कोल्हापूर : ‘शिवराय मनामनांत- शिवजयंती घराघरांत’ याची प्रचीती देत शहरासह अवघा जिल्हा आज शिवमय झाला. फडफडणारे भगवे ध्वज, भगव्या पताका व रोमांचित करणारी भेदक शाहिरी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येने अनुभवली. ‘तुमचं आमचं नातं काय, जय भवानी- जय शिवराय’ अशी घोषणा देत शिवभक्त शिवज्योत आणण्यासाठी पन्हाळगडावर रवाना झाले.
शिवजयंती उद्या (ता. १९) थाटामाटात साजरी करण्यासाठी आठवडाभर शहर परिसरासह जिल्ह्यात तयारी पूर्ण झाली आहे. शिवाजी पेठ व मंगळवार पेठेत वैविध्यपूर्ण कार्यक्रम सुरू असून, चौकाचौकांत उत्सवाचा माहौल आहे. महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, बिनखांबी गणेश मंदिर, राजारामपुरी मुख्य रस्ता, ताराबाई रोड, रंकाळा स्टॅंड, गंगावेस, पापाची तिकटी, महापालिका परिसरात भगवे ध्वज, टी शर्ट, पताकांचे स्टॉल्स लागले आहेत. शाहूपुरी, पापाची तिकटी, बापट कॅम्प येथील कुंभार गल्ल्यांत छत्रपती शिवरायांचे पुतळे घेण्यासाठी बालचमूंची लगबग सुरू होती.
विशेष म्हणजे ऐतिहासिक वेशभूषेत बालचमू अंगणवाडीत आज दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, रणरागिणी ताराराणी, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची वेशभूषा त्यांनी केली होती. शिवजन्म काळ सोहळा साजरा करीत त्यांनी घोषणांनी वर्ग दणाणून सोडला. सायंकाळी ग्रामीण भागासह शहरातील तरुण शिवज्योत आणण्यासाठी पन्हाळगडाच्या दिशेने रवाना झाले.
शिवगर्जना
संयुक्त उत्तरेश्वर पेठ- शुक्रवार पेठेतील शिवाई ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्या (ता. १९) सकाळी दहाला शिवगर्जना दिली जाणार आहे. यशश्री घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली २५ लहान मुले-मुली शिवगर्जना करून मानवंदना देतील.
डॉ. शिखरे यांचे आज ऑनलाईन व्याख्यान
शिवाजी विद्यापीठातर्फे शिवजयंतीनिमित्त उद्या (ता. १९) इतिहास संशोधक डॉ. सुरेश शिखरे यांचे विशेष ऑनलाईन व्याख्यान सकाळी अकराला होत आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमार नीती’ असा त्यांचा विषय आहे. ‘शिव-वार्ता’ यूट्यूब वाहिनीवरून त्याचे प्रसारण होईल. शिवप्रेमी नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनिश पाटील यांनी केले आहे.
परिसर रोषणाईने उजळला
छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांचा पुतळा रोषणाईने सायंकाळी उजळला. शिवभक्तांनी मोबाईलद्वारे त्याची छायाचित्रे टिपली. अनेकांच्या मोबाईलच्या डीपी व स्टेटसवर त्याची छायाचित्रे झळकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.