रेडिओ स्टेशन ऑपरेटरची जबाबदारी त्यांच्याकडे होती. शत्रूचे सैन्य किती उंचीवर आहे, याची अचूक माहिती त्यांना भारतीय वायुदलातील वैमानिकांना द्यावी लागायची.
कोल्हापूर : ‘भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध (India vs Pakistan War) १९६५ ला सुरू झाले. रेडिओ स्टेशन ऑपरेटर असल्याने, शत्रूचे विमान किती उंचीवर आहे, याचा निरोप मी भारतीय वैमानिकांना (Indian Pilot) देत होतो. पाकिस्तान ते मुंबई विमानाने एक तासाचे अंतर. त्यात आमचे स्टेशन मुंबईमध्ये. त्यामुळे मुंबईला ब्लॅकआऊट केले होते.
शत्रूसैन्याच्या विमानातून एखादा बॉम्ब स्टेशनवर पडला, तर अशी शंका मनात यायची. युद्धात जिंकण्याचा निर्धार मात्र पक्का होता,’ माजी सैनिक मुरलीधर दादोजीराव देसाई युद्धातील अनुभव सांगत होते. भारत-चीन युद्धानंतर १९६५ ला भारतीय जवानांना (Indian Soldier) पाकिस्तानविरुद्ध लढाई करावी लागली. त्याच्या दोन वर्षे आधी देसाई आर्मीत दाखल झाले होते.
रेडिओ स्टेशन ऑपरेटरची जबाबदारी त्यांच्याकडे होती. शत्रूचे सैन्य किती उंचीवर आहे, याची अचूक माहिती त्यांना भारतीय वायुदलातील वैमानिकांना द्यावी लागायची. ती माहिती घेऊन वैमानिक त्या विमानावर अचूक मारा करत होते. मुंबईला ब्लॅकआऊट केल्याने त्यांना स्टेशनमधून बाहेर पडता येत नव्हते.
ज्या इमारतीत स्टेशन होते, त्या इमारतीलाही काळी कापडे लावून ब्लॅकआऊट केले होते. शत्रूच्या विमानांना चकविण्यासाठीची ही योजना होती. त्या काळातील तंत्रज्ञान विकसित नसल्याने, तत्कालीन यंत्रावर शत्रू सैन्याचे विमान डोळ्यात तेल घालून पाहावे लागायचे. ते जमिनीपासून किती फूट उंचीवर असेल, कोणत्या दिशेकडून येत आहे याची अचूक माहिती द्यावी लागायची.
देसाई म्हणतात, ‘‘युद्ध सुरू असताना बावीस दिवस एकाच युनिफॉर्मवर होताे. पायातील सॉक्सही काढले नव्हते. कोणाशी संपर्कही नव्हता. भारतीय वैमानिकांना कोड लँग्वेजमध्ये संदेश देत होतो. तो वैमानिकाला पोहोचला की, आम्ही निर्धास्त होत होतो.
स्टेशनमध्ये राहून आम्ही निरोप्याचे काम करत होतो. पुढे काही मोहिमांत आम्ही मैदानात उतरलो होतो. १९७१ च्या युद्धातही हेच काम करावे लागले. आमचे काम सोपे नक्कीच नव्हते. एखादी चूकही महाग ठरू शकली असती. देशावर आलेले संकट परतवण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावत होतो. या युद्धानंतर दोन वर्षांनी मी निवृत्त झालो.’’
देसाई मूळचे आप्पाचीवाडी येथील कुर्लीचे. तेथे कन्नड सक्तीचे केल्याने त्यांच्या वडिलांनी १९५४ मध्ये कोल्हापूर गाठले. प्रायव्हेट हायस्कूलमधून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील शाहू महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धानंतर आर्मीत भरती व्हा, अशी घोषणा सरकारने केली. लोहगाव एअर स्टेशनवरील भरती केंद्रात त्यांची प्राथमिक चाचणी होऊन लेखीपरीक्षा झाली. त्यात ते उत्तीर्ण होऊन प्रशिक्षणासाठी बंगळूरला दहा महिन्यांसाठी रवाना झाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.