कोल्हापूर : ‘‘देश सुरक्षित हवा असेल तर सर्वच बाबतीत आत्मनिर्भर व्हायला हवे. संरक्षण सिद्धतेसाठी खर्च होणारा पैसा म्हणजे विकासासाठी केलेली गुंतवणूक आहे. त्यामुळे देशाचे सैन्य, अर्थव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षा यंत्रणा सक्षम होण्यासाठीच्या उपाययोजना लालफितीत अडकता कामा नयेत,’’ असे स्पष्ट मत माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आज येथे व्यक्त केले.
‘सकाळ’-कोल्हापूरच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह या वेळी वाचकांनी खचाखच भरले होते. मुख्य सोहळ्याची वेळ सायंकाळी साडेपाचची. पण, दुपारी साडेचारपासूनच नाट्यगृहात वाचकांची मांदियाळी अवतरू लागली. सायंकाळी पाचच्या सुमारास नाट्यगृह खचाखच भरून गेले. याच संमोहित माहोलात सोहळ्याला प्रारंभ झाला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
जनरल मनोज नरवणे यांनी ‘भारतासमोरील सुरक्षिततेची आव्हाने आणि संधी’ या विषयावर सविस्तर संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, समानता, विकासाच्या समान संधी या मूल्यांची प्राधान्याने जोपासना करणारी व्यवस्था असणारा भाग म्हणजे देश. त्याला भौगोलिक सीमा असतात. त्यात राहणाऱ्या नागरिकांना शांतता हवी असते. ही शांतता असेल तरच प्रत्येकाला आपल्या विकासाची संधी मिळते. म्हणूनच देशाच्या संरक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. भूदल, नौदल आणि वायूदल या संरक्षण यंत्रणा आहेत. त्याचबरोबर सीमा सुरक्षा दल, तटरक्षक दल, अंतर्गत पोलिस यंत्रणा याही सुरक्षेसाठी कटिबद्ध असतात.’’
‘‘भारताच्या सुरक्षेसमोर अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही पातळ्यांवर आव्हाने आहेत. दहशतवादी बाहेरील देशांत योजना आखतात. बाहेरून त्यासाठी आर्थिक पाठबळ उभे करतात. साधने जमवितात. पण, प्रत्यक्षात कारवाई आपल्या भूभागावर करतात. ही बाह्य प्रकारची आक्रमणे आहेत,’’ असे सांगून ते म्हणाले, ‘‘देशात असणारी विविधता जशी आपली ताकद आहे, तसेच त्यातील काही घटकांना फूस लावून त्यांच्याकडून देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोर आव्हाने उभी केली जातात. यासाठी काही गोष्टींचे वास्तव आपण लक्षात घेतले पाहिजे. हे वास्तव आपल्याला रशिया आणि युक्रेन युद्धाने दाखवून दिले आहे.
जगाचे आर्थिक हितसंबंध एकमेकांमध्ये गुंतलेले असल्याने आता युद्ध होणार नाही, असा एक समज होता. तो या युद्धाने फोल ठरविला. भविष्यातील युद्ध हे समोरासमोर होणार नाही ते जैविक किंवा आर्थिक असेल, असेही सांगितले जात होते. मात्र, युक्रेन-रशिया युद्धात रक्तपात झालाच, निष्पाप लोक मारले गेलेच. अनेकांचे आर्थिक हितसंबंध, भूमीच्या स्वामित्त्वाचा वाद, सामाजिक आणि धार्मिक मुद्देही प्रामुख्याने भविष्यातील युद्धाची कारणे असणार आहेत. आपल्या भूमीच्या सुरक्षेसाठी आपल्याला सज्ज राहावे लागेल.’’
सुरक्षेच्या उपाययोजनांबद्दल जनरल नरवणे म्हणाले, ‘‘देश सर्वांगीण दृष्टिकोनातून आत्मनिर्भर असणे हेच सुरक्षेसाठी सर्वांत महत्त्वाचे आहे. युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणा युद्धासाठी सिद्ध नव्हत्या. त्यांची अर्थव्यवस्थाही परावलंबी होती. याचा फटका त्यांना बसला. आज मोझांबिक किंवा व्हेनेझुएला या देशांमध्ये काही घडामोडी घडल्या, तर वाशीच्या मार्केटमधील तूरडाळीच्या दरावर त्याचा परिणाम होतो, इतकी जगातील सर्वच देशांची अर्थव्यवस्था परस्परावलंबी बनली आहे. म्हणूनच युक्रेन युद्धानंतर जगभरातील कमोडिटी मार्केटमध्ये दरवाढ झाली. आपल्याला देशाची अर्थव्यवस्था आत्मनिर्भर बनवली पाहिजे.
संरक्षणावर होणाऱ्या खर्चाबद्दल मतमतांतरे आहेत. ‘गन व्हर्सेस बटर’ अशी संकल्पना मांडली जाते. पण, प्रत्यक्षात संरक्षण सिद्धतेवर होणारा खर्च म्हणजे चांगला परतावा देणारी गुंतवणूक आहे. देशाच्या सीमा, अंतर्गत सुरक्षा व्यवस्थित असतील तरच परकीय गुंतवणूक वाढेल. देशाची उत्पादकता वाढेल, पर्यटन व्यवसायासारखे व्यवसाय विकसित होतील. संरक्षण उपकरणावरील तंत्रज्ञान आणि उत्पादने यांच्या व्यापारातूनही मोठ्या प्रमाणात परकीय चलन देशाला मिळेल. म्हणूनच देशाची संरक्षण सिद्धता अत्याधुनिक आणि शाश्वत असली पाहिजे.’’
‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘समाजात सकारात्मकतेची बीजं रुजली जावीत आणि त्यातून विधायकतेला बळ मिळावे, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’ने अनेक नव्या संकल्पना पुढे आणल्या आणि यशस्वी केल्या. कोरोनाच्या महाभयानक संकटानंतर ‘सकाळ''च्या कोल्हापूर आवृत्तीच्या वर्धापन दिनाचा हा जाहीर सोहळा आणि त्याला झालेली उदंड गर्दी हे ‘सकाळ’ आणि वाचकांचे नाते किती घट्ट आहे, याची प्रचीती देणारा आहे. जागल्याची भूमिका घेऊन कार्यरत असताना सत्याशी, समाजाशी आणि वाचकांशी बांधिलकी हेच ‘सकाळ माध्यम समूहा’ने जीवनमूल्य मानले आहे.’’
दरम्यान, ‘सकाळ''चे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. भूषण करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने सोहळ्याचा समारोप झाला. मुख्य सोहळ्यानंतर झालेल्या स्नेहमेळाव्यालाही वाचकांनी उत्स्फूर्त गर्दी केली. सोहळ्याला भारती प्रतापराव पवार, सरोज पाटील, वीणा मनोज नरवणे, दिलीप माने, जयश्री दिलीप माने, डॉ. जय सामंत, डॉ. अनुराधा सामंत, हेमा अमीर मेहता, संजीव पाटील, प्रज्ञा संजीव पाटील आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
शेजारील देशांत स्थैर्य आवश्यक
‘‘ज्या देशात अस्थिरता असते, तेथून अमली पदार्थ, शस्त्रास्त्रे, बनावट चलन यांची तस्करी होते. त्यातूनच देशांतर्गत असुरक्षितता वाढते. यासाठी शेजारील देशात स्थैर्य असणे आवश्यक आहे. स्थैर्यासाठी हे देश काही अंशी भारतावर अवलंबून आहेत. त्यामुळेच भारताची भूमिका त्यांच्यासाठी निर्णायक आहे,’’ असे नरवणे यांनी स्पष्ट केले.
युवा पिढी महत्त्वाची
‘‘सर्वच बाबतीतील विविधता ही आपली ताकद आहे. युवा पिढीने ही गोष्ट लक्षात घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. देशाच्या भवितव्याची धुरा आता त्यांच्या खांद्यावर आहे,’’ असा विश्वास नरवणे यांनी व्यक्त केला.
‘सुरक्षा’ विशेषांकाचे स्वागत
वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘सुरक्षा’ या विषयावरील विशेषांकाचे वाचकांनी आज जोरदार स्वागत केले. वैयक्तिक सुरक्षेपासून देशाच्या सुरक्षिततेपर्यंत विविध तज्ज्ञांच्या लेखांचा या विशेषांकात समावेश असून, तो संग्राह्य झाल्याच्या प्रतिक्रिया वाचकांनी आवर्जून व्यक्त केल्या.
जनरल नरवणे म्हणाले,
विविधता हीच देशाची खरी ताकद
शेजारील राष्ट्रांच्या स्थैर्यात भारताच्या भूमिका निर्णायक
संरक्षण यंत्रणा अत्याधुनिक व नित्य सज्ज असणे आवश्यक
देशाच्या सीमा, अंतर्गत सुरक्षा व्यवस्थित असेल तरच
परकीय गुंतवणूक वाढेल
भूमीच्या स्वामित्वाचा वाद, सामाजिक आणि धार्मिक मुद्दे
भविष्यातील युद्धाची कारणे असतील
‘सकाळ’चा गौरव
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ‘सकाळ माध्यम समूहा’ने विविध रचनात्मक कामांचाही आदर्श घालून दिला आहे. समाजाच्या भल्यासाठी ठोस भूमिका घेणारा हा समूह असून, ही गोष्ट कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार जनरल मनोज नरवणे यांनी काढले. ‘सकाळ’-कोल्हापूरच्या ४२ व्या वर्धापन दिनी संवाद साधत असताना माझी लष्करी सेवा ४२ वर्षांचीच झाली असल्याचा योगायोग जुळून आल्याचेही ते म्हणाले.
यांचा झाला सन्मान
विधवा प्रथा बंद करून राज्याला आदर्श देणारी हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायत, गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून गोशाळा उभारणारे नीतेश ओझा, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देणारे बावड्यातील सेवा रुग्णालय, बालनाट्य शिबिरातून सजग युवा पिढीसाठी प्रयत्नशील ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर, आपत्कालीन आरोग्य सेवेत सक्रिय मुस्लिम मेडिको ॲण्ड पॅरामेडिको असोसिएशन, दि कॉन्झर्व्हेशन फाउंडेशन ऑफ इंडियाचे आशिष घेवडे, चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचे मिलिंद यादव, पर्यावरणपूरक एडिबल कटलरी कपनिर्मिती करणारे दिग्विजय गायकवाड आणि सहकारी, सेवा निलयम संस्थेच्या ऐश्वर्या मुनीश्वर यांचा माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.