पंतप्रधान उघडपणे देवळांमध्ये जातात. पूजाअर्चा करतात. त्यामुळे आता राहुल गांधी यांनाही मंदिरात जावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना वारीत चार पावले का असेना चालावे लागत आहे.
कोल्हापूर : देशात सांस्कृतिक पुनर्उत्थानाचे कार्य सुरू आहे. गो-माता, सनातनचे आम्ही रक्षणकर्ते आहोत. धर्माच्या लढाईत सत्याच्या विजयासाठी संतांनी जागर करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी येथे केले.
कणेरी येथील सिद्धगिरी मठावर (Siddhagiri Math Kaneri) सुरू असणाऱ्या संत समावेश सोहळ्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यात राज्यभरातील कीर्तनकार, प्रवचनकार, संत आणि महंत सहभागी होणार आहेत. उद्घाटन सत्रामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पुंगनूर गाय भेट देण्यात आली. अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांनी प्रास्ताविक केले.
यानंतर फडणवीस म्हणाले, ‘‘देशामध्ये सांस्कृतिक पुनर्उत्थान सुरू आहे. अयोध्येत राम मंदिर (Ram Temple) उभारले. काशी कॉरिडॉर निर्माण केला. ज्ञानव्यापी मंदिरातही पूजाअर्चा सुरू झाली. देश सर्व आघाड्यांवर प्रगती करत आहे; मात्र याची भीती जगातील काही देशांना वाटू लागली. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत या शक्ती देशामध्ये सक्रिय झाल्या होत्या. नास्तिकतेचा विचार मांडणाऱ्या संघटनांना परदेशी निधी मिळू लागला आहे. व्होट जिहादचे प्रयोग झाले; मात्र देशातील जनतेने पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केले. आजही सनातन संपवण्यासाठी अनेक शक्ती कार्यरत आहेत. ‘लव्ह जिहाद’ची एक लाख प्रकरणे समोर आली आहेत. आपली संख्या कमी असली, तरी संघटित मतदान करून आपण हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारला सत्तेवरून हटवू शकतो, हे समीकरण त्यांनी खरे करून दाखवले आहे. याला उत्तरही संघटित मतदानातून दिले पाहिजे.’’
ते म्हणाले, ‘‘आम्ही हिंदुत्त्वाचे, सनातन धर्माचे, गो-मातेचे रक्षण करणारे आहोत. ज्या ज्यावेळी राजसत्तेला मार्गदर्शनाची गरज असते, त्यावेळी धर्मसत्तेने दिशा दाखविण्याचे काम केले आहे. आताही संत, महंतांनी आपले विश्वरूप दाखवले पाहिजे. या धर्माच्या लढाईत सत्याच्या विजयासाठी संतांनी जागर करावा.’’ ज्येष्ठ संपादक उदय निरगुडकर आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी संकेश्वर येथील विद्यानृसिंह भारती शंकराचार्य, संजय महाराज पाचपोर, राणा महाराज वास्कर, भाजप प्रदेश अध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले, लक्ष्मण महाराज चव्हाण, कमलाकांताचार्य महाराज, माधवमहराज राठी, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, सत्यजित कदम, राहुल आवाडे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान उघडपणे देवळांमध्ये जातात. पूजाअर्चा करतात. त्यामुळे आता राहुल गांधी यांनाही मंदिरात जावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना वारीत चार पावले का असेना चालावे लागत आहे. सर्व संत एकत्र येत आहेत, हे पाहून ५० वर्षे राजकारण करणाऱ्या शरद पवारांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यात्मिक आघाडी सुरू केली आहे, असा टोलाही श्री. फडणवीस यांनी लगावला.
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (ता. १) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते, कणेरी मठ येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान काही काळ ते सांगली दौऱ्यावरही असणार आहेत. शिंदे यांचे मंगळवारी (ता. १) सकाळी साडेअकराला कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. यानंतर ते हेलिकॉप्टरने सांगलीकडे प्रयाण करतील. यानंतर दुपारी पावणेतीनच्या दरम्यान, ते पुन्हा कोल्हापूर विमानतळावर येतील. तेथून ते मोटारीने कणेरी मठावर जातील. तेथे सायंकाळी चारला त्यांच्या हस्ते धर्मध्वज स्तंभाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर ते संत समावेश सोहळ्यात सहभागी होतील. त्यानंतर ते मोटारीने विमानतळाकडे प्रयाण करतील व तेथून ते विमानाने मुंबईकडे जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.