Dissolution to pune Chandrakant Patil planning for Pune graduate election 
कोल्हापूर

चंद्रकांतदादांचं नेमकं चुकलं कुठं?

शेखर जोशी

सांगली - काँग्रेसची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतानाही भाजपने पदवीधर मतदारसंघाच्या जागा जिंकण्याचं तंत्र आत्मसात केलं होतं. आता भाजपची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आली असताना नेमकं काँग्रेससारखं भाजपचं झालं आहे. असं का व्हावं? कुठं तंत्र चुकलं? याचं आत्मचिंतन भाजप करेल?

भाजपची २०१४ मध्ये राज्यात सत्ता आली आणि चंद्रकांतदादांचे भाग्य एकदमच उजळले...पार्टीतील ते महत्त्वाचे शक्‍ती केंद्र झाले. पश्‍चिम महाराष्ट्रात त्यांनी मेगा भरती करीत दोन्ही काँग्रेसला धक्‍क्‍यावर धक्के दिले. मात्र सांगली जिल्ह्यात भाजपच्या वाढीची कारणे वेगळीच आहेत ती दादांच्या लक्षात आली नसावीत. गेल्या वीस वर्षात राष्ट्रवादीच्या (जयंत पाटील यांच्या) छुपा पाठिंब्यानेच भाजप विस्तारला हे कोणीही नाकारणार नाही. पण महापालिका व जिल्हा परिषदेला भाजपने दोन्ही काँग्रेस विरुध्द लढूनही या दोन महत्त्वाच्या सत्ता येथे हाती घेतल्यानंतर दादांचा वारु सुसाट सुटला. त्यांनी आधी जयंतरावांना आणि नंतर शरद पवार यांना डिवचताना राष्ट्रवादीची छुपी रसदच तोडून टाकली. पवारांच्या राजकीय उंचीबद्दल किंवा जयंतरावांना विधानसभेलाच संपवले असते अशी केलेली बडबड पाहता कोणीही ही विधाने सध्याच्या राजकीय धुमश्‍चक्रीत परिपक्वपणाची मानणार नाही. बडबडीचा तो अंदाधुंद गोळीबारच होता. 

दुसरा मुद्दा भाजप-संघ परिवार वर्षानुवर्षे या निवडणुकांसाठी अतिशय हुशारीने तयारी करायचा. पडद्याआड राहून हजारो स्वयंसेवक ही कामगिरी फत्ते पार पाडायचे. नेमके हेच अरुण लाड यांनी गेल्या तीन वर्षांत केले .अगदी कोरोना काळातही त्यांची नोंदणी मोहीम सुरू होती. अगदी शेवटच्या तीन दिवसांत भाजपने पुण्यात तीस हजारांची नोंदणी केल्याने जयंतराव पाटील अस्वस्थ झाले होते. मात्र हे ससा कासवाच्या शर्यंतीसारखे झाले. एक नक्की की भाजपच्या तंत्राने लाडांनी भाजपचा पराभव केला. मध्यंतरी तर या निवडणुका पुढे ढकलायला हव्यात असेही विधान चंद्रकांतदादांनी केले होते.त्यावेळी ते तयारीत मागे पडल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे ऐनवेळी संग्राम देशमुख यांना घोड्यावर बसवावे लागले. हा संघ परिवारासाठी धक्काच होता. मराठाच उमेदवार हवा. तो आर्थिकदृष्ट्या मजबूत हवा हे निकष पक्षनेतृत्वाने लावले. या गदारोळात चंद्रकांत तपभरापूर्वीची आपली आर्थिक ताकद विसरलेले असावेत. ते या मतदारसंघातून पूर्वी ब्राह्मण उमेदवार निवडल्याचेही ते विसरले असावेत. त्याचे पडसाद संघ शिस्त मोडून सोशल मीडियावरून व्यक्त झालेल्या प्रतिक्रियामधून दिसून आले. घराणेशाही, साखर सम्राट असे मुद्दे मांडणाऱ्या भाजपचे हे वर्तन म्हणजे भाजप काँग्रेसमय झाल्याचेच उदाहरण.

भाजपने पश्‍चिम महाराष्ट्रात आता पाय रोवले असताना हा पराभव कसा हा प्रश्‍नही आता उपस्थित होत आहे. मात्र इथे सत्तेचा नव्हे तर निवडणूक तंत्राचा खरा उपयोग असतो हेच भाजप विसरला. भाजप-संघ परिवाराची ही रणनीती गेल्यावेळी सारंग पाटील यांनी पूर्ण हेरली होती. त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्यावेळी लाड यांची बंडखोरी नसती तर चंद्रकांतदादा दिसलेच नसते असं शरद पवारच एका कार्यक्रमात म्हणाले होते. पण मागचा निसटता विजय असूनही राज्य सांभाळायला निघालेले चंद्रकांतदादा आपले घर सांभाळायचेच विसरले. गेल्यावेळी मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला होता. मात्र ते अपघाताने झाले होते. यावेळी अशी मतविभागणी जाणीवपूर्वक करण्यावर भाजपचा भर राहिला. मात्र लाडांची तयारीच एवढी होती की हे तंत्रही फारसे टिकले नाही. 

या निकालाचा राज्यातील बदललेल्या राजकीय वातावरणाशी जोडता येईल. पदवीधर व शिक्षकमध्ये भाजपचा सर्वात मोठा गड असलेला नागपूरदेखील यावेळी ढासळल्याने एकटे चंद्रकांतदादाच नाही तर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी हे सर्वच दिग्गज देखील कमी पडल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आता जशी भाजपची काँग्रेस झाली आहे तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही भाजपचे पदवधीर-शिक्षक मतदारसंघाचे तंत्र आत्मसात करताना दिसत आहेत. हा बदल नोंदवला पाहिजे. तिघे एकत्र लढले म्हणून पराभव झाला...किंवा एक जागा तरी मिळाली; शिवसेनेला काय मिळाले असे विश्‍लेषण करण्यात  भाजप नेतृत्व अडकले तर मात्र परतीचे दोर स्वतःच कापण्यासारखे ठरेल. भाजपवाल्यांना आत्मचिंतन करा असे सांगण्याची गरज नसते. त्यांचा चिंतनावर भरत असतो म्हणे. संघ शिस्तीत ते सुरू झालेही असेल !

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT