काँग्रेस फुटल्यानंतर त्यांच्या खांद्यावर शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. त्यांनी शेवटपर्यंत काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम केले.
कोल्हापूर : काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, माजी महापौर प्रल्हाद भाऊसाहेब चव्हाण (वय ८३) यांचे काल (सोमवार) निधन झाले. नगरपालिकेत एकदा व महापालिकेत सलग चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी सलग १८ वर्षे काँग्रेसचे शहराध्यक्षपद भूषवले.
त्यांनी (Pralhad Chavan) पुढाकार घेऊन राज्यातील माजी महापौरांची संघटना स्थापन केली आहे. ६१ वर्षांच्या राजकीय, सामाजिक योगदानाबद्दल त्यांचा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व काँग्रेसचे युवा नेते कन्हैयाकुमार यांच्या उपस्थितीत आठ दिवसांपूर्वीच गौरव झाला होता. त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत होते.
रविवारी त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती, पण अचानक काल सकाळी हृदय बंद पडून त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तसेच मुले माजी महापौर सागर चव्हाण, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन मंगळवारी (ता.२९) सकाळी आहे, तर दुपारी चार वाजता महापालिकेच्या चौकात सर्वपक्षीय शोकसभा होणार आहे. नाथा गोळे तालमीजवळील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. महापालिकेसमोर अंत्ययात्रा आल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी सलामी दिली.
महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार पी. एन. पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, बाजीराव खाडे, ॲड. सुरेश कुराडे, भैया माने, बाळासाहेब खाडे यांच्यासह माजी नगरसेवक, विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी महापौर ॲड. महादेवराव आडगुळे यांनी काही आठवणींना उजाळा देत काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या. वाघवडे (ता. राधानगरी) येथून आलेल्या चव्हाण यांची शेती, तसेच मंडप व्यवसाय होता. शिवाजी पेठेतून त्यांनी समाजकारण व राजकारणाला सुरुवात केली. १९६७ मध्ये नगरपालिकेमध्ये प्रथम निवडून आले. महापालिका झाल्यानंतर सलग चारवेळा नगरसेवक झाले.
परिवहन सभापतिपद भूषवताना केएमटीला ऊर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न केला. १९९६ ते १९९७ कालावधीत महापौर बनल्यानंतर गंगाराम कांबळे स्मारकाच्या उभारणीबरोबरच तावडे हॉटेलजवळील स्वागतकमान उभारली. रोजंदारी कामगारांना कायम केले. शहराला थेट धरणातून स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी आग्रही होते. तसेच स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूरचा नारा त्यांनी दिला. उत्पन्नवाढ, आरोग्य सुविधांबाबत त्यांनी प्रयत्न केले.
बारा वर्षे शिक्षण मंडळावर काम करताना महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न केले. स्थायी व परिवहन समितीचे सदस्य म्हणूनही काम केले. ते स्पष्टवक्ते होते. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे खंदे कार्यकर्ते असलेल्या चव्हाण यांची रत्नाप्पाण्णा यांनी जनता बझारच्या चेअरमनपदी निवड केली. कोल्हापूर जिल्हा मंडप असोसिएशनची उभारणी करून अध्यक्षपद भूषवले.
तसेच बलभीम बँकेचे संचालकही होते. ते उत्कृष्ट फुटबॉलपटू होते. त्यांनी महाकाली फुटबॉल क्लबची स्थापना केली. तसेच दांडपट्टा खेळण्यातही ते तरबेज होते. राज्यातील माजी महापौरांची संघटना बांधण्यात त्यांचा मोठा वाटा होता. काँग्रेस फुटल्यानंतर त्यांच्या खांद्यावर शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. त्यांनी शेवटपर्यंत काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.