कोल्हापूर : गरजू घटकांसाठी आधार असलेल्या सीपीआर रुग्णालयातील ४० डॉक्टर कोकणात पाठवलेत. ते दोन दिवसांत कोल्हापुरात येणार आहेत, असे वैद्यकीय संचालकांनी सांगितले होते. मात्र, ते अजूनही परत आलेले नाहीत. अशात सीपीआरमधील ४२ डॉक्टरांचे गेली साडेतीन महिने वेतन झालेले नाही. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लक्ष घालूनही सीपीआरमध्ये सुरू असलेला हा सावळा गोंधळ आवरलेला नाही. परिणामी शेकडो रुग्णांच्या नियमित शस्त्रक्रिया थांबल्याने खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे.
सीपीआर रुग्णालयात जवळपास दीडशेवर डॉक्टर पूर्णवेळ सेवेत आहेत. यात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी व निवासी डॉक्टर अशा पदावर हे डॉक्टर कार्यरत आहेत. डॉक्टर अनुभवी व आपापल्या विषयात निष्णात आहेत. यातील ४२ डॉक्टरांना गेल्या वर्षी नियमित सेवेतून वगळून कंत्राटी सेवेत घेतले. उर्वरित डॉक्टर नियमित सेवेत आहे. त्यांचे वेतन वेळेवर होते, तर ज्यांना कंत्राटी म्हणून नियुक्त केले आहे, असे ३५ वैद्यकीय अधिकारी व ७ सहयोगी प्राध्यापकांचे आठ महिन्यांपासून वेतन थकीत होते.
या डॉक्टरांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. त्यानंतर या डॉक्टरांचे वेतन दोन महिने वेळेत मिळाले. त्यानंतर गेल्या साडेतीन महिन्यांचे वेतन पुन्हा थकीत ठेवले आहे. सीपीआर प्रशासन व वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मंत्रालयीन स्तरावर वेतन निधीसाठी प्रस्ताव गेलेला नाही. परिणामी वेतन थकल्याचे सूत्रांनी सांगितले.
सीपीआरचे डॉक्टर कोकणात गेले आहेत, नियमित शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. त्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या भूलतज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. खासगी भूलतज्ज्ञांनी येथे सेवा देण्यासाठी सहयोग द्यावा, असे आवाहन केले आहे. त्यांचा प्रतिसाद मिळताच थांबलेल्या शस्त्रक्रिया पूर्ण होतील. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन देण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच वेतन मिळेल.
- डॉ. प्रदीप दीक्षित, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
‘ते’ डॉक्टर अद्याप कोकणातच
सिंधुदुर्गात होणाऱ्या नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सीपीआरचे डॉक्टर तात्पुरत्या बदलीवर पाठवले. यात सात भूलतज्ज्ञ तिकडे गेले. एक महिला भूलतज्ज्ञ दीर्घरजेवर गेली. परिणामी सीपीआरमधील नियमित शस्त्रक्रिया थांबल्या. कोकणात गेलेल्या डॉक्टरांना इंडियन मेडिकल कौन्सिलकडून तेथील शासकीय वैद्यकीय महाविद्याल्याचे पर्यवेक्षण झाल्याशिवाय परत येता येणे मुश्कील आहे. त्यानुसार येत्या मंगळवारपर्यंत ते डॉक्टर कोल्हापुरात येणे मुश्कील आहे, असे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.