Koppeshwar Shiv Temple Sakal
कोल्हापूर

Khidrapur Temple History : खिद्रापूरचे कोप्प महातिर्थ, असा आहे कोप्पेश्वर शिवाचा इतिहास

शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूरचे कोप्पेश्वर मंदिर हे गेल्या काही वर्षांत प्रसार माध्यमांमुळे जास्त प्रसिद्धीला आलेले आहे.

योगेश प्रभुदेसाई

शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूरचे कोप्पेश्वर मंदिर हे गेल्या काही वर्षांत प्रसार माध्यमांमुळे जास्त प्रसिद्धीला आलेले आहे. तेथे अनेक वारसा भेटी (हेरिटेज वॉक) होत असतात. प्रत्येकजण आपापल्या परीने त्या मंदिरशिल्पाची माहिती सांगत असतो आणि प्रत्येकजण ती आपल्या परीने जाणून घेत असतो.

शेवटी संशोधन, अभ्यास या निरंतन चालणाऱ्या गोष्टी असतात. श्रावण सोमवारचे निमित्त साधून आपण या मंदिराविषयी थोडक्यात माहिती घेऊ. त्यासाठी मुख्यत्त्वे कोरीव लेखांचा आधार आपण घेणार आहोत. कोरीव लेखातून ज्ञात होणारे खिद्रापूरचे मूळ नाव कोप्प.

यासाठी आपल्या कामी गर्भगृहाच्या बाहेर असणारा कोरीव लेख येतो. हळेकन्नड लिपीमधील या कोरीव लेखात कोप्प आणि त्याला उद्देशून वापरलेलं महातीर्थ हे विशेषण महत्त्वाचे ठरतात. कोप्पेश्वराचे मंदिर अस्तित्वात का आले याचा विचार केला तर, करवीरमाहात्म्यातील दक्षयज्ञाची कथा बाजूला ठेवून आर्थिक-राजकीय-सामाजिक अंगांकडे पाहता, असा अंदाज बांधता येतो की, इथून व्यापारी मार्ग किंवा व्यापारी पेठ जवळ होते.

कोप्पेश्वर मंदिरात असणाऱ्या नगारखान्यातील वीर बन्नेसच्या कोरीव लेखातून शिलाहार भोज दुसरा आणि कलचुरी यांच्यात झालेल्या तिस्सीगावे (तासंगाव) लढाईविषयी माहिती मिळते. यावरून कोप्प या गावाचा व्यापारी मार्गाशी /पेठेशी असणाऱ्या संबंधाविषयी अंदाज बांधता येतो.

शिवाय सुपीक जमिनीच्या रूपाने झालेली कृष्णेची अपार कृपा आणि पूर्ण शाश्वती नाही पण कदाचित नदीमार्गानेही व्यापार चालत असावा या महत्त्वाच्या कारणांमुळे इथे राजकीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक बैठक होती हे स्पष्ट होऊ लागते.

शिवाय कोप्पेश्वर मंदिराची भव्य बांधणी आणि मंदिरावर असणारे, शिलाहारांचा सेनापती बोपण्ण दंडनायकाचे पराक्रम सांगणारे लहानसहान कोरीव लेख, जवळच असणारे तौलनिक दृष्ट्या छोटेखानी आदिनाथ जिनालाय देखील या अंदाजाला पुष्टी देतात.

हे कोप्पेश्वर मंदिर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शैवांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक केंद्र होते. कृष्णेचा प्रवाह पाहिला तर ती काहीशी चंद्राकार वळण घेत मंदिराजवळून जाते, त्यामुळे या क्षेत्राचा तीर्थ म्हणून विकास होणे ओघानेच आले. कोप्पेश्वर मंदिराच्या दक्षिणद्वाराबाहेर असलेल्या कोरीव लेखावरून समजते की, यादव सिंघण द्वितीय जेव्हा शिलाहारांचा पराभव कोप्प या गावी करतो.

तेव्हा तो कोप्पेश्वर देवाला पूर्वापार चालत आलेल्या कर्नाटकातील जुगुळ आणि शिरगुप्पी या गावांच्या दानाबरॊबरच कुडलदामवाड म्हणजेच कुरुंदवाड हे गाव देखील दान करतो. या लेखावरून समजते की, किमान आजचा सगळा शिरोळ तालुका हा शिलाहार-यादव कालखंडामध्ये मिरींजे देशाचा (तालुक्याचा) म्हणजे तत्कालीन परिभाषेत मिरज तालुक्याचा भाग होता.

कोप्पेश्वर मंदिराचा विचार करता, हे मंदिर दख्खनी नागर-भूमिज शैलीमधील आहे. आज जे मंदिर दिसतं ते बरंचसं भग्न आणि विरुप आहे. जर हे मंदिर आपल्या मूळ स्वरूपात राहिले असते तर ते दख्खनच्या भव्य आणि अतिसुंदर मंदिरनमुन्यांपैकी एक असते. मंदिर नखशिखान्त सुंदर शिल्पांनी नटलेलं असून त्यांमधून विविध पौराणिक विषय हाताळलेले दिसतात.

मंदिरावरील शिल्पांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकतर हे मंदिर हत्तींच्या पाठीवर तोलून धरल्याचा सुंदर आभास निर्माण केला आहे. इथे केलेल्या हत्तींच्या उपायोजनावरूनदेखील या भागाचे वैभव आणि देवतेचे महत्त्व समजते. मुख्य-मुख्य शिल्पांचा विचार करता जणू काही देवतांच्या मंडळामध्ये कोप्पेश्वर शिव मध्यवर्ती विराजमान आहे असे प्रतिभासित करण्याचा विचार तत्कालीन मंदिरस्थपतीचा असावा.

कोप्पेश्वराच्या सभामंडपाच्या बाहेरील बाजूंना समोर ब्रह्मा-विष्णू, दोन बाजूंना भैरव-चामुंडा, गणपती-सरस्वती आणि मागील बाजूला दुर्गा-गंगागौरीहर अशी देवतामंडळरचना केलेली आढळते. गर्भगृहाच्या चौकटीवर गजलक्ष्मी तर सभामंडपाच्या चौकटीवर सरस्वती यांचे शिल्पांकन आढळते. करवीरमाहात्म्यात येणाऱ्या अष्टमहालिंगांमध्ये कोप्पेश्वराचा अंतर्भाव केलेला आढळतो.

कोप्प गावाला मिळालेल्या महातीर्थाच्या दर्जामुळे तर कोप्पेश्वराचे अष्टमहालिंगांच्या यादीत जाणे स्वाभाविक आहे. करवीरमाहात्म्याचा रचनाकाल संदिग्ध असला तरी ते शिलाहार-यादवकाळात नक्कीच रचले गेलेले नाही. असे असता या ग्रंथात अष्टमहालिंगांमध्ये कोप्पेश्वराचा अंतर्भाव ही गोष्ट कोप्प महातीर्थाचा आणि पर्यायाने त्याच्या अधिष्ठात्या कोप्पेश्वराचा जनमानसात असलेला प्रभाव स्पष्ट करून जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT