'स्वतःच्या सुखाबरोबरच समाजाचेही सुख शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच धम्म परिषदेचा मुख्य उद्देश सफल होणार आहे - प्रा. डॉ. अच्युत माने'
निपाणी : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी धम्माच्या रूपाने विशाल महासागर उपलब्ध करून दिला आहे. पण त्याचा वापर होताना दिसत नाही. समाज आजही जुन्या संस्कृती नुसारच वाटचाल करीत आहे. धम्मापासून (Buddhism) अनेक जण दूर आहेत. धम्म हा संस्कारक्षम बनवत असून धम्माशिवाय प्रगती होणार नाही, असे मत भंते संबोधी थेरो (Bhante Sambodhi Thero) यांनी व्यक्त केले.
येथे रविवारी (ता. २५) अक्कोळ रोडवरील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवन समोर आयोजित बौद्ध धम्म परिषदेच्या (Buddhist Dhamma Council Nipani) पहिल्या सत्रात ते बोलत होते.
प्रा. डॉ. अच्युत माने (Dr. Achyuta Mane) म्हणाले, ‘मानवी जीवन दुःखाने भरले असून त्यांना सुख देण्यासाठी बाबासाहेबांनी धम्माचा विचार दिला. अलीकडच्या काळात भौतिकपेक्षा मानसिक समृद्धी महत्त्वाची आहे. स्वतःच्या सुखाबरोबरच समाजाचेही सुख शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच धम्म परिषदेचा मुख्य उद्देश सफल होणार आहे.’ या वेळी प्रा. जे. डी कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते धम्म ध्वजारोहन (Dhamma Flag) झाले. चंद्रकांत सांगलीकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. स्वागताध्यक्ष सुधाकर माने यांनी प्रास्ताविक केले. दलित क्रांतीसेनेचे अध्यक्ष अशोककुमार असोदे, मिथुन मधाळे, चंद्रकांत सांगलीकर, भिकू गोविंद यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम झाला. बौद्ध उपासक कपिल कांबळे यांना मान्यवरांच्या हस्ते दुचाकी प्रदान करण्यात आली. प्रमोद कांबळे यांनी मानपत्र वाचन केले.
परिषदेस माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, डॉ. श्रीकांत वराळे, डॉ. रवींद्र दिवाकर, महेंद्र मंकाळे, प्रा. शरद कांबळे, सुनील शेवाळे, मल्लेश चौगुले, प्रा. सुरेश कांबळे, प्रा. अजित कांबळे, प्रा. नवीजन कांबळे, पिंटू माने, लोकेश घस्ते, भिकाजी कांबळे, विवेक कांबळे, किसन दावणे, आरेश सनदी, अमित शिंदे उपस्थित होते.
बौद्ध धम्मात नैतिकतेला महत्त्वाचं स्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म आपण विसरत चाललो असून येणाऱ्या काळात बौद्ध धम्माचा स्वीकार केला, तरच आपल्या समाजात क्रांती होईल, अन्यथा नाही. बाबासाहेबांच्या संविधानामुळं आपला देश प्रगतीपथावर कार्य करत आहे. आजच्या घडीला धम्माचा प्रसार करणं ही काळाची गरज असून यासाठी तरुणांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
-प्रा. जे. डी कांबळे, ज्येष्ठ विचारवंत
'बौद्ध धम्म परिषदे'च्या माध्यमातून तरुण युवकांना धम्माच्या प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आम्ही बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निपाणीनगरीला भेट दिली होती, त्यामुळं या शहराला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून निपाणी तालुक्यात आंबेडकरी चळवळ प्रबळ आणि मजबूत करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न आहे. येणाऱ्या पुढच्या काळात आपल्या समाजात धम्माचा प्रसार कसा करता येईल, यासाठी गावागावांत बैठका घेऊन जागृतीचा आमचा प्रयत्न नक्की प्रयत्न असेल!
-सुनील शेवाळे, अध्यक्ष एस.सी., एस.टी शिक्षक संघटना, कर्नाटक
बौद्ध उपासक कपिल कांबळे गेली 15 वर्षे निपाणी तालुक्यात बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करत आहेत. हे करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, पण त्यांनी या कार्यातून माघार न घेता सतत धम्माचा प्रचार करत राहिले. गावोगावी जाऊन बाबासाहेबांनी दिलेला 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा संदेश स्टिकरच्या (भित्तीपत्रक) माध्यमातून प्रत्येकाच्या घराच्या दारावरती चिटकवला, तसेच त्रिसरण-पंचशिलेव्दारे त्यांनी धम्म प्रत्येकाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न केला, याला निश्चित यश प्राप्त झाले.
स्वत: ची चहाची टपरी सांभाळत त्यांनी स्वत:ला धम्म कार्यात झोकून दिलं आणि याच त्यांच्या कार्याची दखल घेत आंबेडकरी समाजानं त्यांना 14 ऑक्टोबर रोजी दुचाकी देण्याचा निर्णय घेतला, पण कांबळेंचं कार्य, त्याग इतरांना देखील समजावा, यासाठी निपाणीत बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि उपासक कपिल कांबळेंना आंबेडकरी समाजानं पै-पै गोळा केलेल्या धम्मदानातून त्यांना 'दुचाकी' नुकतीच प्रदान करण्यात आली आणि त्यांच्या धम्म कार्याचा यथोचित सन्मान करण्यात आला!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.