधारण एक ते दीड फूट उंचीच्या राम-लक्ष्मण- सीता यांच्या मूर्ती पश्चिमाभिमुख स्वरूपात प्रतिष्ठापित झालेल्या पाहावयास मिळतात. इथेही हनुमान जयंतीबरोबरच रामनवमीही मोठ्या प्रमाणात साजरी होते. याचबरोबर अनेक मातब्बर घराण्यांमध्ये विशेषत: सरदार घराण्याच्या उपासनेमध्ये रामपंचायतनाच्या सुंदर मूर्ती पूजेत असल्याचे दिसून येते.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र या करवीरक्षेत्री आल्याचा उल्लेख करवीर माहात्म्य तसेच आनंद रामायण अशा ग्रंथांमध्ये आढळून येतो. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि जिथे सीतामातेच्या हातून वाळूचे पिंड घेऊन दशरथ राजा मोक्षाला गेला, असे तीर्थ म्हणजे रावणेश्वर तळे. त्याच्याच काठावर प्रभू रामचंद्रांनी आणि लक्ष्मणांनी शिवलिंग स्थापन केल्याचे उल्लेख करवीर माहात्म्य ग्रंथात आहेत. रामरायाची मूर्ती करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात असलेल्या दशावतार ओवरीमध्येसुद्धा पाहायला मिळते.

एकूणच शक्ती उपासनेचे मुख्य केंद्र असलेल्या करवीर क्षेत्रात रामरायाची उपासनासुद्धा तितक्याच भक्ती व प्रेमाने गेली कित्येक शतके सुरू आहे. कोल्हापूर शहर परिसरात असलेल्या मंदिरांचा आढावा घेताना लगतच्या अनेक गावांमध्येदेखील अनेक सुंदर राम मंदिरे आहेत. शिये, कागल, तारदाळ, इचलकरंजी अशा अनेक ठिकाणी सुंदर राम मंदिरे आहेत. या सगळ्यांचा परामर्श या छोट्याशा लेखात घेता येणे शक्य नाही, मात्र ही सगळी मंदिरे भक्तांच्या श्रद्धेची ठिकाणे आहेत आणि त्यांच्या श्रद्धेने ही कायमच गजबजलेली राहतात.

(लेखक मंदिर व मूर्ती अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT