Kolhapur Football Sakal
कोल्हापूर

Kolhapur Football : मी फुटबॉलचा...फुटबॉल माझा!

नायजेरियन खेळाडूंना घेतले डोक्यावर..!

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘जगात भारी कोल्हापुरी’ असं म्हटलं जातं. जसं कोल्हापूर हे रांगड्या कुस्ती अन् गूळ, साखर व चपलांसाठी व ‘तांबड्या-पांढऱ्या’साठी जगप्रसिद्ध, तसंच ते ‘फुटबॉलची पंढरी’ म्हणूनही कोलकाता, गोवानंतर प्रसिद्धीत आले आहे. कोल्हापूरचा फुटबॉल स्थानिक पातळीवरून म्हणाव्या तितक्या प्रमाणात राष्ट्रीय पातळीवर पोहोचला नाही.

- तानाजी पोवार

कोल्हापुरातील काहीजण अखिल भारतीय पातळीवर पदावर विराजमान असताना कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडूंकडून तितकी तुल्यबळ तयारी होत नाही. खेळाडू हे स्थानिक संघांशी ईर्ष्या करत राहतात. त्यातूनच दुखापतग्रस्त होतात. अशा दुखापतग्रस्त खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘अनफिट’ ठरवले जाते. हे टाळण्यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. खेळाडूंची मानसिकता बदलायला हवी. कोल्हापूरच्या परिघातून जेव्हा स्थानिक खेळाडू देशातील टॉप मोस्ट संघातून प्रतिनिधित्व करतील. तेव्हाच खऱ्या अर्थाने कोल्हापूर ही देशाची तिसरी फुटबॉल पंढरी ठरेल आणि कोल्हापूरचा फुटबॉलही ‘ग्लोबल’ होईल.

गेल्या ७५ वर्षांत ठरलेल्या मार्गदर्शक सूचीनुुसार या फुटबॉल पंढरीचा हंगाम नोव्हेंबर ते १५ जून या कालावधीत होतो. यात प्रथम के. एस. ए. मानांकन लीग, नेताजी चषक फुटबॉल स्पर्धा, सतेज चषक, राजेश चषक, चंद्रकांत चषक आदी स्पर्धा होतात. संघांच्या मानांकनानुसार १६ संघ वरिष्ठ गटात कायमस्वरूपी खेळतात. त्यात बी डिव्हिजनमधून विजेते, उपविजेते या दोन संघांची भर पडते आणि शहरातून एकूण १८ वरिष्ठ संघ व ग्रामीणचे दोन अशा २० संघांत दरवर्षी स्पर्धा खेळविल्या जातात.

फुटबॉलप्रेमींचा अभूतपूर्व प्रतिसाद

छत्रपती शाहू स्टेडियमची क्षमता १५ हजार प्रेक्षक बसण्याची आहे. त्यानुसार हंगामात सहा स्पर्धा झाल्या असून, त्यांतील अंतिम सामन्यासाठी २५ हजारांहून अधिक फुटबॉल रसिकांनी हजेरी लावली आहे. नोव्हेंबर ते जूनपर्यंतच्या हंगामात मानाची लीग व सहाहून अधिक स्पर्धांदरम्यान २०० हून अधिक सामने या मैदानात खेळविले जातात.

फुटबॉल खेळावर प्रथमच ‘पीएच.डी.’

कोल्हापूरच्या फुटबॉल खेळास एक अभ्यास म्हणून आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू निर्माण करण्यासाठी खेळाडूंवर संशोधनाची एक गरज होती. त्यामुळे शिवाजी तरुण मंडळाचे माजी खेळाडू, फुलेवाडी क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक आणि स. ब. खाडे महाविद्यालय (कोपार्डे)चे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अभिजित वणिरे यांनी ‘कोल्हापूर विभागातील राष्ट्रीय फुटबॉल खेळाडूंची अभिवृत्ती, त्यांना मिळणाऱ्या सामाजिक, आर्थिक स्तरावरील सुविधा’ हा एक चिकित्सक अभ्यास करून संशोधनपर प्रबंध सादर केला. त्यासाठी त्यांना शिवाजी विद्यापीठाने पीएच.डी. ही पदवी बहाल केली. फुटबॉल खेळावर संशोधन करणारे ते पश्चिम महाराष्ट्रातील पहिले संशोधकही ठरले.

आयलीग संघाचीही स्थापना

उद्योजक (दिवंगत) चंद्रकांत जाधव व ‘विफा’चे उपाध्यक्ष मालोजीराजे यांच्या पुढाकाराने ‘फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी’ या १३, १५ आणि १८ वर्षांखालील आयलीग संघाची स्थापना मे २०१८ मध्ये झाली. या संघास स्पेनमधील व्यावसायिक फुटबॉल प्रशिक्षक फ्लेईक्स सरोगाथी यांनी काही महिने प्रशिक्षणही दिले.

फुटबॉल, रांगडा खेळ म्हणून कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय... पेठा-पेठांतील ईर्ष्येने फुटबॉल लाल मातीशी घट्ट झाला, तशी स्थानिक खेळाडूंनी तंत्रशुद्ध फुटबॉल खेळण्यावर पकड मजबूत केली. इथल्या फुटबॉलप्रेमींनी स्थानिक खेळाडूंवर प्रेम करताना नायजेरियन खेळाडूंनाही डोक्यावर घेतले. बलाढ्य संघांत नायजेरियन खेळाडू नाहीत, असे कधी घडले नाही. छत्रपती शाहू स्टेडियमवर नायजेरियन खेळाडूंचा बोलबाला नेहमीच राहिला.

- संदीप खांडेकर

फुटबॉल हंगामात स्थानिक जिल्ह्याबाहेरील तीन खेळाडूंना खेळविण्यास ‘केएसए’ची परवानगी आहे. एका संघात तीन खेळाडूंपैकी दोन परदेशी खेळाडू घेणे तसे संघांच्या आर्थिक कुवतीबाहेरचे गणित. बलाढ्य संघांना मात्र ते हवे असतात. त्यांच्यातील कौशल्य इथल्या खेळाडूंत रुजावे व परदेशी खेळाडूंचा खेळ फुटबॉलप्रेमींना पाहता यावा, हा त्यामागचा उद्देश. व्यावसायिक खेळाडू म्हणून नायजेरियन खेळाडूंची ओळख महत्त्वाची ठरते. सरावाच्या वेळेचे ते पक्के असतात. आहार, मैदानावरील शिस्त, यात ते चुकारपणा करत नाहीत. शांत डोक्याने खेळण्याचे त्यांचे तंत्र विशेष आहे.

पाटाकडील तालीम मंडळातून खेळलेला मॅथ्यू, जॅक्सन, डेव्हिड, खंडोबा तालमीचा अँथोनी उच्छैना आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळातून जेरॉल्ड, फेला, ॲमे, शिवनेरी स्पोर्टस्‌कडून गॅब्रियल खेळले. ओला, केन, क्रिस्टन यांचेही पाय मैदानावर वेगाने चालले. त्यांच्या खेळातील नजाकत फुटबॉलप्रेमींत चर्चेची ठरली. छत्रपती शाहू स्टेडियमवर हंगामात त्यांनी छाप उमटविण्यावर भर दिला. बेस्ट फॉरवर्ड, मॅन ऑफ द मॅचचे मानकरीही झाले. त्यांच्याशी संवाद साधायचा झाल्यास इंग्रजी भाषा महत्त्वाची. त्यांच्याशी भाषेपलीकडचे नाते निर्माण करण्यात इथला फुटबॉलप्रेमी कमी पडला नाही.

कोल्हापुरात खेळण्यात नायजेरियन खेळाडूंना प्रतिष्ठा वाटते. त्याला कारण त्यांना इथे जसा मान मिळतो, तशी आर्थिक रक्कमही. त्यांच्या खाण्या-पिण्यात काही उणीव भासणार नाही, याची दक्षता संबंधित संघाचे व्यवस्थापन घेते. यंदाच्या हंगामासाठी नायजेरियन खेळाडूंना करारबद्ध केले आहे. त्यांना किती रक्कम दिले जाते, यावर नेहमीच चर्चा होते. स्थानिक खेळाडूंच्या पदरी चांगली रक्कम पदरी पडावी, ही अपेक्षा असणे गैर नाही. आजघडीला इथले काही खेळाडू व्यावसायिकतेच्या अंगाने खेळू लागले आहेत. त्यासोबत गोवेकर खेळाडूंनाही इथे चांगला भाव मिळाला आहे. विकास ढाले, मार्कोस, विल्सन, आयओ, लेस्ली, सॅबी, महेश कांबळे या गोवेकर खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करून प्रेक्षकांची मने जिंकली. चांगल्याचे कौतुक करण्याची कोल्हापुरी परंपरा आहे. ती प्रत्येक क्षेत्रात जपली गेली आहे. त्याला क्रीडा क्षेत्र अपवाद राहिलेले नाही. खिलाडूवृत्तीने चांगल्या खेळाला टाळ्या वाजविण्यात फुटबॉलप्रेमी कधी पडला नाही. भविष्यातही तो याच वाटेवर चालेल, हे निर्विवाद. हंगाम संपल्यानंतर परदेशी खेळाडूंना निरोप देण्यात गल्ली जमा झाल्याचे चित्र येथे पाहायला मिळाले आहे. यंदाच्या फुटबॉल हंगामासाठी नाव नोंदणी झाली आहे. त्यात परदेशी खेळाडूंवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांचा मैदानावर खेळ कसा होतो, याची उत्सुकता आहे. परदेशी खेळाडूंना स्थानिक खेळाडू भारी पडतात का, याचे विश्‍लेषणही होईल. अन्यथा कोल्हापूरचा फुटबॉल एका कक्षेतच फिरत राहील. महत्त्वाचे काय तर कोल्हापुरी फुटबॉलचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्यासाठी शाहू स्टेडियमवर जायलाच हवे.

मुलाची ‘पाचवी’ फुटबॉल पूजनाने

कोल्हापूरकर फुटबॉलवर कसे प्रेम करतील, याचा नेम नाही. फिफा वर्ल्ड कपने फुटबॉल ज्वर वाढत असताना, शिवाजी पेठेतल्या संध्यामठ तरुण मंडळाच्या कार्यकर्त्याचे फुटबॉलप्रेम भलतेच चर्चेचे ठरले आहे. त्याने चक्क दुसऱ्या मुलाची पाचवी फुटबॉल पूजनाने केली आहे. अजय जगदाळे असे त्या फुटबॉलप्रेमीचे नाव आहे. जगदाळे खासगी नोकरीत आहेत. त्यांना १४ नोव्हेंबर २०२२ ला मुलगा झाला. मुलाच्या पाचवीला त्यांनी पूजेच्या साहित्यासोबत फुटबॉल मैदानच्या प्रतिकृतीवर खेळाडूंचे छोटे कटआउटसची मांडणी केली. फुटबॉल व युरोपियन संघांचे टी शर्टस लावायला ते विसरले नाहीत. पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोची प्रतिकृती तेथे उभी केली. जगदाळे यांच्या पहिल्या मुलग्याचे नाव अमेय. त्याचा जन्म ऑगस्ट २०१९ चा. त्याच्या पाचवीलादेखील जगदाळे कुटुंबीयांनी फुटबॉल साहित्याची मांडणी करून पूजा केली होती.

कोल्हापूरला मान

अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर सदस्यपदी मालोजीराजे असून, अर्थ समितीवरही उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अखिल भारतीय स्थरावर या पदाच्या निमित्ताने प्रथमच कोल्हापूरची वर्णी लागली आहे.

गुणवत्तेला सुविधांची जोड दिल्यास कोल्हापूरची मुले या फुटबॉल पंढरीचा झेंडा सातासमुद्रापारही नेतील.

- मधुरिमाराजे, भारतीय फुटबॉल महासंघ महिला समिती सदस्या

आम्हीही कतारला...

कतारमध्ये होत असलेल्या फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी कोल्हापूर शहर परिसरातील वीस जण रवाना झाले आहेत. सुमारे महिनाभर ते तेथे थांबून सामन्यांचा आनंद लुटतील.

कोल्हापूरचे ‘स्टार’ खेळाडू

भारतीय संघातून १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा खेळलेला एकमेव महाराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत जाधव याच मातीतून तयार झालेला आहे. त्याने प्रथम पुणे क्रीडा प्रबोधिनीतून शिक्षण घेतानाच पुणे एफसी व फुटबॉल महासंघाच्या ‘इंडियन अ‍ॅरोज’कडून ‘आयलीग’ सामन्यांत खेळ केला त्यानंतर एफ.सी जमशेदपूर आणि सध्या तो हैदराबाद एफसी’कडून खेळ करीत आहे.

मूळचा कोल्हापूरचा व क्रीडा प्रबोधिनीचाच आणखी एक खेळाडू निखिल कदम हा पुणे एफसी, मुंबई एफ.सी., कोलकात्याचा नामांकित क्लब ‘मोहन बागान’ व नॉर्थ-ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब, स्ट्रायकर असून त्याने मैदान गाजविले आहे. तो ‘ सिक्कीम’ या देशातील नामांकित संघाकडून खेळला आहे. सध्या तो एफसी भवानीपूर या संघाकडुन खेळत आहे. क्रीडा प्रबोधिनीचा तिसरा खेळाडू सुखदेव पाटील हाही येथीलच. तो पुणे एफसी, दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि गोवा एफसी, दिल्ली डायनास या नामांकित संघांकडून खेळला आहे. सध्‍या तो भारतीय फुटबॉल महासंघाकडून नवोदित गोलरक्षकांना प्रशिक्षण देत आहे. याशिवाय रोहन आडनाईक गोव्याच्या ‘चर्चिल ब्रदर्स’कडून खेळला. तर नवोदित संकेत साळोखे हाही बेंगलोर एफसीकडून खेळत आहे; तर ओंकार मोरे हाही कोलकात्याच्या ‘अ‍ॅटलांटा डी’ संघाकडून खेळलाआहे. यांसह पूर्वीच्या खेळाडूंमध्ये उमेश चोरगे, अरुण नरके, रघुनाथ पिसे, लक्ष्मण पिसे, अकबर मकानदार, विश्वास कांबळे, शिवाजी पाटील, किशोर खेडकर, विजय कदम, सुधाकर पाटील, कैलास पाटील, संजय चौगुले, यांनीही राष्ट्रीय पातळीवर कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाकडून रिची फर्नांडिस यांनी प्रतिनिधित्व केले होते.

मानाचा तुरा

३ डिसेंबर २०१० ते ३० मे २०११ दरम्यान याच फुटबॉलच्या पंढरीत आयलीग सेकंड डिव्हिजनचे सामनेही झाले. यासाठी फुटबॉल रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

के.एस.ए.च्या शाहू स्टेडियम अर्थात फुटबॉल पंढरीच्या या मैदानात १७ जानेवारी २०१३ रोजी भारत विरुद्ध पोलंड यांच्यातील महिलांचा मैत्रीपूर्ण सामना झाला. हा सामना पाहण्यासाठी सुमारे ५० हजारांहून अधिक फुटबॉल रसिक हजर होते.

२५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०१७ या कालावधीत या पंढरीत इंडियन वुमेन्स लीगमधील पात्रता फेर्यांचे सामने झाले. यात इस्टर्न युनियन हा संघ विजयी झाला. या स्पर्धांना रसिकांतून भरभरून प्रतिसाद लाभला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT