कारमधून उतरलेले राहुल गांधी थेट सनदे यांच्या घरात जाऊन संवाद साधू लागले. त्यांनी स्वत: स्वयंपाक घराचा ताबा घेऊन सनदे कुटुंबाशी गप्पा मारत वांगी, हरभरा आणि कांद्याची भाजी तयार केली.
कोल्हापूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर (Rahul Gandhi visit Kolhapur) आहेत. सकाळी दहाच्या दरम्यान त्यांचं विमानतळावर आगमन झालं. यावेळी त्यांनी कार्यक्रमस्थळी न जाता थेट कोल्हापुरातल्या उचगाव इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राहणाऱ्या टेम्पोचालक अजित तुकाराम सनदे यांच्या घरी भेट दिली.
अचानक राहुल गांधी घरात आल्यानंतर सनदे कुटुंबीय भारावून गेलं होतं. यानंतर राहुल गांधी टेम्पोचालक अजित सनदे यांच्या घरी जाऊन त्यांनी स्वत: भाज्या बनवत सनदे कुटुंबीयांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला.
यानिमित्ताने गांधी परिवाराचा दलित कुटुंबीयांशी (Dalit Family) असलेला स्नेह पुन्हा एकदा समोर आला. मात्र, ऐनवेळी घडलेल्या या प्रकाराने पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली. कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आणि काँग्रेसच्या संविधान संमेलनाच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज (शनिवार) सकाळी दहाच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर पोहोचले.
कोल्हापूरच्या दिशेने येताना टेंबलाईवाडी उड्डाणपुलाजवळ अचानक वाहनांचा ताफा टेंबलाई टेकडीमार्गे उचगावच्या दिशेला गेला. उचगावातील टेम्पोचालक अजित सनदे यांच्या छोट्याशा कौलारू घरासमोर ताफा थांबताच स्थानिकांच्या भुवया उंचावल्या. कोणालाच काही समजत नव्हते. ऐनवेळी घडलेल्या या बदलामुळे पोलिसही चक्रावले.
मात्र, कारमधून उतरलेले राहुल गांधी थेट सनदे यांच्या घरात जाऊन संवाद साधू लागले. त्यांनी स्वत: स्वयंपाक घराचा ताबा घेऊन सनदे कुटुंबाशी गप्पा मारत वांगी, हरभरा आणि कांद्याची भाजी तयार केली. दरम्यान, अंजना सनदे यांनी भाकरी केल्या. त्यानंतर सनदे कुटुंब आणि गांधींनी एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतला. राहुल गांधींच्या अनपेक्षित भेटीने आम्ही भारावून गेलो. त्यांनी स्वत: भाज्या तयार करून आमच्यासोबत जेवणाचा आनंद घेतला. आम्हाला त्यांच्या हातच्या भाज्या खाण्याची संधी मिळाली. हा क्षण आमच्या कुटुंबासाठी अविस्मरणीय असल्याची भावना अजित सनदे यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.